लाल किल्ल्यावरच तिरंगा का फडकवला जातो? तुम्हाला माहित आहे का?

Red_Fort
Red_Fort

नवी दिल्ली : दिल्लीस्थित लाल किल्ला केवळ भारतीय अस्मितेचे प्रतीक नाही, तर इतिहासातील बऱ्याच घटनांचा तो साक्षीदारही आहे. ७२व्या प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेला ट्रॅक्टर मोर्चा चिघळला आणि त्याचे लोण लाल किल्ल्यावर येऊन पोहोचले. त्यामुळे लाल किल्ला पुन्हा चर्चेत आला आहे. शेतकरी आंदोलनातील एका जमावाने लाल किल्ल्यात घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याठिकाणी त्यांचे ध्वज फडकवले. 

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण करतात. लाल किल्ला हा वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. त्यामुळेच २००७साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला. याच लाल किल्ल्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. 

लाल किल्ल्याचा इतिहास
मुघल बादशहा शाहजहाँनने लाल किल्ला बांधला. तत्कालिन काळात मोगलांची राजधानी आग्रा ही होती, पण शाहजहाँनने दिल्लीला आपली राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला. आणि राजधानीला शोभेल अशा लाल किल्ल्याची उभारणी झाली. सन १६३८ मध्ये लाल किल्ल्याची पायाभरणी झाली. आणि सुमारे दहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर लाल किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार, लाल किल्ल्याचा बराचसा भाग हा पांढऱ्या रंगाचा होता, पण जेव्हा या पांढऱ्या भागाची चमक फिकट होऊ लागली, तेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्या कारकिर्दीत लाल किल्ला लाल रंगाने रंगविण्याचा निर्णय घेतला. आणि किल्ल्याला सुरक्षा पुरविण्यासाठीची तटबंदी खूप उंच केली.

लाल किल्ल्याची ख्याती 
शाहजहाँन आणि औरंगजेब यांच्या कार्यकाळात लाल किल्ल्याची ख्याती शिगेला पोहोचली होती, परंतु जेव्हा मुघलांच्या कीर्तीचा अस्त व्हायला सुरवात झाली, तेव्हा लाल किल्ल्याचा दर्जाही कमी झाला. त्याला कारणही तसेच होते. लाल किल्ल्याच्या देखभालीसाठी बराच पैसा खर्च होत असे. याच कारणामुळे लाल किल्ला जवळपास ३० वर्षे दुर्लक्षित राहिला होता.

सन १७३९मध्ये पर्शियन शासक नादिर शाहने मोगलांचा पराभव करून लाल किल्ला लुटला. त्यानंतरही, मोगल बादशहा लाल किल्ल्यातच राहिले, आणि लाल किल्ल्याचे वैभव जवळजवळ संपुष्टात आले होते. सुमारे २०० वर्षे लाल किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. त्यानंतर लाल किल्ल्यावर इंग्रजांनी राज्य केले.

भारताच्या राजकारणाचा केंद्रबिंदू
सन १८५७च्या उठावात लाल किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. इंग्रजांविरुद्ध बंडाची ठिणगी टाकण्यात लाल किल्ल्याचा मोठा वाटा आहे. मुघल बादशहा बहादूर शाह जफरच्या नेतृत्वात लाल किल्ला राजकारणाचे केंद्र बनले. पण हे बंड अयशस्वी होताच इंग्रजांनी शेवटचा मुघल सम्राट बहादूरशाह जफरला ताब्यात घेऊन त्याची रंगून येथे रवानगी केली आणि लाल किल्ला पूर्णपणे इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. जेव्हा ब्रिटिशांनी भारतातून आपले बस्तान गुंडाळले तेव्हा कोहिनूर हिऱ्यासह लाल किल्ल्यातील अनेक मौल्यवान वस्तूंचा खजिनाही सोबत नेला. विशेष म्हणजे किल्ल्याचं फर्निचरदेखील इंग्रज त्यांच्या बरोबर घेऊन गेले होते.

लाल किल्ल्यावरच तिरंगा का फडकवला जातो?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावरील ब्रिटीश ध्वज उतरवून त्याठिकाणी तिरंगा फडकविण्यात आला. आणि पुन्हा एकदा सत्तेचे केंद्र म्हणून लाल किल्ल्याला महत्त्व प्राप्त झाले. राजकारणात प्रतीकांना खूप महत्त्व असते. यामुळेच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. आणि तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाला संबोधित करतात.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com