नगर : खरवंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित फाटके अपात्र

सुनील गर्जे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

खरवंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित रामचंद्र फाटके यांनी २१ ते २६ ऑक्टोबर २०१५ या काळात ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले होते. याबाबत ग्रामविकास अधिकारी बी. एस.महाजन यांनी ता. २९ मार्च २०१६ रोजी लेखी अहवाल नेवासे गटविकास अधिकारी यांना सादर केला होता.

नेवासे : ग्रामपंचायतीला पाच दिवस कुलूप लावल्याप्रकरणी खरवंडी (ता. नेवासे) येथील उपसरपंच अजित रामचंद्र फाटके  यांना अपात्र ठरविण्याचा आदेश नुकताच नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिला आहे. 

खरवंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित रामचंद्र फाटके यांनी २१ ते २६ ऑक्टोबर २०१५ या काळात ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले होते. याबाबत ग्रामविकास अधिकारी बी. एस.महाजन यांनी ता. २९ मार्च २०१६ रोजी लेखी अहवाल नेवासे गटविकास अधिकारी यांना सादर केला होता. त्यात त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये कार्यवाही होण्याची विनंती करण्यात आली होती. 

गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे पाठविला होता. त्यांनी ग्रामपंचायत अपात्रता अपील (क्र.७/२०१६) विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कडे सादर केले होते .त्यावर सुनावणी होवून निकाल देण्यात आला. उपसरपंच अजित रामचंद्र फाटके यांच्यावतीने बाजू मांडण्यात आली की ग्रामविकास अधिकारी यांनी केलेले गैरकृत्य उघडकीस आणल्याने द्वेषातून खोट्या तक्रारी करून खोट्या मजकुराचा अहवाल पाठविला. त्यामुळे चौकशी अहवाल फेटाळून लावावा. सामनेवाला यांचे म्हणणे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल व संचिकेतील कागदपत्रे विचारात घेवून फाटके यांनी सादर केलेला दस्तवेज वस्तुस्थितीस धरून नसून जाणीवपूर्वक ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले असल्याचे विभागीय आयुक्तांनी म्हटले. कामकाज बंद पाडून पदाचा दुरूपयोग केला असल्याचे व त्यांच्या विरूद्ध ग्रामपंचायत अधिनियम नुसार कार्यवाही केल्याचे म्हटले आहे.

मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या ता. १३ जुलै २०१६ च्या पत्रात उपसरपंच अजित रामचंद्र फाटके यांनी ता. २१ ऑक्टोबर २०१५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावल्याबाबत पंचनामा करण्यात आला असून त्यावर गोरक्षनाथ विश्वनाथ कु-हे, कैलास अंबादास फाटके, भरत संतराम फाटके, आबासाहेब जबाजी फाटके, व दत्तात्रय माधव थोरात यांच्या स्वाक्ष-या आहेत. ता. २६ ऑक्टोबर २०१५ रोजी ग्रामपंचाय कार्यालय उघडले त्यावेळी केलेल्या पंचनाम्यावर देखील पाच ग्रामस्थांच्या सह्या आहेत. अजित रामचंद्र फाटके यांनी  ता. २१ ऑक्टोबर रोजी कोणतीही पुर्वसुचना न देता कुलूप लावल्यामुळे त्यांच्या विरूद्ध शिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. 

उपसरपंच अजित रामचंद्र फाटके यांनी ग्रामपंचायतकार्यालयास कुलूप लावून कामकाज बंद पाडून पदाचा दुरूपयोग करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचे सिध्द होत असल्याने ते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार उपसरपंच पदावर राहण्यास अपात्र (अनर्ह)  ठरविण्यास पात्र ठरतात .त्यांना उपसरपंच पदावर राहण्यास निरर्ह ठरविण्यात येत असल्याचे आयुक्त महेश झगडे यांनी निकालात म्हटले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: nagar news kharwani grampanchayat ajit phatke disqualify