सातपूर (जि.नाशिक) : नाशिकच्या कोरोना रुग्णांना मंगळवार (ता. १६)पासून अवघ्या एक हजार २०० रुपयांत रेमडेसिव्हिर औषध उपलब्ध करून देण्याचा निर्णय औषध प्रशासनाने घेतला आहे. राज्यात प्रथमच या प्रकारचा निर्णय होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
''रेमडेसिव्हिर'' आता केवळ बाराशे रुपयांत
सहआयुक्त माधुरी पवार यांच्या दालनात सोमवारी (ता. १५) झालेल्या विक्रेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नाशिकसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी एकीकडे वणवण, तर दुसरीकडे आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व आयुक्त अभिमन्यू काळे यांनी, रुग्णांना परवडेल अशा दरात हे औषध उपलब्ध होईल का, याची चाचपणी करण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने सहआयुक्त पवार यांनी नाशिकमधील मायलान कंपनीच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कमी किमतीत औषध उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे त्यांनी सागितले. त्यानुसार शहर व जिल्ह्यातील प्रमुख दहा रुग्णालयांत रुग्णांना बाहेरून औषध घेता येईल व ते केवळ एक हजार २०० रुपयांत उपलब्ध करून दिले जाईल, अशी सूचना झळकविण्यात आली.
स्टॉकिस्ट व विक्रेत्यांची बैठक
त्यानंतर सोमवारी शहरातील काही स्टॉकिस्ट व विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यात मालेगावच्या अशोक मेडिकलचे अमोल पवार, गेटवेल डिस्ट्रिब्यूटर्सचे कपिल आरोरा, सन फार्माचे पवन चंदानी, सिद्धिविनायक फार्माचे चेतन भामरे, चौधरी कंपनीचे गोरख चौधरी, पिंक फार्माचे दावल दिनाणी, ड्रग्ज इन्स्पेक्टर चंद्रकांत मोरे, सुरेश देशमुख, महेश देशपांडे, प्रशांत ब्राह्मणकर आदी उपस्थित होते.
रुग्णांना मोठा दिलासा
एका रुग्णासाठी रेमडेसिव्हिरचे सहा डोस मिळून ३२ हजार रुपये लागत होते. मात्र, आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता केवळ सात हजार दोनशे रुपयांत हे औषध उपलब्ध होईल. या औषधासाठी रुग्णाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधारकार्ड, नातेवाइकांचे आधारकार्ड व डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन अशी कागदपत्रे असणे गरजेचे असेल.
हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर
रुग्णांना हॉस्पिटलच्या बाहेर कमी किमतीत औषध उपलब्ध होत असेल, तर तशी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना याचा फायदा होईल.
-गोरख चौधरी, संचालक, चौधरी कंपनी
यांच्याशी साधा संपर्क (कंसात भ्रमणध्वनी क्रमांक)
* अशोक मेडिकल, मालेगाव- अमोल पवार (८६९८२६२९०९)
* गेटवेल डिस्ट्रिब्यूटर्स, गणेशबाबानगर, नाशिक- कपिल आरोरा (९८९०२९४२९४)
* सन फार्मा, धाडिवाल हॉस्पिटल, त्र्यंबक नाका- पवन चौधरी (८८८८८८९९९५)
* सिद्धिविनायक फार्मा, मुंबई नाका- चेतन भामरे (८७९६९८९८९८)
* चौधरी ॲन्ड कंपनी, गोळे कॉलनी- गोरख चौधरी (९८२२४७८४६२)
* पिंक फार्मसी, दिग्विजय हाउस, सीबीएस- धवल दिनानी (७९७७९०२६६२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.