esakal | कोविड सेंटरसाठी नेते, संस्था, देवस्थान धावले; दीड हजारांवर रुग्ण उपचार

बोलून बातमी शोधा

corona updates
कोविड सेंटरसाठी नेते, संस्था, देवस्थान धावले; दीड हजारांवर रुग्ण उपचार
sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या (Coronavirus Infection) फैलावाचा वेग वाढलेलाच आहे. सक्रिय रुग्णसंख्या १२ हजारांच्या पुढे गेली आहे. प्रमुख उपचार केंद्रांमधील गर्दी टाळण्यासाठी सर्कलनिहाय कोविड सेंटरची (Covid Centre) गरज असा ‘सकाळ’ने सुचविलेल्या पर्यायाला भरभरून प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, देवस्थान, पतसंस्थांनी लोकसहभागातून तब्बल ३४ कोविड केअर सेंटर सुरु केले आहेत. या कोविड केअर सेंटरमधील खाटांची क्षमता अडीच हजारांच्या घरात असून सद्यःस्थितीत साधारण दीड हजारांवर सौम्य लक्षणांची रुग्ण या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रोजच दीड हजारांच्या घरात कोविड रुग्ण आढळत आहेत. अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बीडचे जिल्हा रुग्णालय (Beed District Hospital), लोखंडीचे जम्बो कोविड रुग्णालयांसह विविध शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांत १२ हजारांच्या आसपास खाटांची सोय आहे.(Beed Latest News Political Parties, NGOs, Religious Trust Helps To Covid Centre)

हेही वाचा: औरंगाबादेत १६ मेपासून हेल्मेट सक्ती, खंडपीठाने खडसावल्यानंतर पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’

सध्या सात हजारांच्या दरम्यान रुग्ण उपचाराखाली आहेत. आजघडीला कोविड सेंटरमध्ये खाटा उपलब्ध असल्या तरी खर्च आणि मोठ्या संस्थांवर पडणारा ताण यामुळे प्रशासनाची दमछाक होत होती. रुग्णांनाही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. यामुळे ‘सर्कलनिहाय कोविड सेंटरची गरज’ असा पर्याय ’सकाळ’ने ता. २६ एप्रिलच्या अंकात सुचविला होता. सेंटर कुठे सुरु करता येतील, त्यात कोणी सहभाग द्यावा, मनुष्यबळ कसे उपलब्ध करता येईल असे सर्व मार्गही ‘सकाळ’ने सुचविले होते. याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि जिल्ह्यात मंगळवार (ता. चार) पर्यंत तब्बल ३४ कोविड केअर सेंटर मंजूर होऊन यातील ३० कोविड केअर सेंटर कार्यान्वित देखील झाले. यासाठी शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून डॉक्टर्स, स्टाफ, नर्स, वॉर्ड बॉय उपलब्ध करून दिले आहेत. तर, संबंधित नेते, संस्थांनी खाटा, जेवण व इतर सुविधा स्वत: उपलब्ध करून दिल्या आहेत.

हेही वाचा: पहिलीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा सर्पदंशाने जागीच मृत्यू

वाढत्या कोविड सेंटरचे असे होताहेत फायदे : गावाशेजारीच उपचाराची सोय असल्याने लोक तपासणी करून घेऊ लागले. जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईचे स्वाराती व लोखंडीच्या रुग्णालयांत होणारी गर्दी कमी झाली. रुग्णांची संख्या पांगल्याने ओरड, आरोप कमी झाले. गावाजवळच उपचाराची सोय झाल्याने येण्या-जाण्याचा खर्च, तारांबळ वाचली. प्रशासनाला ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स उपलब्ध करण्यास वेळ मिळत आहे. परिसरातच उपचारामुळे रुग्णाला घरचे जेवण व नाष्टाही देता येत आहे. जेवणाबाबतच्या तक्रारीही संपतील. एखादा रुग्ण उपचारासाठी दूरच्या केंद्रांवर नेताना त्याच्यासोबत तीन चार लोकांना जाण्याने संसर्गाचा धोकाही टळला. गर्दीत उपचार नसल्याने लोकांच्या मनावरील दडपणही कमी झाले.

हेही वाचा: नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंचाची गोळी झाडून हत्या

लोकसहभागातून उभारलेले कोविड सेंटर (कंसात खाटा)

मानवलोक अंबाजोगाई (१००). बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा (५०). खंडेश्वर विद्यालय, कुसळंब. (५०). गुरुगणेश मिश्री जैन प्रतिष्ठान चौसाळा. (७०). रेणूकामाता कृषी विकास प्रतिष्ठान, केज (५०). बाळासाहेब आजबे मित्रमंडळ, लोणी (५०). आष्टी तालुका दूध संघ, लोणी (५०). कामधेनू मंगल कार्यालय पिंपरखेड (५०). धामनेश्वर मंगल कार्यालय, धामणगाव (५०). आष्टी तालुका दूध संघ, कडा (५०). आष्टी तालुका दूध संघ टाकळसिंग (५०). मच्छिंद्रनाथ देवस्थान, अंमळनेर (५०). सक्करबाई मुथ्था औ. प्र. संस्था डोंगरकिन्ही (५०). मच्छिंद्रनाथ देवस्थान पारगाव घुमरा (५०). राष्ट्रवादी काँग्रेस भवन बीड (५०). मच्छिंद्रनाथ देवस्थान, निमगांव मायंबा (५०). बापूराव घुमरे सेवाभावी संस्था, पारगाव घुमरा (५०). द्वारका प्रतिष्ठान, कडा (५०). फार्मर्सफ्रेंड ऑर्गनिक प्रोड्युसर कंपनी, लोळदगाव (२५). तुळजाभवानी अर्बन बँक, भाटवडगाव (५०). गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, परळी (१००). अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान बीड (२००). सुयोग मंगल कार्यालय, कडा (५०). सरस्वती सेवाभावी संस्था, भाटवडगाव (११०). अजित नॅशनल स्कूल, गंगामसला (५०). बाळासाहेब आजबे काका मित्रमंडळ, खडकत (५०). रामतीर्थ सेवाभावी संस्था, सालेवडगाव (५०). मच्छिंद्रनाथ देवस्थान, नायगाव (५०). त्रिमुर्ती मंगल कार्यालय, वडवणी (३०). आनंद मंगल कार्यालय, वडवणी (९०). स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था, नेकनूर (६०). जिल्हा परिषद शाळा नेकनूर (५०). साई सेवाभावी संस्था वाघळुज (५०).

हेही वाचा: कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयाच्या दारातच पडून, कोणी येईना मदतीला!!

समाजातील दाते पुढे आल्याने प्रशासनाला गंभीर रुग्णांसाठीच्या उपचार यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करता येत आहे. जिल्ह्याने राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला.

- रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी

लोकांना स्थानिक पातळीवर उपचार मिळत असल्याने त्यांचा पैसा वाचून गैरसोय टळली. यामुळेच रोज दीड हजार रुग्ण आढळत असतानाही आपली यंत्रणा सक्षमपणे उपचार करत आहे.

- अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

लोकसहभागातून ३४ कोविड केअर सेंटर्सला मान्यता देऊन मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. यातील ३० कार्यान्वित झाले आहेत.

- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी