जाणीवपूर्वक हॉरर चित्रपट/वेब सीरिज बघणाऱ्या व्यक्तीला खूप आत, खोल कुठेतरी आपण सुरक्षित आहोत हे माहिती असतं.

पण एकदा का भीती शमली, म्हणजे चित्रपट संपला की शरीर आणि मनही पूर्वस्थितीला येते, आणि या सगळ्यातून एक आंतरिक आनंद मिळाल्याची भावनाही निर्माण झालेली असते.
Horror Movie
Horror MovieEsakal

भीती आवडे मला....

इरावती बारसोडे

ज्या व्यक्ती हॉरर एन्जॉय करतात त्यांना एक गोष्ट मात्र ठाऊक नसते. जाणीवपूर्वक हॉरर चित्रपट/वेब सीरिज बघणाऱ्या व्यक्तीला खूप आत, खोल कुठेतरी आपण सुरक्षित आहोत हे माहिती असतं. जेव्हा अशा प्रकारची सुरक्षिततेची सूप्त भावना असते, तेव्हाच ती व्यक्ती भीती एन्जॉय करू शकते!

घरात फक्त ती आणि तिची छोटी मुलगीच. पण या घरात आल्यापासून मुलगी म्हणतेय इथं आपण तिघं आहोत... मध्यरात्रीची वेळ... एक लांब केसांची, पांढऱ्याफटक चेहऱ्याची, लाल डोळ्यांची मुलगी तिचा पाठलाग करत राहते... ती खडबडून जागी होते... चेहऱ्यावर पाणी मारून समोर आरशात बघते... परत तीच मुलगी दिसते...

ती मागं पाहते तर कोणीच नसतं... ती खाली येते, फ्रीजमधून पाणी काढून पिते आणि परत झोपायला जाते... पण ती वर जात असताना तिच्या मागून पावलं उमटत जातात... ती रक्ताळलेली पावलं तिला दिसत नाहीत, पण चित्रपट बघणाऱ्याला मात्र स्वच्छ दिसतात....

हा घटनाक्रम छोट्या/मोठ्या पडद्यावर बघताना हृदयाचे ठोके आपसूक वाढतात. ‘तिला’ वाटणारी भीती बघणाऱ्यालाही स्पर्शून जाते, पण तरीही बघणारा न थांबता पुढे बघतच राहतो.

का? कारण पडद्यावरचा हा पाठलाग बघणाऱ्या, कदाचित तो पाठलाग मनातल्यामनात अनुभवणाऱ्या, व्यक्तीला भीती वाटत असली तरी त्या भीतीच्या तळाशी असते मनाला गुंतवून ठेवणारी एक रंजक भावना! रिक्रिएशनल फिअर (Recreational Fear) -मनोरंजनात्मक भीती!!

प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणानं भीती वाटू शकते. एखाद्या गोष्टीची भीती वाटली किंवा या गोष्टीमुळे आपल्याला धोका आहे हे जेव्हा आपल्या शरीराला समजतं तेव्हा शरीर ठरावीक पद्धतीनं प्रतिसाद देतं.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, काहीतरी भीतीदायक घडतं आहे, असं आपला मेंदू जेव्हा नोंदवतो, तेव्हा पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया असते ती म्हणजे ‘फाइट ऑर फ्लाइट’, म्हणजेच सामना करा किंवा पळून जा.

ही प्रतिक्रिया आपल्या मज्जासंस्थेतून (Sympathetic Nervous System) येते. समोर घडणारं, दिसणारं भीतीदायक आहे असं मेंदूनं एकदा ठरवलं की शरीरात काही गोष्टी आपोआप घडतात- प्रत्येकाचं शरीर सारख्याच पद्धतीनंच प्रतिसाद देईल असं नाही, पण साधारणपणे हृदयाचे ठोके वाढतात, डोळ्यांच्या बुबुळांचा आकार बदलतो, हाताच्या पंजांना घाम येतो, स्नायूंना रक्ताचा जास्त पुरवठा होतो.

थोडक्यात शरीर समोरच्या धोक्याला सामोरं जायला सज्ज होतं, मग ते पळून जाण्यासाठी असो किंवा प्रतिकार करण्यासाठी. मग समोरचा धोका एकदाचा टळला किंवा तो धोका खरा नव्हताच, हे जेव्हा मेंदूच्या लक्षात येतं, तेव्हा मज्जासंस्था (Parasympathetic Nervous System) पुन्हा काम करायला लागते आणि आपण शांत होतो, सुटकेचा निःश्वास टाकतो. एकदम रिलॅक्स वाटायला लागतं.

Horror Movie
Mental Health : ओव्हरथिंकिंग करताय? मग, जाणून घ्या आरोग्यावर होणारे 'हे' दुष्परिणाम

हॉररपट बघताना शरीर अशाच पद्धतीनं प्रतिसाद देतं. चित्रपट जसजसा पुढं जातो, तसं टेन्शन वाढायला लागतं. मग शरीरही त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतं. काहींना घाम येतो, काहींचा रक्तदाब वाढतो. अॅड्रेनॅलिन आणि कॉर्टिसोल नावाची हार्मोन स्रवायला सुरुवात होते.

ॲड्रेनॅलिनमुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि आवश्यक स्नायूंना रक्तपुरवठा होऊ लागतो. कॉर्टिसोलमुळे रक्तदाब वाढतो. महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा अतिरिक्त पुरवठा होऊ लागलो.

पण एकदा का भीती शमली, म्हणजे चित्रपट संपला की शरीर आणि मनही पूर्वस्थितीला येते, आणि या सगळ्यातून एक आंतरिक आनंद मिळाल्याची भावनाही निर्माण झालेली असते.

भीती अनुभवल्यानंतर एखाद्याला आंतरिक आनंद का होतो? यावर अनेक अभ्यासक संशोधन करत आहेत. भीती आणि मनोरंजन यांत काय नातं असावं हे शोधायचा त्यांचा प्रयत्न आहे. हॉरर चित्रपट बघितल्यामुळे किंवा हॉन्टेड हाऊससारख्या ठिकाणांना भेट दिल्याचे काही मानसिक फायदे असू शकतात का? या प्रश्नाचं उत्तरही अभ्यासक शोधत आहेत.

भीतीची भावना आज निर्माण झालेली नाही, माणसाच्या मनात भीतीचं अस्तित्व पूर्वीपासूनच आहे. पण तेव्हा ही भीती जगण्याचा एक आवश्यक भाग होती.

याचं आपल्या प्रत्येकाच्या अनुभवातलं उदाहरण म्हणजे, लहानपणी प्रत्येकाला पालकांनी भीती दाखवलेली असते, ‘अंधारात जाऊ नकोस हं, बागुलबुवा येईल.’ ही भीती दाखवण्यामागचा उद्देश साधा सरळ असतो. त्या लहान मुलानं अंधारात जाऊन धडपडू नये आणि त्याला काही दुखापत होऊ नये.

तसं पाहायला गेलं, तर ‘मनोरंजनात्मक भीती’ ही संज्ञा ऐकायला नवीन वाटत असली, तरी भीतीच्या माध्यमातून मिळणारा आनंद आपण सगळेच लहानपणापासून अनुभव असतो. लहानपणी भुताखेतांच्या, राक्षसांच्या गोष्टी सगळ्यांनीच आवडीनं ऐकलेल्या असतात.

पाठलागाचं थ्रिल पळापळीसारख्या खेळातून अनुभवलेलं असतं. थोडं मोठं झाल्यावर मित्रमैत्रिणींनी मिळून ‘हॉरर मुव्ही नाइट’चा प्लॅन नक्कीच केलेला असतो.

पण अनुभव घ्यायच्या वयातून बाहेर पडल्यावर मनोरंजनाचा हा जॉनर प्रत्येकालाच आवडत राहातो, असं नाही.

पण तरीही आपल्या आसपास एखादी तरी व्यक्ती अशी असते, जिला हॉरर चित्रपट/मालिका बघायला प्रचंड आवडतात. एक्झॉर्सिस्ट, नन, ॲनाबेल, काँज्युरिंग असे हॉरर चित्रपट बघितलेला महेश म्हणतो, ‘हे चित्रपट बघताना एक्साइटमेंट वाटते. यात लाइट, साउंड फार मस्त वापरतात, त्यामुळे बघताना भीती वाटतेच वाटते

. फारच भीती वाटायला लागली तर मी साऊंड म्युट करून बघतो. मग जरा कमी भीती वाटते. या चित्रपटांमध्ये लाइट, साऊंड फार मस्त वापरतात. त्याच्यामुळेच वातावरणनिर्मिती होते.’

Horror Movie
Mental Health : एक एकटा एकाकी! एकटच विचार करत बसण्यापेक्षा या गोष्टी करा, फरक जाणवेल!

मला विचाराल तर मला भयपट अजिबात आवडत नाहीत. चित्रपटगृहात तर सोडाच पण घरी, आसपास माणसं असली तरीसुद्धा मी हे चित्रपट बघण्याच्या भानगडीत पडत नाही.

विकिपीडियावर प्लॉट वाचलेला असूनही, चित्रपटाचा शेवट कसा होणार आहे हे माहीत असलं तरीसुद्धा नाही. कधीकाळी मी नारायण धारपांच्या कथा झपाटल्यासारख्या वाचून काढल्या होत्या. पण ज्या कथांमध्ये ‘समर्थ’ होते, त्या कथा मला जास्त आवडल्या.

कारण मला माहीत असायचं, समर्थ आहेत म्हणजे शेवट नक्की चांगला होणार. आता मात्र मला अशा कथा-कादंबऱ्याही आवडत नाहीत. त्यामुळे आवडीनं, चित्रपटगृहात जाऊन थ्रीडी/फोरडी हॉररपट बघणाऱ्यांना मी नेहमी विचारते;

या लेखाच्या निमित्तानं तर अनेकांना विचारलं, का आवडतं तुम्हाला हे असलं गूढ, भीतीदायक? त्यांचं उत्तर, ‘अगं मज्जा येते! थ्रिल वाटतं! छान एन्टरटेन्मेंट होते.’

भीती अनुभवण्यात कसलं आलंय थ्रिल? भीतीतून मनोरंजन कसं होऊ शकतं? आधी म्हटलं तसं संशोधक या प्रश्नांची उत्तरं शोधताहेत. फक्त हॉरर चित्रपटच नाही, तर कथा-कादंबऱ्या, पॉडकास्ट, वेबसीरिज अशा इतरही माध्यमांमधून अनेक भीती वाटायला लावणाऱ्या गूढकथा सांगितल्या जातात.

अशा कलाकृतींचा एक विशिष्ट चाहतावर्ग असतो. पण त्यातल्या प्रत्येकाला भयकथा सादरीकरणाचा प्रत्येक जॉनर आवडेलच असं नाही. कोणी पॉडकास्ट ऐकतील किंवा कोणी पुस्तकांच्या पानांमध्ये रमतील, असं संशोधक म्हणतात. चित्रपट आवडणाऱ्यांना कदाचित पुस्तकं वाचायला आवडणार नाहीत.

भीतीदायक वातावरण वाचून अनुभवण्याऐवजी त्यांना बघून, ऐकून अनुभवण्यात आनंद मिळेल. तर पुस्तकं वाचणाऱ्यांना भुतखेतं, खूनखराबा वगैरे बघायला आवडणार नाही, त्यांना वाचून कल्पनारंजन करायला आवडेल.

या कलाकृतींव्यतिरिक्त भीती ‘एन्जॉय’ करण्याचा आणखी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे ‘हॉन्टेड हाऊस’. आपल्याकडे अशी मुद्दाम निर्माण केलेली ‘झपाटलेली’ घरं फारशी नसली, तरी पाश्चिमात्त्य देशांमध्ये प्रत्येक अम्युझमेंट पार्कमध्ये ही हॉन्टेंड हाऊस गर्दी खेचत असतात.

हॉन्टेंड हाऊसमध्ये शिरल्यावर रक्तभरल्या कपड्यांतला एखादा भेसूर चेहरा आपल्या पाठीमागे लागणार आहे आणि हेच ‘थ्रिलींग’ आहे, या भावनेतून हॉन्टेड हाऊसमध्ये आवर्जून शिरणाऱ्यांची संख्या कमी नाही.

भीती निर्माण करणारी ही माध्यमं वेगवेगळी असली तरी या सगळ्यांमध्ये एक गोष्ट सारखी कुठली? तर ती म्हणजे माणसाला वाटणारं भीतीचं आकर्षण वापरून निर्माण केलेलं मनोरंजन, आणि म्हणूनच याला ‘मनोरंजनात्मक भीती’ म्हणत असावेत.

Horror Movie
Animal Movie: "स्त्री - पुरुष समानता विचारांवर श्रद्धांजली", स्वानंद किरकिरेंची 'अ‍ॅनिमल'वर तीव्र नाराजी

अतिचिंता किंवा काळजी, ताण, असुरक्षितता अशा भावनांना सामोरं जाणं किंवा त्यांचा प्रभावी सामना करण्यासाठी मनोरंजनात्मक भीती अनुभवणं फायद्याचं ठरू शकतं का, याचाही अभ्यास संशोधक करत आहेत. खास मनोरंजनात्मक भीतीचा अभ्यास करण्यासाठी डेन्मार्कमधल्या आऱ्हुस विद्यापीठामध्ये (Aarhus University) ‘रिक्रिएन्शनल फिअर लॅब’ तयार करण्यात आली आहे.

अशा पद्धतीचा अभ्यास करणारी ही जगातली एकमेव प्रयोगशाळा आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये भीती मनोरंजनात्मक आणि त्याचबरोबर अर्थपूर्ण ठरू शकते, याचा विविध प्रयोगांच्या माध्यमातून प्रयोगशाळेत अभ्यास केला जातो.

या प्रयोगशाळेचे संचालक मथायस क्लासेन स्मिथसोनियन मॅगझिनच्या एका लेखामध्ये म्हणतात, ‘मनोरंजनात्मक भीती अनुभवल्यामुळे अनेकजण अतिकाळजी आणि ताणाचा चांगल्या पद्धतीनं सामना करू शकले, असं अनेक संशोधनांतून सिद्ध झालं आहे.’ ते एक उदाहरणही देतात.

एका संशोधनानुसार, हॉरर चित्रपट नियमित पाहणाऱ्या व्यक्तींना कोविड-१९मुळे ओढवलेल्या पहिल्या लॉकडाउनमुळे आलेल्या मानसिक ताणाला तो़ंड देणं इतरांच्या तुलनेत सोपं गेलं.

जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधक असलेल्या सिंथिया हॉफनर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या एका संशोधनानुसार, ज्यांना बुद्धीला आव्हानं दिलेली आवडतात, कल्पनारंजन करायला आवडतं, ज्यांना नवीन अनुभव घ्यायला आवडतात, नवीन गोष्टींमध्ये थ्रिल शोधायला आवडतं, अशा व्यक्ती बऱ्याचदा हॉररपटांकडे वळतात. कारण हॉरर बघण्यातून निर्माण होणारा ‘ॲड्रेनॅलिन रश’ त्यांना अनुभवायचा असतो.

पण ज्या व्यक्ती हॉरर एन्जॉय करतात त्यांना एक गोष्ट मात्र ठाऊक नसते. जेव्हा एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक हॉरर चित्रपट/वेब सीरिज बघते, तेव्हा त्या व्यक्तीला खूप आत, खोल कुठेतरी आपण सुरक्षित आहोत हे माहिती असतं.

अशा प्रकारची सुरक्षिततेची सूप्त भावना जेव्हा असते, तेव्हाच ती व्यक्ती भीती एन्जॉय करू शकते, असं मानसतज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट सांगतात.

हॉररपटांमध्ये अनेकदा मृत्यू दाखवलेला असतो. आपल्याला मृत्यूनंतर काय होते, याची ठोस माहिती नाही. त्यामुळे मृत्यूची एक सूप्त भीती मनात असते. आणि मग त्या भीतीचंही आकर्षण वाटतं. म्हणूनही कदाचित लोकांना हॉररपट बघणं आवडत असावं, असंही ते सांगतात.

आपला मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणतात, की मेंदू फार विलक्षणरित्या काम करतो. बऱ्याचदा असंही होतं, समोरची घटना बघणाऱ्याला गुंगवून ठेवते, इतकी की ती व्यक्ती बाकी सगळं विसरायला लागते, वास्तवापासून दूर जायला लागते; वास्तवापासून दूर जायला लागली की अस्तित्वच धोक्यात येऊ लागतं, आणि मग आपला मेंदू अतिशय सूक्ष्मपणे आपल्याला जागा करतो.

‘हे जे काही चाललंय ते खोटंय बरं का, असं काही प्रत्यक्षात नसतं’, असा एक सूक्ष्म संदेश मेंदू आपल्याला देतो, आपल्याही नकळत. आणि मग पुन्हा ती हॉरर घटना एन्जॉय करायला माणूस सज्ज होतो.

डॉ. बापट म्हणतात त्याप्रमाणे, मानवाचा मेंदू विलक्षण आहे. त्याची सर्व गुपितं अजूनही उलगडलेली नाहीत. सध्याच्या जीवनशैलीमध्ये ताण, अतिकाळजी आणि चिंता यातून बाहेर पडणं, मेंदूला विश्रांती देणं आवश्यक आहे. त्यासाठी काहीतरी माध्यम शोधावं लागतं. ताण घालवायचं माध्यम प्रत्येकासाठी निश्चित निरनिराळं असू शकतं. मग ते माध्यम मनोरंजनात्मक भीतीचं असलं म्हणून कुठे बिघडलं?

------------------------

Horror Movie
Horror Railway Station : शूss! संध्याकाळ होताच इथे होतो शूकशुकाट, भूतांच्या भीतीने 42 वर्ष बंद होते रेल्वे स्टेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com