Sri Swami Samvidananda Saraswati at Badrinath during Char Dham Yatra.
Sri Swami Samvidananda Saraswati at Badrinath during Char Dham Yatra. esakal
नाशिक

Importance of Chaar Dhaam Yatra : चार धाम यात्रेने परम सुखाची प्राप्ती : स्वामी संविदानंद

प्रतीक जोशी

नाशिक : साक्षात ईश्‍वर जेथे वसले आहेत, असा भारतभूमीला लाभलेले वरदान म्हणजे हिमालय. आशिया खंडात सर्वांत उंच पर्वत रांगांमध्ये हिमालयाचा उल्लेख येतो. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांच्या काठावर भारतीय संस्कृती विकसित झाली असल्याने हिमालयाला विशेष असे महत्त्व आहे. याच हिमालय पर्वत रांगांमध्ये हरिद्वार, बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री ही धार्मिक स्थळे आहेत.

या धार्मिक स्थळांना हिमालयातील ‘चार धाम’ असेही म्हटले जाते. भौगोलिकदृष्ट्या हिमालयात अत्यंत बिकट वाटेवर ही धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांची ही चार धाम यात्रा पूर्ण करण्यासाठी किमान सात दिवस लागतात. मात्र ही संपूर्ण यात्रा केवळ सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेत एका दिवसात नाशिक येथील कैलास मठ अधिपती श्री स्वामी संविदानंद सरस्वती यांनी पूर्ण करत धार्मिक पर्यटनाची विशेष नांदी उभी केली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण यात्रा स्वामी संविदानंद सरस्वती यांनी दिवाळीतील लक्ष्मीपूजनला पूर्ण केली. हिमालयातील या चार धाम यात्रेचे महत्त्व, यात्रेचे स्वरूप, मार्ग अन् यात्रेदरम्यानचे विलक्षण अनुभव स्वामीजींकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न... (Swami Samvidanand statement about Importance of Char Dham Yatra Nashik News)

यमुनोत्री धाम

स्वामी संविदानंद सरस्वती म्हणाले, की अनादी काळापासून चार धाम यात्रेला विशेष महत्त्व आहे. आपण मूलतः चार धाम म्हणजे बद्रिनाथ, द्वारका, रामेश्‍वर, जगन्नाथपुरी याबद्दल जाणतो. हे भारतील प्रमुख चार धाम आहेत. मात्र, यांसह केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री अन् बद्रिनाथ ही हिमालयातील चार धाम आहेत. जीवनात प्रत्येकाने चार धाम यात्रा एकदा तरी पूर्ण करावी. ही यात्रा करताना भारतातील चार धामसह हिमालयातील चार धाम यात्राही पूर्ण करावी.

यात्रा म्हणजे ‘या’, ‘त’, ‘रा’ अर्थात, यातना, दुःखातून तारणारी अन् भगवंताची भेट घालणारी अशी ही यात्रा. धर्मशास्त्रात ही चार धाम अत्यंत पवित्र आणि मोक्ष देणारी म्हणून वर्णन केलेली आहे. जे केल्याने मनुष्य जन्म सार्थकी लागून परम सुखाची प्राप्ती मनुष्याला होते. येथे पृथ्वी आणि स्वर्ग एकत्र होतात अन् मनुष्याला साक्षात परमेश्‍वराचे दर्शन घडते.

ही यात्रा म्हणजे परमेश्‍वराची लीला
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् ॥

अर्थात : परमेश्‍वराची जर कृपा असेल तर मुका सुद्धा बोलू लागतो अन् जो अपंग आहे तोही पर्वत सर करून जातो.

केदारनाथ धाम
बद्रीनाथ धाम

निसर्गाने मोठी साथ दिली

स्वामी संविदानंद सांगतात, की पंचवीस वर्षांपासून हिमालयाची यात्रा आम्ही करत आहोत, मात्र अशाप्रकारे एकाच दिवशी हिमालयातील चार धाम यात्रा करण्याचा योग कधी आला नाही. पूर्वी तरी ही यात्रा पूर्ण करण्यासाठी फारशी साधने नव्हती, मात्र आताचा काळ हा यंत्रांचा आहे तरीही यात्रा एका दिवसात सफल व्हावी, यासाठी अनेक वर्षांपासून परमेश्‍वराची प्रार्थना करत होतो आणि देवाने गाऱ्हाणे ऐकले अन् यंदाच्या दिवाळीला हा योग जुळून आला. या यात्रेचे प्रयोजन आखताना सर्व शासकीय परवानग्या प्राप्त झाल्या, हेलिकॉप्टर उपलब्ध झाले यांसह निसर्गाने मोठी साथ दिली.

मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत परमेश्‍वर त्याच्या द्वारी बोलावत नाही तोपर्यंत असा योग नाही, असे स्वामीजी आस्थेने सांगतात. यावरचा एक अनुभव स्वामीजी सांगतात, काही वर्षांपूर्वी भारताचे तत्कालीन दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी केदारनाथ दर्शनासाठी निघाले होते. राष्ट्रपती येणार म्हटल्यानंतर सर्व परिस्थितीची खातरजमा अगोदर केली गेली.

मात्र, तरीही वातावरणात असे काही विलक्षण बदल झाले, की राष्ट्रपती महोदय गरुडचट्टीपासून पुढे जाऊ शकले नाहीत. त्यांना त्यांची यात्रा पुढे ढकलावी लागली अन् महिनाभराच्या अवधीने ते केदारनाथला दर्शनासाठी पोचले. त्यामुळे जोपर्यंत ईश्‍वर आपल्याला आदेश देत नाही, तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले तरी तेथपर्यंत पोचू शकत नाही, असे स्वामी संविदानंद म्हणाले.

गंगोत्री धाम

लक्ष्मीपूजन दिवशी यात्रेला प्रारंभ

स्वामीजी यांनी २४ ऑक्टोबर लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी साडेसहाला डेहराडून येथून यात्रेला प्रारंभ करत बद्रिनाथच्या दिशेने प्रस्थान केले. ७ वाजून २० मिनिटांनी बद्रिनाथ धाम येथे पोचले. या वेळी तेथील तापमान मायनस ५ डिग्री होते. बद्रिनारायणाची पूजाअर्चा पूर्ण करून केदारनाथच्या दिशेने प्रस्थान केले. केदारनाथ येथे वातावरण निरभ्र अन् शांत होत. तेथेही मनोभावे केदारेश्‍वराची पूजा करून आशीर्वाद घेतले अन् यात्रेचा पुढचा टप्पा म्हणजेच गंगोत्री धामकडे प्रयाण केले. गंगोत्री धाम म्हणजे आपल्या देशातील अत्यंत पवित्र तथा पूजनीय अशा गंगा नदीचे उगम स्थान. येथील गोमुख हे तेथील विशेष. भयंकर वारे गंगोत्री धाम येथे वाहत होते.

गंगोत्री धाम येथे दर्शन, पूजा झाल्यानंतर अत्यंत खडतर वाट असणाऱ्या यमुनोत्री धामकडे प्रस्थान केले. गंगोत्रीहून यमुनोत्री येथील वाहन तळावर दुपारी तीनला पोचलो. मात्र तेथून पुढची वाट ही पायी किंवा घोड्याच्या सहाय्याने पूर्ण करावी लागते. वाटेत ९० अंश इतके उंच अन् खडतर चढाव लागतात. अशी ही खडतर वाट सरत यमुनोत्री धाम येथे यमुनोत्रीला पोचलो. तेथेही दर्शन, पूजा-अर्चना करून, यमुनेच्या उगम स्थानाचे दर्शन घेऊन सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी म्हणजे सूर्यास्तावेळी आमची यात्रा पूर्ण झाली.

हिमालयाचे विहंगम दृष्य

प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक गरम पाण्याची कुंडं

संपूर्ण यात्रेतील विशेष म्हणजे ही सर्व ठिकाणे अत्यंत थंड अशा ठिकाणी असली तरी येथील प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक गरम पाण्याची कुंड आहेत. यात यमुनोत्रीला असलेल्या कुंडातील पाणी इतके गरम असते, की आपण एखाद्या कापडात तांदूळ बांधून ते पाण्यात टाकले तर अगदी थोड्याच वेळात त्याचा भात तयार होईल. ही केवळ आणि केवळ ईश्‍वराची लीला आहे. यांसह अत्यंत खडतर अशी हिमालयातील चार धाम यात्रा एका दिवसात सूर्योदय ते सूर्यास्त काळात पूर्ण करण्याचा हा ‘दुर्लभतम् योग’ नाशिकला प्राप्त झाल्याचे अधिकाधिक समाधान आहे, असेही स्वामीजी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT