नाशिक : एक सदस्यीय प्रभाग झाल्यास महिला आरक्षणामुळे मातब्बरांना प्रभाग सोडावे लागतील किंवा सत्तेच्या राजकारणातून पाच वर्षांसाठी बाहेर राहावे लागेल. त्यामुळे एकऐवजी द्विसदस्यीय प्रभागपद्धती अमलात आणावी, यासाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरबारात हजेरी लावणार आहेत. मार्चमधील अधिवेशनात आदेशात तसा बदल करण्याची मागणी केली जाणार आहे.
एक सदस्यीय प्रभाग पद्धत निवडणुकांमध्ये अमलात आणण्याचा निर्णय
२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मोदी लाट लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती अमलात आणली होती. या प्रभाग पद्धतीत अनेक नवीन चेहरे महापालिकांच्या सभागृहात दिसून आले होते. एका व्यक्तीला मतदान करताना अन्य तिघांना त्याचा लाभ मिळत असल्याचा हा परिणाम होता. आता राज्यात सत्तांतरण झाल्याने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सत्तेवर येताच भाजपला फायदेशीर ठरणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एक सदस्यीय प्रभाग पद्धत निवडणुकांमध्ये अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रमुख पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव
पुढील वर्षात राज्यात महत्त्वाच्या महापालिका, पालिकांची निवडणूक होणार असल्याने एक सदस्यीय प्रभाग पद्धती अमलात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना पन्नास टक्के राखीव जागा आहेत. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत पन्नास टक्के आरक्षणानुसार त्या जागा महिलांकडे केल्यास मातब्बर नेत्यांना प्रभाग सोडून अन्यत्र निवडणूक लढवावी लागेल किंवा घरातील महिलांना उभे करावे लागेल. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्यांच्या इच्छेला मुरड घालावी लागेल. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धती परवडणारी नाही. त्यापार्श्वभूमीवर नाशिक महापालिका निवडणुकीसाठी द्विसदस्यी प्रभाग पद्धती अमलात आणण्यासाठी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेणार असल्याचे समजते.
शिवसेनेची मोर्चेबांधणी
आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जानेवारीपासूनच मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. संघटना मजबूत करतानाच विभागनिहाय आढावा घेतला जाईल. यात इच्छुकांची चाचपणी होईल, तर सत्ताधारी भाजपविरोधात भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन शिवसेनेकडून सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.