कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द; सेलिब्रिटींच्या सुपाऱ्यांवर पडले पाणी...

संतोष भिंगार्डे 
Thursday, 6 August 2020

दहीहंडी उत्सव सगळीकडे मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. अनेक ठिकाणी विविध मंडळे मोठमोठ्या हंड्या उभारतात आणि विविध ठिकाणची गोविदा पथके येऊन ती हंडी फोडतात.

मुंबई : दहीहंडी उत्सव म्हटलं की कलाकारांना एका दिवसामध्ये लाखो रुपयांची कमाई करण्याचा दिवस. काही कलाकार मैत्रीखातर दहीहंडीला विविध ठिकाणी हजेरी दरवर्षी लावत असतात. टीव्ही तसेच चित्रपटातील कलाकार मालिका किंवा चित्रपटांचे जोरदार प्रमोशन्स करण्यासाठी हजेरी लावतात. तर काही कलाकार मोठमोठी सुपारी घेतात. एका दिवसात लाखो रुपये हे कलाकार सहज खिशात घालतात. परंतु यंदा कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार नाही. त्यामुळे सेलिब्रेटींच्या लाखो रुपयांच्या सुपारीवर पाणी पडले आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! तुळशी धरणानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हे' धरणही भरले

दहीहंडी उत्सव सगळीकडे मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. अनेक ठिकाणी विविध मंडळे मोठमोठ्या हंड्या उभारतात आणि विविध ठिकाणची गोविदा पथके येऊन ती हंडी फोडतात. अशा वेळी मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. मोठमोठ्या सेलिब्रेटींपासून ते छोट्या छोट्या सेलिब्रेटींना निमंत्रित केले जाते. काही नायक-नायिकांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबरच एखादा सामाजिक संदेशही दिला जातो. यातील काही कलाकार एक दिवसांत लाखो रुपये सहज खिशात घालतात.

महाडमध्ये आजही मुसळधार पावसामुळे पुराची भीती कायम, दरड कोसळल्याने घरांचं नुकसान

छोट्यातल्या छोटा कलाकार एखाद्या मंडळाला भेट देण्यासाठी पंचवीस हजार रुपये सहज घेतो. एकाच दिवशी चार ते पाच मंडळे तो सहज करतो. सकाळपासूनच त्याची सुरुवात होते आणि रात्री उशिरापर्यंत तो विविध मंडळांना भेटी देतो. जितका कलाकार मोठा तितकी त्याची सुपारी भारी. केवळ भेट देऊन अभिवादन करणे, एखादे गाणे म्हणणे किंवा डान्स करणे याप्रमाणे मानधन आकारले जाते. काही कलाकार केवळ मैत्रीखातर येतात आणि सामाजिक संदेश देऊन जातात. केवळ हजेरी लावणे, एखादे गाणे म्हणणे किंवा परफाॅर्म करणे याकरिता वेगवेगळे मानधन आकारले जाते. केवळ मुंबईतच नाही तर पुणे-नाशिक-कोल्हापूर-सोलापूर-नागपूर येथेही सेलिब्रेटी विविध दहीहंडी उत्सवाला हजेरी लावीत असतात. तेथेही तोच फार्म्युला अमलात आणतात. उलट मुंबईपेक्षा अन्य ठिकाणी सेलिब्रेटींना भलतीच मागणी असते. 

मोठी बातमी : 5 ऑगस्टपासून सुरू झालेले मॉल 6 ऑगस्टपासून बंद, महापालिका आयुक्तांचा निर्णय

याबाबत अभिनेत्री नम्रता गायकवाड म्हणाली, की सरकारने घेतलेला निर्णय आरोग्याच्या दृष्टीने एकदम उत्तम आहे. परंतु आम्हाला आर्थिक फटका बसलेला आहे. पण त्यापेक्षा आपले आरोग्य महत्त्वाचे. दरवर्षी मी ठाणे, वाशी आणि कल्याण येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावते. परंतु यावर्षी दहीहंडी सेलिब्रेशनला मी मुकणार आहे. अभिनेत्री दीप्ती धोत्रे म्हणाली, की गेल्या वर्षीदेखील कोल्हापूर-सांगली वगैरे ठिकाणी महापूर आल्यामुळे दहीहंडी उत्सव म्हणावा तसा साजरा करण्यात आला नव्हता आणि आताची परिस्थिती निराळी आहे. सगळ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आर्थिक फायदा किंवा तोटा हे पाहण्यापेक्षा सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. शिवाय आम्हालाच नुकसान सहन करावे लागले आहे असे काही नाही तर मोठमोठ्या उद्योगांना फटका बसलेला आहे. त्यामुळे आता पुढील दहीहंडीची वाट पाहणे हे योग्य. आतापर्यंत जे मिळाले आहे त्यामध्ये समाधानी आहे.

मुंबईत पुन्हा महाभयंकर पाऊस होऊ शकतो, 'ही' आहे तारीख....

अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली, की आता दहीहंडी व गणेशोत्सव असे सगळेच सण अगदी साध्या पद्धतीने साजरे होणार हे माहीत होतेच  मी गेली दोनेक वर्षे कोणत्याही अशा उत्सवाला हजेरी लावलेली नाही आणि त्याला कारण माझ्या बजेटमध्ये ते बसलेले नाही. 

----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona affects on dahihandi festival, many celebtrities will not get invitation