पिंपरी-चिंचवड शहरातील विकासाचा वेग मंदावला

दीपेश सुराणा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

"महापालिकेचा अर्थसंकल्प होण्यास यंदा उशीर झाला. त्यामुळे विकासकामांवर परिणाम झाला. मात्र, ऑक्‍टोबरपर्यंत बरीचशी विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. मोठ्या प्रकल्पांच्या निविदा देखील काढण्यात येणार आहे. पुढील आठ महिन्यांमध्ये जास्तीत जास्त विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन असणार आहे.''
- श्रावण हर्डीकर, आयुक्त.

महापालिकेचा भांडवली विकासकामांसाठी चार महिन्यांत केवळ 15 टक्के खर्च

पिंपरी : महापालिकेने गेल्या चार महिन्यांमध्ये भांडवली विकासकामांसाठी 173 कोटी 42 लाख रुपयांचा खर्च केला आहे. वार्षिक भांडवली खर्चाच्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत हा खर्च केवळ 15 टक्के इतका आहे. तर, स्थापत्य विभागातर्फे आत्तापर्यंत फक्त 64 कोटी रुपयांच्या 410 निविदा काढल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील विकासाचा वेग संथ गतीने होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

महापालिकेच्या 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भांडवली विकासकामांसाठी 1142 कोटी 79 लाख रुपयांचा सुधारित अंदाज मांडलेला आहे. त्यातील जुलै अखेर 173 कोटी 42 लाख रुपयांचा खर्च झाला. वार्षिक अंदाजाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण 15.17 टक्के इतके नगण्य आहे. यंदा महापालिका सार्वत्रिक निवडणुकांमुळे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विविध विषय समित्यांचे सदस्य निवडीची प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण झाली. तर, महापालिका विशेष सर्वसाधारण सभेत तब्बल 15 जूनला अर्थसंकल्प मंजूर झाला. पर्यायाने प्रशासकीय पातळीवर विकासकामांना उशीर झाला. त्याशिवाय, प्रभाग अध्यक्षांच्या निवडी अद्याप प्रलंबित आहेत. नव्याने दोन क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्यासाठी 9 ऑगस्टचा मुहूर्त आहे. पर्यायाने, शहरातील विविध प्रभागांमधील विकासकामे देखील खोळंबली आहेत.

भांडवली विकासकामांसाठी झालेला खर्च (1 एप्रिल ते 31 जुलै) :
विभाग खर्च (कोटी रुपयांमध्ये)
1) स्थापत्य 140.32
2) विद्युत 4.89
3) पाणीपुरवठा 18.11
4) "प' अंदाजपत्रक 9.96
5) वाहन खरेदी 12.39 लाख
------------------------------------------------------
एकूण 173.42
------------------------------------------------------

स्थापत्य विभागाच्या निविदांची सद्य:स्थिती (1 एप्रिल ते 2 ऑगस्ट) :
क्षेत्रीय कार्यालय विकासकामे निविदा रक्कम (कोटी रुपयांमध्ये)
अ 40 8.27
ब 6 1.25
क 104 14.58
ड 97 9.79
इ 56 9.41
फ 65 13.18
उद्यान 42 7.6
-----------------------------------------------------------------
एकूण 410 64.08
--------------------------------------------------------------

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

    Web Title: pimpri chinchwad news The growth rate of Pimpri-Chinchwad city slowed