दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 11 August 2020

आज दिवसभरात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 

नवी दिल्ली-  प्रसिद्ध उर्दू शायर राहत इंदोरी यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसरीकडे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे... कोरोना लसीबाबत मोठी बातमी हाती आली आहे. रशियाने जगातील सर्वात पहिली कोरोनाची लस तयार केली असल्याचं राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी घोषित केलं.

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन 

प्रसिद्ध उर्दू शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी ट्विटवरून सांगितलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सविस्तर बातमी-

प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर; प्रकृतीत सुधारणा नाही

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूवर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, 84 वर्षीय मुखर्जी यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सविस्तर बातमी-

सुशांत सिंह राजपूत प्रकरण : सुप्रीम कोर्टात कोण काय म्हणाले?

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुशांत राजपूतच्या आत्महत्येप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या रिया चक्रवर्तीने पाटणामध्ये दाखल प्राथमिक तक्रार मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांना येत्या गुरुवारपर्यंत बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ दिला आहे. त्यामुळं यावर आता गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. सविस्तर बातमी-

वडिलांच्या संपत्तीत मुलींना वाटा मिळणारच; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय 

सर्वोच्च न्यायालयाने वारसा संपत्तीच्या अधिकारा संदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, वडिलांचा मृत्यू हिंदू वारसा (सुधारीत) अधिनियम, 2005 लागू होण्याच्या आधी झाला असला तरीही  मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार आहे. हिंदू महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार मिळेल. सविस्तर बातमी-

पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना कोरोनावरील लस केव्हा येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोविड-19 वर प्रभावी लस तयार करण्यासाठी 2021 उजाडेल असे सांगितले जात असताना रशियाने (Russia) आश्चर्याचा धक्का दिला आहे. रशियाने कोरोनावरील पहिली लस (first vaccine) तयार केली आहे. शिवाय या लसीची नोंदणीही करण्यात आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन  (President Vladimir Putin) यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. सविस्तर बातमी-

100 दिवसांत एकही कोरोना रुग्ण न सापडलेल्या न्यूझीलंडमधून आली धक्कादायक बातमी

तब्बल 100 दिवस न्यूझीलंडमध्ये (New Zealand) एकही कोरोनाचा (Coronavirus) रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे जगभरातून या देशाचं कौतुक होत होतं. असे असतानाच न्यूझीलंडमध्ये 102 दिवसानंतर कोरोना रुग्ण आढळल्याची बातमी आली आहे. एका परिवारातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सविस्तर बातमी-

चीन सगळ्यात आधी सैनिकांना देतोय कोरोना लस!

 जगभरातील देश कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे दक्षिण चीन ते लडाखपर्यंत आपली दादागिरी दाखवणाऱ्या चीनने सर्वात आधी आपल्या सैनिकांना लस देण्यास सुरु केले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मदतीने तयार करण्यात आलेली कोरोना लस मोठ्या प्रमाणात सैनिकांना देण्यात येत आहे. सविस्तर बातमी-
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahat indori pranav mukharji vyadimir putin corona new zeland chin saushan singh rajput 11 august