बियाणे उत्पादनातील पितामह बद्रीनारायण बारवाले यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

जालनाः "महिको'च्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत एकहाती क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वातंत्र्यसैनिक बद्रीनारायण बारवाले (वय 87) यांचे आज (सोमवार) मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री साडेआठला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जालनाः "महिको'च्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत एकहाती क्रांती घडवून आणणारे उद्योजक आणि स्वातंत्र्यसैनिक बद्रीनारायण बारवाले (वय 87) यांचे आज (सोमवार) मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री साडेआठला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जालना येथील महाराष्ट्र हायब्रीड सीड्‌स कंपनीचे (महिको) चेअरमन, संस्थापक असलेल्या बद्रीनारायण बारवाले यांनी आपल्या कर्तृत्वातून जालना जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. बियाणे निर्मितीत त्यांनी घडवलेल्या क्रांतीमुळे बियाणे उद्योग हे एक स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. भरपूर उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा शोध लावल्यानंतर त्याच्या देशभर वितरणाच्या, साठवणुकीच्या सुविधांचा आणि त्यासंबंधी इतर अनेक पूरक व्यवसायांचाही विस्तार देशात झाला. यातून मोठीच रोजगारनिर्मितीही झाली.

अल्प परिचय
बद्रीनारायण रामूलाल बारवाले यांचा जन्म हिंगोली येथे 27 ऑगस्ट 1930 रोजी झाला. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ आणि बापूसाहेब काळदाते यांच्यासोबत त्यांनी काम केले. 1964 मध्ये "महिको'ची स्थापना करून बियाणे आणि अन्नधान्य निर्मितीमध्ये क्रांती घडवली. सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेचे ते काही काळ सदस्य व नंतर उपाध्यक्ष राहिले. जून 1993 मध्ये जालना येथे बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच 1998 मध्ये गणपती नेत्रालय स्थापन करून दीनदुबळ्या, गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. अन्नसुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना जागतिक पातळीवरील कृषी क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा जागतिक अन्न पुरस्कार (वर्ल्ड फूड प्राईज) देऊन सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने 2001 मध्ये त्यांचा "पद्मभूषण' पुरस्कार देऊन गौरव केला.

अनेक पुरस्कारांचे मानकरी
त्यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल 1989 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा राष्ट्रीय संशोधन आणि विकास पुरस्कार, 1990 मध्ये इंटरनॅशनल सीड्‌स ऍण्ड सायन्स टेक्‍नॉलॉजीचा पुरस्कार, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचा पुरस्कार, 1996 मध्ये फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल सीड्‌स मॅनचे मानद सदस्यत्वही देण्यात आले.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: jalana news badrinarayan barwale passes away