
Khandesh Rathotsav : जिल्ह्यात रथोत्सवाला अनेक वर्षांची थोर परंपरा आहे. यात पारोळा, धरणगाव, चोपडा येथील रथोत्सवाला विशेष महत्त्व आहे. एकादशीला बुधवारी (ता. २५) या ठिकाणी रथोत्सव साजरा होत असून, भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
पारोळा तालुक्याचे ग्रामदैवत भक्तांची आकांक्षा पूर्ण करणारे श्री बालाजी महाराज यांचा ब्रह्मोत्सव तथा नवरात्र उत्सव सुरू असून, बुधवारी (ता. २५) एकादशीला रथोत्सव साजरा होत आहे. रथोत्सवाची साडेतीनशे वर्षांची असलेली परंपरा अखंडितपणे सुरू आहे.
यावेळी रथासमोर अनेक लेझीम मंडळ राहणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. दरम्यान, श्री रथाची मुख्य पूजा अर्चा संस्थानचे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी हे सपत्नीक करणार आहेत. (khandesh Rathotsav today in Parola Dharangaon Chopda jalgaon news)
महाजन परिवाराची परंपरा
गेल्या ४५ वर्षांपासून गुरव गल्ली येथील हिंमत महाजन यांचे कुटुंब भगवान महाजन, दिलीप महाजन, रवींद्र महाजन हे दरवर्षी रथाला केळीचे खांब देऊन आपली सेवा देत आहेत. यंदाचे त्यांचे हे ४६ वर्ष आहे. दरम्यान, रथोत्सवात येणाऱ्या भाविकांनी लहान मुले तसेच दागिने सांभाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी केले आहे. ब्रह्मोत्सवात भवानी गडाचे अध्यक्ष डॉ. मंगेश तांबे व त्यांचे सुपुत्र मोहित तांबे हे योग्य नियोजन करीत असतात.
कुंभार परिवाराकडून रोषणाई
श्री बालाजी महाराज यांच्या भव्य मंदिरात कुंभार कुटुंबीयांकडून दरवर्षी रोषणाई करूनमहाराजांची सेवा दिली जाते. या वेळी बापू कुंभार व त्यांचे बंधू हे ब्रह्मोत्सव काळात रोषणाई सुरळीत ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. रथोत्सवापुढे महिला व बालकल्याण सभापती अंजली करण पाटील यांचे जय जिजाऊ लेझीम महिला मंडळ हे दरवर्षी भाविकांचे मोठे आकर्षण ठरले आहे.
चोपड्यात रथोत्सवासह यात्रेची धूम
येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानची सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव उद्या (ता. २५) साजरा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी यांनी दिली आहे. श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव २५ व २६ ला होणार आहे. बुधवारी (ता.२५) सकाळी गोलमंदिराजवळील श्री बालाजी मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाला प्रारंभ होईल.
या वेळी सर्व मानकऱ्यांच्या हस्ते पूजाविधी देखील पार पडतील. त्यानंतर जयघोषात आशा टॅाकीज, ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर, रथ मार्गाने रथ आठवडे बाजार, पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल. त्या ठिकाणी रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी राहिल तर गुरुवारी (ता.२६) रथाच्या परतीच्या प्रवासाला सकाळी दहाला प्रारंभ होईल.
बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोलमंदिराजवळ येऊन यंदाच्या वहनोत्सव, रथोत्सवाचा समारोप होईल. या निमित्ताने रथोत्सव काळात शहरात दोन दिवसांची रथयात्रा देखील भरत असते. खानदेशासह मध्य प्रदेशातून भाविक रथाच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी येत असतात.
धरणगावात तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते महापूजा
शहरातील शेकडो वर्षांची परंपरा असलेला श्री बालाजी रथोत्सव (ता. २५) जल्लोषात साजरा होणार आहे. वाहनोत्सवातील मानाचे स्थान असलेल्या श्री मारुतीरायाच्या वहनाचे मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. श्री बालाजी रथाची महापूजा अश्विन शुद्ध एकादशी, बुधवारी (ता.२५) दुपारी साडेबाराला होणार असून, रथोत्सव मुहूर्ताप्रमाणे दुपारी १.३८ वाजता सुरुवात होईल.
महापूजेसाठी श्री नारायण भक्त पंथाचे मुख्य प्रवर्तक लोकशानंद महाराज, इंदूर येथील उद्योजक आलोक गुप्ता, पालकमंत्री गुलाबराव पाटील, पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेश पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, धरणगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रवीण कुडे, ॲड. ओम त्रिवेदी, सुनील बडगुजर, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पालिका प्रशासक व मुख्याधिकारी जनार्दन पवार, प्रशासकीय अधिकारी श्री. पारधी, पोलिस निरीक्षक उद्धव उमाले, कल्याणचे जगन्नाथ पोलाद महाजन, मंडळाचे अध्यक्ष दिलीप रामू पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या वेळी विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव केला जाईल. प. रा. हायस्कूलचे १९९७ च्या दहावीच्या बॅचतर्फे रक्तदान शिबीरही आयोजित केले आहे. उपस्थितीचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्याध्यक्ष जीवनसिंह बायस, सचिव प्रशांत वाणी, अशोक येवले, खजिनदार किरण वाणी व सर्व विश्वस्तांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.