फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

जीवन सोनटक्के
सोमवार, 31 जुलै 2017

खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून निंभोरा येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर ताथोड यांनी विष पिऊन करून रविवारी (ता. ३०) रात्री आत्महत्या केली. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. नंतर मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अस्पायर व विस्तार फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

अकोला : खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून निंभोरा येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर ताथोड यांनी विष पिऊन करून रविवारी (ता. ३०) रात्री आत्महत्या केली. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. नंतर मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अस्पायर व विस्तार फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

निंभोरा येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर ताथोड यांनी घर बांधकामासाठी तसेच किराणा दुकानासाठी विस्तार फायनान्स व अस्पायर फायनान्स कंपनीकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करीत असताना २० हजार रुपये थकीत होते. तीन महिन्यांचा हप्ता राहीला होता. येत्या आठ दिवसांत रक्कम पूर्णपणे परतफेड करण्याचे वचन किशोर ताथोड यांनी अस्पायर कंपनीचा कर्मचारी नागेश शिरसाट, अनिल गाठे व विस्तार कंपनीचा कर्मचारी सोनटक्के व त्याचा मित्र यांना दिले होते. तरीही या चौघांकडून त्यांना थकीत कर्ज भरण्यासाठी सतत त्रास दिल्या जात होता.

संशयित आरोपींनी किशोर ताथोड यांच्या घरी रविवारी ते घरी नसताना जाऊन त्यांच्या पत्नीस शिवीगाळ केली. यावेळी त्यांचा शिवम ताथोड (११) हाही घरी होता. वडील घरी आल्यानंतर त्याने या संदर्भात संपूर्ण संभाषण व आईसोबत केलेल्या व्यवहाराबद्दल त्यांच्याकडे कथन केले. यामुळे वैतागलेल्या श्री. ताथोड हे रात्री आठ वाजता किरणा सामान घेऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडले. थोड्यावेळाने ते घरी परत आले. पत्नी व मुलगा झोपल्यावर ते विष प्यायले. त्यांच्या पत्नीला रात्री जाग आली आणि पती घरात नसल्याचे त्यांनी पाहिले. त्यांचा शोध घेण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. घराच्या समोरील अंगणात पती खाली बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यावर गावकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. अकोट फैल पोलिस स्टेशनला सविता ताथोड यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. परंतु, प्रकरण गंभीर असल्याचे पाहुण त्यांनी त्यांच्या फिर्यादीवरून खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा नोंदविला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Marathi news akola news farmer commits suicide due to debt