सोयगाव (जि. नाशिक) : मालेगाव तालुक्यातील दुंधे माळीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिद्धी झोतात असते. येथील विद्यार्थी हे तंत्रस्नेही असून, तंत्रज्ञानाचा अध्ययन- अध्यापनात उपयोग करत असतात. येथील तंत्रस्नेही शिक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कोमल रौंदळ, जान्हवी रौंदळ, गणेश रौंदळ, मानसी बोरसे, दिव्या मोरे, ज्ञानेश रौंदळ या विद्यार्थ्यांनी क्यू आर कोड (क्वीक रिस्पॉन्स कोड) तयार करत परिसरातील झाडांची माहिती, परसबागेतील पालेभाज्या, फुलझाडांची माहिती एकत्रित केली आहे.
कोड स्कॅन केल्यावर मिळते झाडाची माहिती
विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची उद्दिष्टे पोहोचावेत म्हणून अध्ययन अध्यापनात डिजीटल साहित्य ही वापरली जातात. कोरोनाकाळात (Corona) ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाचेही विविध प्रयोग राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवण्यात माळीनगर शाळा यशस्वी ठरली होती. त्याचाच हा परिणाम असून, स्वयं अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना सोबत घेत परिसरातील कडूनिंब, वड, पिंपळ, गुलमोहर आदी विविध झाडांचे कोड, परसबागेतील कोथींबीर, कांदा, लसूण, मुळा इत्यादी पालेभाज्यांचे कोड व आंबा, बदाम, चिंच, पेरू या फळांच्या माहितीचे कोड मुलांनी मुक्तज्ञानकोश वेबसाईटवरून QR droid या ॲप्सच्या मदतीने क्यू आर कोड तयार केलेत. हे कोड स्कॅन केल्यावर यात झाड, फुल, फळ, पालेभाज्यांचे चित्र, माहिती, उपयोग यांची माहिती मिळणार आहे. याचा उपयोग मुले अधिक अभ्यास करण्यासाठी करत आहेत.
विद्यार्थ्यांनी एकत्र येत क्यू आर कोड हे पुठ्ठयावर चिपकवून काठीच्या सहाय्याने झाडावर टांगले आहेत. आता मुलांना याचा उपयोग होईलच पण, शाळेत येणाऱ्या पालकांनाही त्या विविध घटकांविषयी अधिक माहिती मिळणार आहे. यामुळे मुलांना शिक्षणाचा नवा अनुभव मजेदारपणे आणि परस्परसंवादाने सोबतीने घेता येणार आहे. आजच्या या डिजीटल युगात तंत्रस्नेही शिक्षकांसोबत तंत्रस्नेही विद्यार्थी घडणे, असणे खूप महत्वाचे आहे. या उपक्रमात मुख्याध्यापक राजेंद्र बधान व पालकांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
''तंत्रस्नेही महाराष्ट्रात तंत्रस्नेही विद्यार्थी घडणं खूप महत्वाचे आहे. पाठ्यपुस्तकातील अनेक संकल्पना ह्या अधिकच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून शिकता येणार आहेत.'' - भरत पाटील, तंत्रस्नेही शिक्षक
''दुकानात, बाजारात सर्व ठिकाणी क्यूआर कोड दिसतो आणि आम्ही तंत्रस्नेही कार्यशाळेत क्यू आर कोड शिकलो होतो. आता प्रत्यक्षात आम्हीच झाड, फुले, फळे, पालेभाज्यांचे कोड तयार केलेत. खूप मजा आली. आनंद झाला. भविष्यात परिसरातील सर्व झाडांना हे कोड लावू. जेणेकरून सर्वांना त्याच्याविषयी माहिती होईल.'' - जान्हवी रौंदळ, तंत्रस्नेही विद्यार्थिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.