तळोदा : एकीकडे बिबट्याची दहशत, तर दुसरीकडे कडाक्याची थंडी अशा चक्रव्यूहात अडकलेल्या तळोदा शिवारातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतशिवारात रात्री जावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या वेळापत्रकानुसार एकेक आठवडा आलटूनपालटून वीजपुरवठा रात्री करण्यात येतो.
त्यामुळे रात्रभर वीजपुरवठा राहत असल्याने शेतकऱ्यांना रात्र रात्र जागून शेतशिवारात राहावे लागत आहे. त्यामुळे पूर्णवेळ शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्या संदर्भात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. (Leopard Attack Electricity Problem cool winter farmers face many problems to pesticide rabi crop Nandurbar News)
तळोदा शिवारात महावितरण कंपनीकडून करण्यात येणारा वीजपुरवठा रात्री ८.३० ते पहाटे ४.३० व दिवसा सकाळी ८.५५ ते ४.५५ असा आळीपाळीने एकेक आठवडा होत आहे. दिवसा वीजपुरवठा असेल तर शेतकऱ्यांना सोयीचे जाते. मात्र ज्या आठवड्याला रात्रभर वीजपुरवठा होतो त्या वेळापत्रकात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचे ठरते.
त्यात तळोदा शिवारात दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या पाऊलखुणा दृष्टीस पडत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी जीव मुठीत धरून शेतात राहावे लागते. दुसरीकडे शेजारील गुजरातमध्ये आठ तास वीज जास्तीत जास्त दिवसा येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र महाराष्ट्रातील महावितरण कंपनी शेतकऱ्यांना वीजपुरवठा करताना आठवडाभर रात्री शेतामध्ये राहावयास लावत असल्याचे शेतकरी सांगतात. आधीच बिबट्याचा सामना शेतशिवारात होत असताना किमान दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
दिवसा वीजपुरवठा करा
दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा पवित्र्यात आहेत. त्यासाठी शहरातील दत्तमंदिरात शेतकऱ्यांनी जमा होण्याची हाक दिली होती. काही शेतकरी जमादेखील झाले होते. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकरी महावितरण कार्यालयात जाऊ शकले नव्हते. त्यात शेतकऱ्यांनी आमदार राजेश पाडवी यांनाही भेटण्याची वेळ मागितली आहे. त्यामुळे शेतकरी दिवसा वीजपुरवठा करावा या मागणीसाठी आग्रही आहेत. त्यात शेतकऱ्यांना किती यश मिळते याबाबत उत्सुकता आहे.
"रात्रीचा वीजपुरवठा शेतीतील सर्वच कामांसाठी अडचणींचा ठरतो. त्यात एकीकडे बिबट्याची दहशत व दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत आम्हाला शेतात राहावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बैठकदेखील बोलावली होती. वीजपुरवठा दिवसा करण्याच्या मागणीसाठी आमदार राजेश पाडवी यांनादेखील भेटणार आहोत."
-श्रीनिवास पिंपरे, शेतकरी, तळोदा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.