विदर्भ

कोरोनाच्या दहशतीने आदिवासींची पुजाऱ्यांकडे धाव; जनजागृतीसाठी पायपीट

लीलाधर कसारे

भामरागड (जि. गडचिरोली) : कोरोना महामारीने (coronavirus) जगभर थैमान घातले असताना जिल्ह्याच्या अतिदुर्गम भामरागड परिसरातील आदिवासी बांधव आधुनिक औषधोपचार (Medication) घेण्याऐवजी कोरोनामुक्त होण्यासाठी पुजाऱ्यांकडे धाव घेत असल्याने नवीच समस्या निर्माण झाली आहे. अनेकजण अंधश्रद्धा (Superstition) आणि गैरसमजापोटी लस घेण्याससुद्धा नकार देत असल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी गावोगावी पायपीट करत हे सगळे गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. (Tribesmen run to the priest in terror of the corona)

शहरी भागांसोबत ग्रामीण भागातसुद्धा कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मात्र, लोकांमध्ये अनेक गैरसमज व अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे परिसरातील रुग्ण दवाखान्यात न जाता पुजाऱ्यांकडे जात आहेत. लस घेण्यासही नकार देत आहेत. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी गावागावात जाऊन जनजागृती करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

भामरागड तालुक्‍यातील बहुसंख्य जनता अशिक्षित व अंधश्रद्धाळू आहे. आरोग्याच्या बाबतीत मलेरिया (हिवताप) आजार बाराही महिने या परिसरात थैमान घालत असतो. काही अशिक्षित व अंधश्रद्धाळू रुग्ण अशावेळी दवाखान्यात उपचार न घेता पुजाऱ्याकडे जाऊन जीव गमावून बसतात. आता तर कोरोनाच्या संदर्भात लोकांमध्ये अनेक गैरसमज व अफवा पसरल्या आहेत. दवाखान्यात गेल्यावर कोरोना चाचणी करतात व लगेच गडचिरोलीला पाठवितात.

तेथे दवाखान्यात मारून टाकतात, मुत्रपिंड काढतात, अशा भ्रामक कल्पना नागरिकांमध्ये पसरल्या आहेत. त्यांच्यातील हे गैरसमज दूर न झाल्याने टायफॉईड, मलेरिया, सर्दी, खोकला, साधारण ताप यासाठी ते दवाखान्यात न जाता पुजाऱ्यांचा आधार घेत आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावांत जाऊन लस घेण्याची विनंती करीत आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासही अनेकजण नकार देताना दिसत आहेत.

जनतेतील गैरसमज दूर करून जनजागृती गरजेची आहे, हे लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार तालुक्‍यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी, कृषी अधिकारी तथा सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात घरोघरी जाऊन लोकांमधील गैरसमज दूर करून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास प्रोत्साहित करण्याचा निर्णय तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सत्य बाबी लवकर पसरत नाहीत

सत्य बाबी लवकर पसरत नाहीत मात्र, अफवा पटकन पसरतात. हाच प्रत्यय भामरागड परिसरात येत आहे. अनेक नागरिक कोरोनासदृश्‍य लक्षणे असूनसुद्धा स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा डॉक्‍टरांकडे जात नाहीत. उलट भूमका, गायता, गावपुजारी यांच्याकडे धाव घेत आहेत. पूजापाठ करून त्यांना तात्पुरता दिलासा मिळत असला, तरी पुढे रोग बळावला, तर प्राणसुद्धा जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेला, गैरसमजाला बळी न पडता, सरकारी केंद्रात चाचणी आपली चाचणी करून घ्यावी, योग्य उपचार घ्यावे आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कारवाईची गरज

कोरोनासंदर्भात काहीजण विनाकारण गैरसमज पसरवितात. समाजमाध्यमांवर अशा अफवा पसरविण्याचे प्रमाण खूप आहे. गावांमध्येही अनेकजण विनाकारण अफवा पसरवत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

(Tribesmen run to the priest in terror of the corona)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT