Indian space station : भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी वाटचालीत आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले जात आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) लवकरच स्वतःचे 'भारतीय अंतराळ स्थानक' अवकाशात प्रक्षेपित करणार असून, या स्थानकाचे वजन तब्बल ५० टनांहून अधिक असणार आहे. ही माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली आहे. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे भारत जागतिक स्तरावरील अग्रगण्य अंतराळ राष्ट्रांच्या पंक्तीत ठामपणे उभा राहणार आहे.
राम मोहन मिशनच्या कार्यक्रमात बोलताना नारायणन यांनी सांगितले की, "या स्थानकाच्या उभारणीसाठी नियोजन अंतिम टप्प्यात असून, यामुळे केवळ तांत्रिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही भारताला नवे क्षितिज गाठता येईल." ५० टनांपेक्षा जास्त वजनाचे हे स्थानक दीर्घकालीन संशोधन, मानवी उपस्थितीसह प्रयोग आणि पृथ्वीच्या कक्षेत विज्ञानविषयक संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे.
भारताच्या अंतराळ यंत्रणेत सध्या ५७ उपग्रह कार्यरत असून, हवामान अंदाज, दुर्गम भागांतील टेलि-शिक्षण, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत हे उपग्रह महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. इस्रो हे कार्य केवळ शास्त्रापुरते मर्यादित न ठेवता देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठीही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. सुमारे ११,५०० किलोमीटरच्या भारतीय किनारपट्टीसह उत्तरेकडील सीमेवर इस्रो विविध एजन्सींसोबत समन्वय ठेवून काम करत आहे.
गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिमही निर्धारित मार्गावर आहे. नारायणन यांनी स्पष्ट केले की, लवकरच या मोहिमेचा 'अनक्रूड' म्हणजेच मानवविरहित चाचणी उड्डाण होणार आहे. त्यानंतर लवकरच दोन मानवी उड्डाण मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
इस्रो आपल्या चांद्र मोहिमांनाही गती देत आहे. चांद्रयान-४ ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम असून यामार्फत चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही मोहीम येत्या दोन ते अडीच वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
तसेच चांद्रयान-५ ही भारत-जपान यांची संयुक्त मोहीम असणार असून यामध्ये ६,४०० किलोग्रॅम वजनाचा लँडर आणि ३५० किलोग्रॅमचा रोव्हर असणार आहे. हा रोव्हर चंद्रावर १०० दिवस कार्यरत राहणार आहे. याची तुलना करायची झाल्यास यापूर्वी यशस्वी ठरलेला चांद्रयान-३चा लँडर १,६०० किलोग्रॅमचा होता आणि त्यामध्ये केवळ २५ किलोग्रॅमचा रोव्हर होता.
नारायणन यांनी अलीकडील PSLV-C61/EOS-09 मोहिमेतील अपयशाला 'अपवादात्मक घटना' असे संबोधले आणि सांगितले की, अशा छोट्या अपयशांमुळे इस्रोच्या भविष्यातील योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही.
या सर्व प्रकल्पांमुळे इस्रो केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातच नव्हे, तर देशाच्या आत्मविश्वासात आणि जागतिक स्तरावरील उंची गाठण्यातही मोलाची भूमिका बजावत आहे. भारत आता केवळ अंतराळात झेपावणारा देश राहिलेला नसून तो एक मजबूत आणि दूरदृष्टी असलेला 'अंतराळ महाशक्ती' बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.