बारावीनंतर बीबीए करायचंय? काय आहेत करिअरच्या संधी....वाचा सविस्तर

bba- bcom.jpg
bba- bcom.jpg

सध्याची पिढी शिक्षणानंतर किंवा शिक्षण चालू असतानाच नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यावर जास्त विचार करताना दिसते. त्यामुळे या व्यवसायाची दिशा कशी निश्चित करायची, त्यात यशस्वी कसे व्हायचे याचे ज्ञान देणाऱ्या बीबीए अभ्यासक्रमाचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल, तर हा लेख नक्की वाचा...

एकदा दहावीनंतर आर्टस्, कॉमर्स की सायन्स हे ठरले, की मग बारावीनंतर फार विचार सहसा केला जात नाही. पण बारावीनंतर अजून काही पर्याय उपलब्ध होतात की त्याचा विचार करायचा राहून जातो. बारावी झाली की कुठला पदवी अभ्यासक्रम घ्यावा याबद्दल विद्यार्थ्यांचे निर्णय आता बदलत चाललेले दिसतात. काही वर्षांपूर्वी चांगली म्हणजे चांगले पॅकेज देणारी नोकरी मिळेल, असा अभ्यासक्रम जास्त स्वीकारला जात होता. पण सध्या हा निकष बदलत जाताना दिसत आहे. सध्याची पिढी शिक्षणानंतर किंवा शिक्षण चालू असतानाच नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यावर जास्त विचार करताना दिसते.

विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा हळूहळू या बदलत्या विचारसरणीला साथ देताना दिसतात. काही पालकांना आपल्या मुलांनी आपल्याच व्यवसाय अजून मोठा करावा, असेही वाटत असते. या सगळ्या बदलाची कारणे अनेक आहेत, जसे की नोकरीबद्दलची कमी झालेली शाश्वती, जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनांमुळे सतत बदलत राहणारी परिस्थिती वगैरे. पण या बदलत्या विचारसरणीमागे शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्वाचे कारण म्हणजे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी लागणारी कौशल्ये वाढवण्यासाठीचे उपलब्ध असलेले काही अभ्यासक्रम. 

पदवी अभ्यासक्रम पाहिले तर बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) हा एक अशाच पद्धतीचा परिपूर्ण अभ्यासक्रम आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्यामध्ये कुठले गुण असायला पाहिजेत इथपासून ते अगदी आपल्या व्यवसायाचा शाश्वत विकास कसा साधता येईल इथपर्यंत या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाते. विशेष म्हणजे कॉमर्स विभागाच्या खाली येणारा हा अभ्यासक्रम कोणताही विद्यार्थी, म्हणजे आर्टस्, सायन्स, कॉमर्स किंवा अगदी इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला विद्यार्थीसुद्धा करू शकतो.

 
तीन वर्षांमध्ये सहा सत्रे असलेल्या या अभ्यासक्रममध्ये फक्त व्यवसायाच्या दृष्टींनीच नाही, तर एकूणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी देखील अतिशय उपयोगी, असे विषय आणि प्रकल्प समाविष्ट केलेले आहेत. ह्या विषयांमुळे नियोजन, आयोजन, निर्णय क्षमता, संभाषण, तर्कसंगत विचार हे आणि अशी अनेक कौशल्ये विद्यार्थी शकतो आणि त्यात पारंगत होतो. म्हणूनच फक्त व्यवसाय करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही, तर चांगली नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील या अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद बघायला मिळतो. 

स्वतःच्या करिअरच्या दृष्टीने विचार केला, तर मुलांना या अभ्यासक्रमामधून सर्वांगीण विकास साधून नोकरी आणि व्यवसाय हे दोन्ही पर्याय मिळू शकतात. 
बीबीएमध्ये खूप वेगवेगळे विषय आणि चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी किंवा एखादी संस्था चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या पैलूंचा अभ्यास करता येतो. बिझनेस कम्युनिकेशन स्किल सारख्या अतिशय सोप्या; पण महत्वाच्या विषयापासून ते अगदी प्रॉडक्शन अँड ऑपरेशन, रिसर्च मेथडॉलॉजी, बिझनेस लॉ, फायनान्शियल मॅनेजमेंट असे अत्यावश्यक विषय शिकवले जातात. या सगळ्या विषयांचा उपयोग म्हणजे एखाद्या व्यक्तीला फक्त आपल्याच कामाची माहिती असणे पुरेसे नसते, तर संस्थेमधील बाकीच्या विभागात काय काम चालते, ते कसे चालते आणि त्यांच्या अडचणी काय हे माहीत असणे गरजेचे असते. त्यावरच बरचसे निर्णय अवलंबून असतात आणि योग्य निर्णय व्यवसाय किंवा नोकरी मध्ये उपयोगी किंवा गरजेचा असतो.

बीबीएचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे स्पेशलायझेशन. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विशेष प्राविण्य मिळवून देणारे विषय निवडण्याची मुभा ह्यामध्ये दिली गेली आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, सेक्टर सर्व्हिस मॅनेजमेंट यासारखे पर्याय दिले आहेत. यामुळे आपल्या आवडत्या विषयामध्ये अधिक प्राविण्य मिळवणं सोपं जातं आणि उपयोगी सुद्धा होतं. 
असाच आणखी एक तीन वर्षांमध्ये सहा सत्रे असलेला अभ्यासक्रम म्हणजे बीबीए (इंटरनॅशनल बिझनेस) सध्याच्या जागतिकीकरणामुळे, नोकरी किंवा व्यवसायांचा विचार फक्त राष्ट्रीय नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर केला पाहिजे. याला पर्याय नाही. बीबीए आयबी हा एक असाच पदवी अभ्यासक्रम आहे की ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसाय पद्धती शिकायची संधी विद्यार्थ्यांना मिळते.

यामध्येही बिझनेस कम्युनिकेशन स्किल, व्यक्तिमत्व विकास यासारख्या विषयांबरोबर, इंपोर्ट एक्स्पोर्ट प्रोसिजर, फॉरेन ट्रेड असे विशेष विषय शिकवले जातात. बीबीए आयबी हा एक स्पेशल कोर्स आहे, त्यामध्ये मुलांना एक परकीय भाषा निवडावी लागते, ती नंतरच्या करिअरमध्ये उपयोगी पडते आणि त्याबरोबरच मल्टिनॅशनल कंपनीमध्ये शिरकाव करणे सोपे होतं. सप्लाय चेन, लॉजिस्टिक मॅनेजमेंट असे विषय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक होतात. बीबीए आणि बीबीए-आयबीमध्ये रिसर्च मेथडॉलॉजीसारख्या विषयांमुळे विद्यार्थ्यांची संशोधन क्षमता वाढते. या बरोबरच सध्या अत्यावश्यक असलेल्या माहिती तंत्रज्ञानासंबंधी विषयसुद्धा या अभ्याक्रमांमध्ये आहेत. या दोन्ही पदवी अभ्यासक्रम हे पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा वेगळे आहेत, पारंपारिक अभ्यासक्रमापेक्षा जास्त व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार केले गेलेल्या या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना करायला लागणाऱ्या संशोधन प्रकल्प आणि औधगिक प्रकल्पाद्वारे व्यावहारिक जगाच्या जवळ जाऊन ते समजून घेण्यासाठी मदत होते. 

या दोन्ही अभ्यासक्रमांना औद्योगिक जगतानेही स्वीकारले आहे. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांत नोकरीच्या चांगल्या संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत, आणि दिवसेंदिवस संधी वाढत आहेत. काही ठिकाणी या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात आहे. या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट बँका, मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये देखील नोकरीच्या संधी मिळतात. नोकरी बरोबरच काही कंपन्या अशा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाची सोय सुद्धा उपलब्ध करून देतात. सीए, सीएस, सीएमएसारखे कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी असलेले हे अभ्यासक्रम असल्यामुळे बरेच विद्यार्थी बीबीए किंवा बीबीए-आयबी याबरोबर सीए/सीएस/सीएमए कोर्स एकत्र करतात.


पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढे जाऊन एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्धी तयारी या कोर्समध्ये होऊन जाते. एलएलबीसारखे कोर्स पण या पदवीनंतर केले जातात. याशिवाय भारताबाहेरील विद्यापीठासाठी लागणारी क्रेडिट सिस्टिम या कोर्सला लागू झाल्यामुळे पदव्युत्तर शिक्षणासाठी सुध्दा उपयोग होतो. 
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमधील सर्व फायद्यांबरोबरच अजून काही फायदे असलेले हे अभ्यासक्रम करिअर वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com