होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव

होळकरवाडी - गावातील ओढ्यावर जलसंधारणाचे झालेले काम.
होळकरवाडी - गावातील ओढ्यावर जलसंधारणाचे झालेले काम.

होळकरवाडीतील नागरिकांकडून महापालिका समावेशाला कडाडून विरोध आहे. शेतीने गाव चारही बाजूने वेढलेले असून, शेती हा गावाचा आत्मा आहे. ग्रामस्थांचे शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. गावातील एकूण क्षेत्राचा विचार केला असता ७० टक्के क्षेत्र शेतजमीन असून, उर्वरित क्षेत्र हे गायरान आहे. गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झालेली आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावातील रस्ते सुस्थितीत असून पथदिवे, सांडपाणी वाहिन्यांची कामेही झाली आहेत. पायभूत सोयीसुविधा पोचवण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाले आहे. या मूलभूत सेवा ग्रामपंचायत योग्य पद्धतीने कमी खर्चात पुरवू शकत असेल तर महापालिकेत समावेश करून विनाकारण कर का भरावा? आणि महापालिका समावेशानंतर आता झाला आहे तेवढा विकास होईल का? हा ग्रामस्थांसमोरील प्रश्न आहे. गावात पाण्याचा प्रश्न असून तीन पाझर तलाव आहेत. त्याखालील विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याची समस्या जाणवत असली तरी महाराष्ट्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे.

महापालिका समावेश झाला तर गाव अडगळीत पडेल आणि गावाचा विकास खुंटेल. शिवाय, गावातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत जपलेल्या जमिनीवर महापालिकेकडून आरक्षणे जाहीर करण्यात येतील, अशी भिती ग्रामस्थांना आहे. गावात गायरान जमीन आहे. समावेश झाला तरी त्या जमीनीवर क्रीडांगण, दवाखाना आदी सुविधा करण्यात याव्यात ही गावकऱ्यांची इच्छा आहे. गावातील शेतजमिनींवर महापालिकेकडून मोठ्या प्रकल्पांना जागा आरक्षित करू नये, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

त्याचबरोबर, महापालिका समावेशानंतर आजूबाजूच्या गावांतील जागा महापालिका प्रशासनाने अॅमेनिटी स्पेसच्या नावाखाली ताब्यात घेतल्या होत्या. त्या जागेवर कुठल्याही सोयीसुविधा न होता. त्या जागा पुन्हा बांधकाम व्यावसायिकांना विकल्या जात असून, असे आमच्या गावातही होईल अशी भीतीही नागरिकांना व्यक्त केली. महापालिका समावेशानंतर गावाचे गावपण टिकणार नाही, म्हणून महापालिकेत गावाचा समावेश होऊ नये असे गावकऱ्यांना वाटते.

दृष्टिक्षेपात गाव...

  • २९०० - २०११ च्या जनगणनेनुसार
  • सध्या अंदाजे ५ हजार लोकसंख्या
  • ७०८.१९ हेक्‍टर - क्षेत्रफळ
  • सरपंच - प्रज्ञा झांबरे
  • सदस्यसंख्या - १०
  • पुणे स्टेशनपासून अंतर - १६ किलोमीटर
  • गावाचे वेगळेपण - सत्तर टक्के शेतजमीन, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, प्राचीन शिव-पार्वती मंदिर

ग्रामस्थ म्हणतात...
राकेश झांबरे (उपसरपंच) - गावातून महापालिका जेवढे करसंकलन करील, त्यामधील निम्मा खर्च तरी आमच्या गावावर होईल का, हा प्रश्न आहे. आधी आमच्याकडून करण्यात आलेल्या करसंकलनातील किती टक्के पैसा गावाच्या विकासावर खर्च होणार आहे हे महापालिकेने सांगावे, त्यानंतर गावाच्या समावेशाबाबत विचार करावा.

दत्ता होळकर - महापालिकेत यापूर्वी समाविष्ट केलेल्या अकरा गावांकडे पाहिले असता तेथे काहीच विकास झालेला दिसत नाही. त्याऐवजी आमच्या गावात सर्व सोयीसुविधा आहेत, मग आम्ही विनाकारण महापालिकेचा कर का भरावा? 

किरण झांबरे - शेतकऱ्यांच्या जागेवर आरक्षण न टाकता गावांचा विकास आराखडा तयार करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे  नुकसान होणार नाही, तसेच गावातील लोकांच्या भूमिकेचा विचार करून राज्य शासनाने आमच्या गावाच्या समावेशाबाबत पुनर्विचार करावा, ही अपेक्षा आहे.

गावाच्या समावेशानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये, गावातील लोक हे शेतीवर अवलंबून असून, मोठ्या कष्टाने त्यांनी शेती जपली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या कराचा बोजाही गावकरी सहन करू शकणार नाहीत. त्यामुळे गावाच्या समावेशाचा सरकारने पुनर्विचार करायला हवा.
- कु. प्रज्ञा गोविंद झांबरे, सरपंच

(उद्याच्या अंकात वाचा नऱ्हे गावाचा लेखाजोखा)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com