हातात कुदळ, फावडे घेऊन 'या' बायांनी बांधला बंधारा !

अमित गवळे
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

मिळून साऱ्याजणी, सोडवू पाण्याची अाणीबाणी

पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावच्या महिलांनी "मिळून साऱ्या जणी, सोडवू पाण्याची अाणीबाणी" चा नारा देत गावचा पाणी टंचाई प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील यादव अाळीतील काही महिलांनी हातात चक्क कुदळ व फावडे घेत ओढ्यावर बंधारा बांधला. अाणि अामचे प्रश्न सोडविण्यासाठी अाम्ही देखिल सक्षम अाहोत हे सिद्ध केले.

गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी प्रश्न भेडसावतो. यावर मात करण्यासाठी अापल्याकडून खारीचा वाटा उचलावा असा विचार सिद्धेश्वर गावातील यादव अाळीतील काही महिलांनी केला. याला गावचे सरपंच उमेश यादव यांनी हिरवा कंदिल दाखविला व हवे ती मदत करण्याचे अाश्वासन दिले. महिलांनी देखिल गावच्या विकासासाठी सरपंचांना सहकार्य करण्याचा विश्वास दर्शविला. मग गावाजवळून जाणार्या ओढ्याचे पाणी अाडवून ते वापरावे, तसेच गुराढोरांना देखील या पाण्याचा वापर करता यावा यासाठी तेथे बंधारा बांधण्याचे ठरले गेले. हातात कुदळ, फावडे घेऊन महिलांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. कशाचीही तमा न बाळगता सिमेंटच्या गोण्या खडी, वाळू व मातीने भरुन डोक्यावर उचलून ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला. 

या महिलांमध्ये तरुण महिलांसह वृद्ध महिलादेखील झपाटून काम करत होत्या. बंधारा बांधण्यासाठी प्रत्यक्ष प्राची यादव, रेखा यादव, मनिषा पोंगडे, भारती यादव, माया यादव, विजया यादव, दर्शना जाधव, तारामती जाधव, रोहिणी यादव, सिंधू यादव व यमुना वाघमारे या महिला रणरागिणी सहभागी झाल्या होत्या. त्यांना सायली यादव, एैश्वर्या साळसकर व सुमन कोळी, अनंता साळसकर, अाशिष यादव, प्रयाग यादव, रवि यादव, गणेश सावंत, प्रसन्न यादव व रोहित साळसकर यांनी विषेश सहाय्य केले. अशा प्रकारे महिलांनी गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन चक्क श्रमदान करुन बंधारा बांधणे हि बाब सर्वांसाठीच अादर्शवत अाहे.

गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहीजे. अाम्ही सर्व महिला यापुढे संघटित होऊन गावातील समस्ता मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु. तसेच सरपंच उमेश यादव यांना विकास कामासाठी योग्य ते सहकार्य करु.
प्राची यादव, ग्रामस्थ

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad news pali women together built a bund, labor donation

फोटो गॅलरी