नाशिक : छत्तीसगड येथून नाशिकला निघून आलेल्या नवविवाहितेने पंचवटीतील आई-वडिलांकडे न जाता मैत्रिणीकडे राहण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यातून समाजात नामुष्की ओढावण्याची भीतीपोटी नवविवाहितेच्या आईने सोमवारी (ता.10) सायंकाळी पंचवटी पोलिस ठाण्याबाहेर स्वत:वर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले. गंभीररित्या भाजलेल्या आईची प्रकृती चिंताजनक आहे.
असा घडला धक्कादायक प्रकार!
हरजिंदर अमरितसिंग संधू (वय 55, टकलेनगर, पंचवटी) असे पेटवून घेतलेल्या महिलेचे नाव आहे. हरजिंदर यांची मुलगी अमनप्रित सिंग हिचा विवाह 18 जानेवारीला रायपूर (छत्तीसगड) येथील राजिंदर सिंग पड्डा यांच्याशी झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने मुलगी अमनप्रित दोन दिवसांपूर्वी रायपूर येथून सासरच्या कोणालाही न सांगता नाशिकला निघून आली. ती, पंचवटीत संधू कुटुंबीयांकडे न जाता, गंजमाळ येथील तिच्या मैत्रिणीकडे राहत होती. याप्रकरणी, रायपूर येथील सासरच्या मंडळींनी ती बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार केली, तशी माहिती संधू कुटुंबीयांना दिली. त्यामुळे तिचा शोध घेत असताना ती गंजमाळ येथे राहत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तिला घरी येण्यास वा सासरी जाण्यास विनवणी केली. परंतु तिने नकार दिला. त्यामुळे तिने जिवाचे काही बरेवाईट केले, तर सासर व माहेरच्या लोकांच्या त्रास होईल म्हणून संधू कुटुंबीयांनी सोमवारी (ता.10) पंचवटी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी अमनप्रित सिंग हिला पोलिस ठाण्यात बोलाविले. त्याठिकाणीही ती माहेरी वा सासरी जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे तिच्याकडून तसा जबाब लिहून घेतला जात होता.
अन् मोपेडच्या डिकीतील पेट्रोलने भरलेली बाटली अंगावर..
त्याचवेळी तिची आई हरजिंदर संधू या पोलिस ठाण्याबाहेर आल्या. त्यांच्या मोपेडच्या डिकीतील पेट्रोलने भरलेली बाटली स्वत:च्या अंगावर ओतून घेत पेटवून घेतले. त्यांच्या बचावासाठी पोलिस ठाण्यातील हवालदार शिवराम खांडवी, बाळासाहेब मुर्तडक धावले. तसेच, रिक्षातून त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीररित्या भाजलेल्या हरजिंदर संधू यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या नातलगांनी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सरकारवाडा पोलिसांना पाचारण केले होते. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे यांनी पंचवटी पोलिसांत धाव घेत माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.