मालेगाव (नाशिक) : नव्या वर्षात जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरु होणार आहे. यात मालेगाव तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्यातील जवळपास 70 टक्के गावांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. परिणामी गावगाड्याच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागणार आहे. निवडणूक जाहीर होताच पक्षीय तसेच स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे.
तालुक्यासह कसमादे भागातील अनेक गावांच्या निवडणुका भाऊबंदकी व वाड्यांमध्ये रंगतात. शिवाय एकाच पक्षाचे दोन गट आमने सामने उभे ठाकतात. निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने लाखो रुपयांची उधळण होते. या वर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगाम जोरात आहे. त्यामुळे मजुर मतदार राजाचादेखील भाव वधारणार आहे. ग्रामीण भागातील चहा दुकाने, हॉटेल, उपहारगृहांना झळाळी मिळू शकेल. अखेरच्या टप्प्यातील आर्थिक उलाढालीही लक्षवेधी असतील. एकूणच ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देणारी ठरणार आहे.
ऊसतोडणी कामगारांकडे लक्ष
मुबलक उसामुळे या वर्षी महाराष्ट्र व गुजरातमधील साखर कारखाने दिवाळीपुर्वीच सुरु झाले. तालुक्यासह कसमादेतील हजारो ऊसतोडणी कामगार नगर व पुणे जिल्ह्यात तसेच गुजरातमध्ये गेले आहेत. कारखान्यांचा गळीत हंगाम भरात आला आहे. या वर्षीचा हंगाम मार्च-एप्रिलपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत 15 जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला अनेक मतदार मुकण्याची शक्यता आहे. तालुक्यातील 20 ते 25 गावांमधील मतदार असलेले कामगार ऊसतोडणीसाठी मोठ्या संख्येने गेल्याने या कामगारांना मतदानासाठी आणण्यासाठी उमेदवारांना पायघड्या घालाव्या लागणार आहेत. काही ठिकाणी आतापासूनच या कामगारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
नोकरदारांची होईल गावभेट
सर्वात टोकाची निवडणूक म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. वॉर्डात अतिशय कमी मतदान असल्याने प्रत्येक मतदार महत्वाचा ठरतो. तालुक्यातील हजारो मतदार रोजीरोटीसाठी बाहेरगावी आहेत. अनेकजण नोकरी, व्यवसायासाठी स्थळांतरीत झाले असले तरी त्यांचे गावातील मतदारयादीत नाव आहे. इतर निवडणुकीच्या मतदानाकडे पाठ फिरविणारे हे मतदारराजा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हमखास गावी येतात. त्यांना आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उमेदवारांकडून केली जाते. त्यामुळे स्थलांतरीत मतदारांची निवडणुकीनिमित्त हमखास गावभेट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.