पिंपरी: "संस्कार'च्या ठेवीदारांचा जीव टांगणीला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

एकही रुपया परत मिळत नसल्याने सर्व जण त्रस्त आहेत. भोसरी येथील एका भाजप नेत्याला त्यांनी अक्षरशः रडतरडतच आपले गाऱ्हाणे सांगितले आणि मध्यस्थीसाठी विनंती केली

पिंपरी - तीन वर्षांत दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने गुंतविलेली तब्बल दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक "संस्कार ग्रुप'मुळे अडचणीत आली आहे. पैसे परत देण्याच्या बोलीवर दिलेले धनादेश न वटल्याने ठेवीदारांचा जीव आता टांगणीला लागला आहे. शेकडो माजी सैनिक, तीनशेवर महिला बचत गट, असंख्य ज्येष्ठ नागरिक मिळून सुमारे 50 हजार ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. 

आळंदी देवाची रस्त्यावर वडमुखवाडी येथे संस्कार ग्रुपचे मुख्यालय आहे. या संस्थेची संस्कार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आर्थिक डबघाईला आली. पैसे परत मिळत नसल्याने वर्षापूर्वी काही ठेवीदारांनी उठाव केला. दिलेले धनादेश परत आल्याने जानेवारीत एका ठेवीदाराने रीतसर गुन्हा दाखल केला. शनिवारी काही महिला बचत गटाच्या मीना चौधरी यांच्यासह महिलांनी मिळून फसवणूक झाल्याची दुसरी तक्रार नोंदविली. अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांना फसविले गेलेले हजारो नागरिक असल्याचे आता समोर येत आहे. 

फसवणूक झालेल्यांपैकी सर्वाधिक नागरिक हे पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, लोणावळा, देहूरोड, तळेगाव दाभाडे, शिरूर, पाबळ, हडपसर, भोर, हिंजवडी, माण परिसरातील आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातही या ग्रुपने स्वतंत्र कार्यालयांचा विस्तार असल्याचे समजले. जमीन खरेदी विक्री करणाऱ्या बहुसंख्य ठेवीदारांनी रोखीने पैसे गुंतविल्याने काळा पैसा असल्याचाही संशय आहे. 

माजी सैनिकांवर रडायची वेळ 
अधिक व्याज मिळते म्हणून निवृत्तीनंतर मिळालेली लाखो रुपयांची पुंजी माजी सैनिकांच्या एका मोठ्या गटाने "संस्कार'मध्ये गुंतविली. एका निवृत्त अधिकाऱ्याने 16 लाख गुंतविले. दुसऱ्या एका माजी सैनिकाची पत्नी संस्कारमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करीत होती. त्यामुळे विश्‍वास वाटला आणि अन्य माजी सैनिकांनीही पैसे गुंतविले. ही रक्कम काही कोटी रुपयांची आहे. एकही रुपया परत मिळत नसल्याने सर्व जण त्रस्त आहेत. भोसरी येथील एका भाजप नेत्याला त्यांनी अक्षरशः रडतरडतच आपले गाऱ्हाणे सांगितले आणि मध्यस्थीसाठी विनंती केली. 

महिला बचत गटांची संख्या मोठी
शहरातील शेकडो महिला बचत गटांची मोठी रक्कम मिळत नाही. बचत गटाच्या माध्यमातून दहा-वीस हजार रुपये अशी छोटी रक्कम असलेले सामान्य कुटुंबातील ठेवीदारांची संख्या 70 टक्के आहे. पोलिसांकडे तक्रार करू नये म्हणून काही बचत गट अध्यक्षांना 31 जुलै 2017 पर्यंतचे धनादेश देण्यात आले होते. ते वटले नाहीत म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. आता त्यांना जमीन अथवा सदनिका नावावर करून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. "पोलिसांकडे गेलात तर एक पैसाही परत मिळणार नाही', असे ठेवीदारांना धमकाविण्यात आल्याने अद्याप फसवणूक झालेले लोक गुन्हा दाखल करायला पुढे येत नसल्याचे चौकशीत सांगण्यात आले. 

ठेवीदार फसवणूक फंडा वीस वर्षांपासून कायम
जादा व्याजाच्या आमिषाने ठेवीदारांना आकृष्ट करून फसवणूक करण्याचा फंडा गेल्या वीस वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सुरूच आहे. प्रारंभी सनराईज कन्सलटन्सीने सात कोटींना गंडा घातला. आजपर्यंत एक रुपयाही ठेवीदारांना परत मिळालेला नाही. नंतरच्या काळात संचयनी, संजीवनी, कल्पवृक्ष, पल्स, समृद्धी, अभ्युदय, एचबीएन अशा वित्त संस्थांनीही फसविले. त्याशिवाय आर्थिक डबघाईमुळे भुदरगड, भाईचंद, औद्योगिक नागरी अशा काही पतसंस्था तसेच जंगली महाराज, रुपी बॅंकेतील मिळून हजारो ठेवीदारांचे पैसे गुंतून पडले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: pimpri news: investment scam case