नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्व सीईटी परीक्षा प्रभावित झाल्या होत्या. अद्याप या परीक्षांच्या सुधारीत तारखांची घोषणा केलेली नाही. दरम्यान लॉकडाउनच्या परीस्थितीमुळे नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून सीईटी सेलतर्फे महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना सीईटी परीक्षांसाठी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस मुदत दिली जाणार आहे.
सीईटी सेलच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना दिलासा
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, शिक्षणशास्त्र, विधी अशा सर्वच प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात असते. सामान्यतः एप्रिल, मे महिन्यात पार पडणाऱ्या या परीक्षा यंदा मात्र कोरोनाच्या परीस्थितीमुळे होऊ शकलेल्या नाहीत. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांना, परीक्षेच्या स्वरूपाविषयी शिक्षण विभागातर्फे विचार विनिमय सुरू आहे. दरम्यान नोंदणी प्रक्रियेदरम्यान देखील अनेक विद्यार्थ्यांना तत्कालीन परीस्थितीमुळे प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायबर कॅफे किंवा अन्य माध्यम सहज उपलब्ध होत नसल्याने अर्ज भरले गेले नव्हते. अशा विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.
दोन दिवस विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार्या सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांकरीता अर्ज भरण्यासाठी संधी दिली जात असल्याचे परीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आता सोमवार (ता.७) आणि मंगळवारी (ता.८) असे दोन दिवस विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे.
परीक्षेच्या तारखांबाबत लवकरच घोषणा शक्य
सद्यस्थितीत सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. परंतु लवकरच परीक्षांच्या तारखांची घोषणा केली जाणार असल्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. जिल्हास्तराऐवजी तालुका स्तरावर सीईटी परीक्षा घेण्याच्या नुषंगाने विभागाचे नियोजन सुरू असल्याचे समजते. लवकरच सीईटी परीक्षांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.