सदाभाऊ-शेट्टींची दोस्ती तुटली... मनं विभागली

राजकुमार चौगुले 
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुख्यमंत्र्यांशी जवळीक नडली 
मंत्री झाल्यानंतर सदाभाऊंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढविली. जशी त्यांची जवळीक वाढली तसे संघटनेचे कार्यकर्तेही लांब जाऊ लागले. अनेक प्रश्‍नावरून संघटनेचे कार्यकर्ते व सदाभाऊ यांच्यात छुपा वाद होऊ लागला. माध्यमात याबाबतच्या चर्चा असल्या तरी दोघेही स्पष्टपणे इन्कार करत होते; पण ज्यावेळी अतीच झाले, त्या वेळी मात्र एकमेकांवर आरोप सुरू झाले आणि त्याचे पर्यवसान सदाभाऊंच्या हकालपट्टीवर झाले.

कोल्हापूर : वादाच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नौकेचा टेकू अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढून घेतला. आता सदाभाऊंना इतरांच्या मदतीने "नांगर' टाकावा लागणार असला तरी सदाभाऊंची झालेली हकालपट्टी मात्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला उद्विग्न करणारी ठरली आहे. शेतकरी संघटनांचा फुटीचा हा अध्याय शेतकऱ्यांना दिग:मुढ करणारा ठरत आहे. सदाभाऊंवरील कारवाईचे वृत्त पसरताच संघटनेचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरात शांतता पसरली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तर एक स्तब्धता जाणवून आली. 

गेल्या दशकाहून अधिक काळ एकत्र असणारी ही जोडी भविष्यात आता एकत्र दिसणार नाही, याची रुखरुख स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. स्वाभिमानीच्या पडत्या काळात एकमेकांत असलेले मतभेद विसरून ही जोडी सातत्याने राजकीय पक्षांवर टीका टिप्पणी करत आली. ऊसदरवाढीसह अन्य पिकांवर आंदोलन करीत असताना शेलक्‍या शब्दांत टीका करायची आणि शेट्टी यांनी तांत्रिक मुद्दे घेत सभा जिंकायच्या ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेत राहिली आहे. येथून पुढच्या काळात ही सर्ज्या राज्याची जोडी मात्र कोणत्याही सभेत आता एकत्र दिसणार नाही. 

राजकीय स्पर्धेमुळे संघटनेच्या ताकदीत विभाजन 
पाचगणी येथे पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी संघटनेच्या सभेत शरद जोशी यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने श्री. शेट्टी यांनी कोल्हापुरात येऊन स्वतंत्र संघटनेची स्थापना केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना हे नाव देऊन मोठ्या जोमाने काम केले. स्थानिक नेता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात या संघटनेला शेतकऱ्यानी उचलून धरले. शेट्टी यांच्या दिमतीला उल्हास पाटील, सावकार मादनाईक, सदाभाऊ खोत यांच्यासारखी तगडी फळी असल्याने श्री. शेट्टी यांचा आमदार, खासदारपर्यंतचा प्रवास सुखकर झाला हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. आंदोलनात करताना श्री. शेट्टी यांच्या सहकाऱ्यांनी तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली. संघटनेने राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर मात्र प्रत्येकाला संधी देण्याबाबत विचार झाला. आणि इथेच चुकले. कोण जवळचा कोण लांबचा या घोळात संघटनेची फुटीकडे वाटचाल सुरू झाली. आमदारकीचे तिकीट कोणाला द्यायचे याबाबत वाद होऊन स्वाभिमानीचे दुसऱ्या फळीतील कट्टर कार्यकर्ते उल्हास पाटील यांनी संघटनेतून फारकत घेतली. यातून सावरण्यासाठी श्री. शेट्टी यांनी सदाभाऊंना "प्रमोट' केले. माढ्यात खासदारकीच्या निवडणुकीत निसटता पराभव पत्करल्यानंतर सदाभाऊ निराश झाले; पण संघटनेने त्यांना संधी देण्याचे सांगत पुन्हा निराशा झटकायला लावली. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर संघटनेने शब्द पाळून सदाभाऊंना मंत्री केले; पण यानंतर मात्र घोडे पेंड खाल्ले. 

मुख्यमंत्र्यांशी जवळीक नडली 
मंत्री झाल्यानंतर सदाभाऊंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढविली. जशी त्यांची जवळीक वाढली तसे संघटनेचे कार्यकर्तेही लांब जाऊ लागले. अनेक प्रश्‍नावरून संघटनेचे कार्यकर्ते व सदाभाऊ यांच्यात छुपा वाद होऊ लागला. माध्यमात याबाबतच्या चर्चा असल्या तरी दोघेही स्पष्टपणे इन्कार करत होते; पण ज्यावेळी अतीच झाले, त्या वेळी मात्र एकमेकांवर आरोप सुरू झाले आणि त्याचे पर्यवसान सदाभाऊंच्या हकालपट्टीवर झाले. हर निर्णय खचितच कार्यकर्त्यांना नाराजीत लोटणारा आहे. आता संघटनेची एकला चलो रे चीच भूमिका असणार आहे. सगळा भार शेट्टी यांच्यावरच असणार आहे. यामुळे संघटनेची वाटचाल आगामी काळात कशी होते, यावरच संघटनेचे यश अवलंबून असणार आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Rajkumar Chougule writes about Sadabhau Khot and Raju Shetty