आंबेडकर विरुद्ध गांधी असं चित्र उभं राहिलेला 'पुणे करार' माहिती आहे का?|Ambedkar Jayanti | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poona Pact

आंबेडकर विरुद्ध गांधी असं चित्र उभं राहिलेला 'पुणे करार' माहिती आहे का?

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार (Poona Pact) हा २४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात, अशी मागणी या कराराद्वारे करण्यात आली होती. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो. (The Poona Pact was an agreement between Mahatma Gandhi and B. R. ambedkar on the reservation of electoral seats for the depressed classes)

२४ सप्टेंबर १९३२ रोजी, येरवडा जेलमध्ये या दिवशी पुणे करारावर सही करण्यात आली. या दिवशी ‘पुणे करार’ कागदावर अक्षरबद्ध झाला. तत्पूर्वी ब्रिटिश सरकारने योजिलेल्या लंडनस्थित गोलमेज परिषदेच्या दोन फेर्‍या पार पडल्या होत्या आणि तिसरी फेरी होणार, हे ठाऊक झाले होते. गोलमेज परिषदेच्या पहिल्या फेरीत महात्मा गांधी अनुपस्थित होते. डॉ. आंबेडकर मात्र उपस्थित होते व त्यांनी जातिप्रथेमुळे दलितांवर होणारा अन्याय तसेच दलितांची दुर्दैवी विपन्नावस्था ही कहाणी सगळ्यांसमोर मांडली होती.

दुसर्‍या फेरीत ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा जाहीर केला, तेव्हा दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळतील, हे जगाला कळले. महात्मा गांधीजींना दलितांसाठी वेगळी चूल मांडली जाणे मुळातच मान्य नव्हते. हिंदू समाजाची शकले पडणे, सवर्ण आणि दलित यांच्यात सदैव पक्की भिंत उभी राहणे, महात्मा गांधीजींना कदापि मान्य नव्हते. गांधीजींचा आणखी एक दावा होता, काँग्रेस पक्ष अवघ्या भारतवर्षाचे प्रतिनिधित्व करतो, तेव्हा डॉ. आंबेडकरांचा कुठला पक्ष जर दलितांची तरफदारी करण्यासाठी पुढे येत असेल तर ही घटनाही गांधीजींना न रुचणारी होती.

हेही वाचा: Ambedkar Jayanti: 131 किलोंचा केक ते भीमसैनिकांची गर्दी; पाहा फोटो

"मी दलित म्हणून माझ्या जन्मापासून सर्व त्या भेदभावांची शिकार झालो आहे व म्हणूनच अस्पृश्य जातींच्या दुखण्या-गार्‍हाण्यांना मीच वाचा फोडू शकतो, दलितांचा सच्चा प्रवक्ता या नात्याने या मंडळींची कैफियत मांडण्याचा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा माझा हेतू आहे व हा हेतू सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे." या आशयाचा बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद सर्वार्थाने समर्थनीय होता.

हेही वाचा: आठवण महामानवाची! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा

नुकतीच चाळीशी ओलांडलेला एक बुद्धिवान दलित युवक, साठी उलटलेल्या सुप्रतिष्ठित वृद्ध नेत्याला आव्हान देत होता, हे दृश्य अनोखे होते. साहजिकच भारतात आंबेडकरांच्या विरोधात रान पेटले. महात्मा गांधीजीही हट्टाने उपोषण करण्यास सिद्ध झाले. ब्रिटिश शासनाचा दलितांसाठी वेगळी चूल मांडण्याचा पवित्रा गांधीजींना पूर्णत: अमान्य होता व म्हणूनच ब्रिटिश शासकांनी दलितांसाठी वेगळे, स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याचे धोरण रद्द करावे, या उद्दिष्टपूर्तीसाठी गांधीजी उपोषणाला बसले.

"मुसलमान, ख्रिश्चन यांच्यासाठी स्वतंत्र राहुट्या उभ्या करण्यास गांधीजींचा पाठिंबा आहे, मग दलितांना मात्र स्वतंत्र मतदारसंघ का नाकारता?" आंबेडकरांचा हा सवाल होता.

हेही वाचा: Image Story : सिद्धार्थ कॉलेजनं जपलाय बाबासाहेबांचा अनमोल ठेवा

महात्मा गांधीजीही आपल्या भूमिकेशी चिकटून राहिले, तेव्हा मालवीय, जयकर, सप्रू वगैरे नेत्यांनी विधिमंडळातून दलितांसाठी १४८ जागा आरक्षित ठेवाव्यात, ७१ जागांपेक्षा ७७ अधिक जागा दलितांना याप्रकारे दिल्या जाव्यात, असा प्रस्ताव मांडला.

स्वतंत्र मतदारसंघातून प्रतिनिधी व मतदार-दोन्ही दलित असतात, तर आरक्षित मतदारसंघातून मतदारांमध्येे सवर्ण व दलित अशा दोन्ही वर्गांचा समावेश असतो. प्रतिनिधी मात्र केवळ दलित राहतात. डॉ. आंबेडकरांसमोर हा पर्याय ठेवण्यात आला. बाबासाहेबांना परिस्थितीतले ताणतणाव कळून चुकले. महात्मा गांधींचे प्राण वाचविण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघांचा हट्ट सोडून द्यावा आणि आरक्षित मतदारसंघांचा पर्याय मान्य करावा, या दिशेकडे निर्णयाचा काटा झुकला.

त्यांनी हाच निर्णय गांधीजींना कळविण्यास संमती दिली आणि हिंदू समाजात फूट पडणार नाही, सवर्णांकडून दलितांसाठी ७१ ऐवजी १४८ आरक्षित जागा सोडण्यात येतील, हा निवाडा सर्वमान्य ठरला. गांधीजींनी उपोषण सोडले. पुणे कराराद्वारे या निवाड्यावर मान्यतेची मोहोर उठली.

Web Title: The Poona Pact Was An Agreement Between Mahatma Gandhi And Ambedkar On The Reservation Of Electoral Seats For The Depressed Classes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top