चीनला भारताने पुन्हा दिला झटका; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या ७ बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 September 2020

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

भारत सरकारने मोठी कारवाई करताना पबजीसह 118 अॅप्सवर बंदी घातली आहे. कोरोना काळात होणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात शून्य प्रहर व प्रश्नोत्तराच्या तासाला कात्री लावल्याबद्दल विरोधक संतप्त झाले आहेत. विदेशात, लॉस एंजेलिसमध्ये अमेरिकी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाबाबत खातरजमा न झालेल्या माहितीचे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रीट्विट करताच ट्वीटरकडून ते डिलीट करण्यात आले.

Breaking - पबजीसह 118 चिनी Apps वर बंदी; भारत सरकारची मोठी कारवाई

चीन आणि भारत यांच्यात सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने मोठी कारवाई करताना पबजीसह 118 अप्सवर बंदी घातली आहे. याआधी भारताने 57 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यामध्ये टिकटॉक, शेअर इट या अॅप्सचा समावेश होता. आता नवीन बंदी घातलेल्या अॅपमध्ये पबजी मोबाइल लाइट, वी चॅट वर्क अँड वीचॅट रिडिंग यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे. सविस्तर बातमी-

कॅबिनेटचा मोठा निर्णय; आता सरकारी अधिकारी बनणार 'कर्मयोगी'!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता.२) एका मोठ्या मोहिमेस मान्यता देण्यात आली आहे. 'सरकारी बाबू' म्हणजेच नागरी सेवा अधिकाऱ्यांना आता 'कर्मयोगी' अभियानांतर्गत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे अभियान नागरी सेवा क्षमता वाढवण्यासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत (एनपीसीएससीबी) चालविले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सविस्तर बातमी-

प्रश्नोत्तराचा तास रद्द करणे ही लोकशाहीची हत्या; विरोधकांची सरकारवर टीका

कोरोना काळात होणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात शून्य प्रहर व प्रश्नोत्तराच्या तासाला कात्री लावल्याबद्दल विरोधक संतप्त झाले आहेत. १९५० नंतर एखाद्या सामान्य अधिवेशनात हे दोन्ही तास पहिल्यांदाच पूर्णतः रद्द केल्याचेही विरोधकांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठीच कोरोनाचे हत्यार बनवून हे दोन्ही तास रद्द करण्यात आल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, काँग्रेसचे शशी थरूर व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के. के. रागेश आदी अनेकांनी केला. सविस्तर बातमी-

PM CARES फंडात 5 दिवसांत 3 हजार 76 कोटी; पी चिदंबरम यांनी उपस्थित केले प्रश्न

कोरोना महामारीच्या काळात  (Corona Crisis) फक्त 5 दिवसांत पीएम केअर फंडामध्ये (PM CARES Fund) 3 हजार 76 कोटी रुपये जमा झाले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या लेखापरीक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2020 च्या निवेदनानुसार ही सर्वाधिक देणगी 27 ते 31 मार्च दरम्यान जमा झाली आहे. सविस्तर बातमी-

अमेरिकन पोलिसांच्या गोळीबारात कृष्णवर्णीय युवकाचा मृत्यू; घटनेनंतर लॉस एंजेलिसमध्ये तणावपूर्ण वातावरण

अमेरिकेतील (America)  जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर उसळलेली लाट अजून शांत झाली नसताना याठिकाणी आणखी एक प्रकरण समोर आले आहे. लॉस एंजेलिसमध्ये अमेरिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार घडला तेव्हा मृत व्यक्तीच्या हातात बंदूक होती. सविस्तर बातमी-

प्रेषित महंमदांच्या व्यंगचित्राचा निषेध करणार नाही; फ्रान्सच्या अध्यक्षांचं वक्तव्य

फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यनुएल मॅक्रॉन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, नियतकालिक शार्ली हेब्दोने प्रेषित महंमद पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र पुन्हा प्रसिद्ध केल्याचा मी निषेध करणार नाही. फ्रान्समध्ये सर्वांना आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. फ्रान्सच्या प्रत्येक नागरिकाने एकमेकांप्रती आदर राखावा आणि द्वेषाचा संवाद टाळावा. देशातील पत्रकाराला किंवा एका न्यूज संस्थेला काय छापावे आणि काय नाही, हे मी सांगू शकत नाही. सविस्तर बातमी-

ट्रम्प यांना ट्विटरचा दणका; कॉपी-पेस्ट आणि खोट्या माहितीमुळे हटवल्या पोस्ट

कोरोना संसर्गाबाबत खातरजमा न झालेल्या माहितीचे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रीट्विट करताच ट्वीटरकडून ते डिलीट करण्यात आले. खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न असल्याने ट्रम्प यांचे ट्विट हटवण्याची कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले. कोरोनाचा धोका कमी असून केवळ अमेरिकेत केवळ सहा टक्के प्रत्यक्ष या विषाणूमुळे दगावले असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला होता सविस्तर बातमी-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china pubg parliament apps karmayogi corona donald trump us election france muslim 2 September