
नवी दिल्ली ः केंद्र सरकार नवे शैक्षणिक धोरण तयार करीत आहे. त्यात क्रीडा हा अभ्यासक्रमाचाच भाग असेल, तो आता भविष्यात अभ्यासेतर उपक्रम नसेल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी काही महिन्यांत देशातील क्रीडा स्पर्धांना सुरुवात होण्याची गरजही व्यक्त केली.
अनेक जण खेळ आणि शिक्षण भिन्न असल्याचे समजतात. माझ्या मते ते एकच आहे. त्यामुळे तो अभ्यासेतर उपक्रम होऊ शकत नाही, असे मत रिजिजू यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, खेळ हेसुद्धा शिक्षणच आहे. त्यामुळे तो अभ्यासेतर उपक्रम नाही. तसेच खेळास ऐच्छिक विषय मानणेही चुकीचे आहे. खेळ हा शिक्षणाचा भाग आहे, हे आता सर्वांनी स्वीकारायला हवे. भारताचे नवे शैक्षणिक धोरण अद्याप जाहीर झालेले नाही. ते अंतिम टप्प्यात आहे. खेळाचा शिक्षणात समावेश करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने कसोशीने प्रयत्न केले आहेत. तसेच खेळ हा अभ्यासाचा भाग होण्यासाठी तयार होणाऱ्या राष्ट्रीय समितीत माझा समावेश असण्यासाठीही प्रयत्न होत आहेत, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळाची स्थापना करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. आता मंडळास प्रत्यक्ष स्वरूप कसे देता येईल, या दिशेने समिती विचार करीत आहे, असे क्रीडामंत्र्यांनी सांगितले. खेळ आपल्या संस्कतीचा भाग होण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याकडे कोणतेही सरकारी धोरण नाही, अथवा त्याबाबत समाजात कोणतीही चळवळ नाही. आपल्या देशाला स्पोर्टिंग सोसायटी बनवण्याचे काम समाज करेल, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. क्रीडाजगतात वर्चस्व राखण्यासाठी आपल्या विचारात खेळास महत्त्व असण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारत हा महाकाय देश आहे. आपले ऑलिंपिकच्या पदक क्रमवारीत स्थान उच्च हवे होते. भारत या स्पर्धेत नियमितपणे सहभागी होत आहे. आपण 1928 मध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले. आपला सहभाग कायम आहे, मात्र या स्पर्धेतील आपल्या कामगिरीने मी समाधानी नाही. भारतास क्रीडा महासत्ता बनवण्याचे लक्ष्य हवे. त्या दिशेनेच आपण पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी संस्कृती तयार व्हायला हवी. त्याशिवाय ऑलिंपिक चळवळ भारतात रुजणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
चाहते नसले तरी स्पर्धेबाबत रस हवा
कोरोनाच्या आक्रमणामुळे क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविनाच होतील. या परिस्थितीत क्रीडा स्पर्धांचे जास्तीत जास्त प्रक्षेपण कसे होईल, याकडे आपण लक्ष द्यायला हवे. त्या स्पर्धात चाहत्यांचा रस कायम कसा राहील, याचा विचार करण्याची गरज आहे. प्रेक्षकांविनाही खेळाचे सामने रंगतदार होऊ शकतात, हे आपण शिकायला हवे. त्यामुळे सर्वांचाच आत्मविश्वास वाढेल. चाहते स्पर्धेच्या ठिकाणी नसले, तरी त्यांचा रस कायम असायला हवा, असेही क्रीडामंत्री म्हणाले.
ऑलिंपिक संग्रहालयासाठी प्रयत्नशील
ऑलिंपिक संग्रहालयाची उभारणी अत्यंत आवश्यक आहे. हा मोलाचा ठेवा असतो. आपल्याला उज्ज्वल परंपरा आहे. आपण ती जतन करायला हवी. हे संग्रहालय दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोनामुळे हे काम थांबले आहे. ते लवकरच सुरू होईल, याकडे लक्ष देणार आहे, असेही रिजिजू म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.