‘पार्कर’ पेनचा निर्माता आणि सेल्समन ते उद्योजक व्हाया संशोधक असलेल्या जॉर्ज सॅफॉर्ड पार्कर यांच्या जन्मदिनी सहज हा प्रपंच.
आता कितपत वापरतात ठाऊक नाही पण पुर्वी किमान चौथ्या इयत्तेपर्यंत शाळेत ‘पाटी’ वापरली जायची. निम्नमध्यमवर्गीय मुलं खापराची पाटी-शौकीन मुलं एका बाजूला मणी बसवलेली पाटी तर मध्यमवर्गीय मुलं राजा-राणी या ब्रॅंडची पाटी वापरायचे आणि पेन्सिलनं लिहायचे कमी त्या पेन्सिल्स खायचेच जास्त नंतरच्या काळात वही-शिसेपेन्सिल्स आल्या. आताची मुलं अगदी पहिल्या इयत्तेत पेन वापरायला लागलेत. तसे या कोविडकाळात विद्यार्थीवर्गाचे शालेय लेखनही अत्यल्प झालेय अवांतर तर असोच. नव्वदची पिढी ही नातलगांना ‘पत्र’ लिहिलेली कदाचित शेवटची पिढी असावी.
तंत्रज्ञानाची प्रगती प्रचंड वेगाने झाल्याने असेल की काय ‘डिजिटलायजेशन’इतके वाढलेय की आता पेनाने लिहिणे हा प्रकारही आऊटडेटेड होते की काय? इतपत शंका येते. अतिशयोक्ती वाटतेय? थांबा, एक किस्साच सांगतो. हा किस्सा माझ्या एका पेशंटनं मला सांगितलाय. मध्यंतरी हे महोदय येरवाडा जेलची वारी करून आले. या दरम्यान कारागृहामध्ये व्हीआयपी कैदी म्हणून संजय दत्तला प्रारंभी कामाच्या वाटपात ‘किराणा’ सामानाची यादी बनवण्याचे काम देण्यात आले होते. लिहायचे सोडून ‘बाबा’ बराच वेळ कागद घेऊन फक्त बसून राहिला.
बाबानं शाळा कितपत अटेंड केलीये माहित नाही, पण दरम्यानच्या काळात फक्त सही करण्यापुरता पेनाशी संबंध राहिल्याने हा इसम ‘लिहिणे’ही प्रक्रियाच विसरून गेला, त्यामुळे नंतर त्याला खुर्च्या विणण्याचे काम देण्यात आले जे त्याच्या बायोपिक मध्येही दाखवलेय ते असो. बाबाचं जाऊदेत, वास्तव हे आहे की पाटी आणि पाटीवरची पेन्सिल जवळपास कालबाह्य झालेत. माणूस कधीच नेटवर्कवर चालत डेटा गोळा करणारा एक सेन्सर झालाय आणि प्रत्येक गोष्ट हातांच्या बोटावर येत प्रचंड गतिमान झालीये. आता तशी ती वेळ कधीच आलीये जेव्हा ‘हस्ताक्षर’ हा प्रकारही कायमचा लुप्त होईल. संजूबाबा त्याचेच एक उदाहरण असले तरी याची सुरूवातही कधीच झालीये.
आपण पुर्वी हातानं लिहायचो ते पुर्वीपेक्षा खूप कमी झालेय. आपण संगणकावर टाईप केलेले लेझर प्रिंट डॉक्युमेंट वापरतो. पैश्याच्या व्यवहारात कार्ड स्वाईप करतो-पेमेंटही डिजिटल झालेय. ईमेल/मॅसेज/व्हाट्सअपच्या युगात आता ही ‘आठवण’ राहिली की पुर्वी लोकांना हाताने लिहिणे आवडायचे. चांगले हस्ताक्षर गुण मानला जायचा-शुद्धलेखनाच्या वह्या असायच्या. लोक डायरी लिहायचे. एकमेकांना हस्ताक्षरात पत्र पाठवायचे. पोस्टकार्डचा फिल-आंतर्देशीय पत्राची रचना-पोस्टाचे विविधरंगी तिकिटं-शाईचा वास-कुणाचं खुरटं, कुणाचं तिरकं, कुणाचं सुंदर हस्ताक्षर या सगळ्यांना एक मानवी मुल्य होतं.
‘फाऊंटनपेन’ असणं तर स्टेटस सिंबॉल होता. कुण्या एका कवीनं म्हटलंय,”No fountain pens are not outdated.It still has all its pride and status” पण ते ही जवळपास कालबाह्य झालेत(?)
सकाळी उठून निगुतीनं दौतीतली शाई पेनमध्ये भरणं-कोऱ्या करकरीत कागदावर त्या पेननं लिहिणं म्हणजे एका प्रकारचा आनंद होता. मध्यंतरी पेन्सिल आणि बॉलपेनची गोष्ट सांगितली होती आज फाऊंटनपेनबद्दल थोडं सांगतो. फाऊंटन पेन हा तांत्रिकदृष्ट्या ’निब पेन’ ज्याला शाईसाठी स्वतंत्र साठवणीची जागा असते. फाऊंटन पेनचा शोध काही शतकं आधी लागला. सर्वप्रथम रिनायसन्स काळात लिओनार्दो दा विंचीनं त्याची रचना केली अशीही एक वदंता आहे. त्याची काही कागदपत्र-रेखाटनं याचा दाखलाही देतात पण तांत्रिकदृष्ट्या फाऊंटन पेनचं पहिलं पेटंट फ्रेंच प्रशासनानं ‘पेट्राच पोनारु’ या रोमेनियन संशोधकाला दिलं. दिवस होता २५ मे १८२७चा.
पेट्राचनं हंस पक्ष्याच्या पंखाची दांडी शाईचा साठा करण्यासाठी वापरत जाहिरात केली ‘plume portable sans fin, qui s’alimente elle-meme avec de l’ancre’ अर्थात कधीच शाई न संपणारी आणि पटकन रिफिल होणारी लेखणी. लेविस एडसन वॉटरमननं १८८३ साली आपल्या ‘वॉटरमन पेन’ या कंपनी अंतर्गत कॅपिलरीनं शाई भरायचा फाऊंटन पेन आणला.
लेविसच्या हे लक्ष्यात आलं होते की एकदा पेनात शाई भरली की तिचे स्वत:वर नियंत्रण रहात नाही त्यामुळे प्रवाह एकसारखा नसल्याने गळती सारख्या समस्या उद्भवतात. त्याने आपल्या भावासोबत वेगवेगळ्या नळ्या घेऊन एक ना अनेक प्रयोग केले आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, छोट्याश्या पाईपनं हवा सोडून पेनातली शाई नियंत्रित करता येईल आणि आतील शाई फक्त गुरूत्व बल मिळालं तरच खाली येईल त्यामुळे तिचा प्रवाह ही हळू राहिल पर्यायी अनावश्यक गळती थांबेल...युरेकाऽऽ
१२ फेब्रुवारी १८८४ साली या वॉटरमन बंधूंनी या फाऊंटन पेनचं पेटंट घेतले आणि स्वत: उत्पादनही सुरू केले. १८९९ पर्यंत त्यांनी या पेनाच्या निब मध्ये अनेक प्रयोग केले. या पेनची कार्यप्रणाली अत्यंत सोपी. सगळी प्रक्रिया गुरुत्वाकर्षण आणि केषाकर्षण यांच्यावरच चालते. यात पुढंही अनेकांनी एक ना अनेक प्रयोग केले. याच श्रेणीतला एक म्हणजे पेशानं सेल्समन आणि पेशीनं संशोधक असलेला अमेरिकन ‘जॉर्ज’. त्याची कामाच्या निमित्ताने अनेकदा बरीचशी फिरस्ती व्हायची. ऑर्डर घेणं-लिहिणं-चार ठिकाणी सह्या करणे यामुळे जॉर्जला दौत आणि पेन सोबत असावा याची जाणीव झाली.
या विचारातच त्याने अशा प्रकारच्या पेनाचे रेखाटन केले आणि आधी ‘शाईयुक्त पेन’ या नावाने या डिझाईनचे पेटंट घेतले आणि आपल्या नावाने या फाऊंटन पेनचं उत्पादन सुरू केलं. उत्पादन सुरू केलं हे ढोबळ झाले. त्याचा गुणात्मक दर्जा इतका वरचा ठेवला की हळूहळू त्याचा एक मोठा स्वतंत्र ग्राहक वर्ग निर्माण झाला. जगभरात अनेक ठिकाणी त्याचा फाऊंटन पेनचा कारखाना पोहोचला. १९४१ ला उजाडेपर्यंत या पेनने चारशे कोटी डॉलर्स पर्यंत उलाढाल केली. कॅनडा-युके-डेन्मार्क-फ्रान्स-मेक्सिको-अमेरिका-जर्मनी-ब्राझिल-अर्जेंटिना-भारत. त्याचा हा पेन यंत्र-तंत्र-सर्वत्र पोहोचला.
अगदी दुसऱ्या जागतिक महायुद्धापश्चात महत्वाच्या करारातही त्याच्याच पेननं स्वाक्षऱ्या झाल्या. १९६० मध्ये काळाची पावलं ओळखत त्यांनी बॉल पॉंईंट पेनही बनवले आणि त्यातही आपलं नाव राखलं तो ब्रॅंड म्हणजे ‘पार्कर’.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.