नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर

नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर

पुण्याचे प्रथम महापौर बाबूराव सणस आणि माउली शिरवळकर असे दोन महापौर ज्या गावाने शहराला दिले, असे नांदोशी-सणसनगर हे गाव मात्र आजमितीस भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर असून, दिवस-रात्र अखंड धुळीत बुडालेले असते.

नांदोशी गावच्या हद्दीत चार ते पाच मोठ्या दगडखाणी आहेत. रात्रंदिवस या खाणींवर दगड फोडण्याचे काम सुरू असल्याने तेथून उडणारी धूळ येथील घरे, शेतातील पिकांवर येऊन बसते. रस्त्यांवरूनही सतत अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना राहणारे रहिवासी अक्षरशः त्रस्त झालेले आहेत. 

 नांदोशी-सणसनगरला दळणवळणासाठी सध्या किरकटवाडी-नांदोशी रस्ता हा एकमेव पर्याय आहे. मागील दोन वर्षांपासून पीएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र अद्यापही अर्धवटच आहे. २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून धायरी-नांदोशी या रस्त्याचे काम सुरू झाले होते, मात्र तेही पूर्ण झाले नाही. परिणामी किरकटवाडी-नांदोशी या अत्यंत खराब असलेल्या एकमेव रस्त्यावरून धुळीचा सामना करत नागरिकांना ये-जा करावी लागते.

२००९ मध्ये तब्बल पाच किलोमीटर अंतरावरुन नांदेड येथून पिण्याच्या पाण्यासाठी आणण्यात आलेली जलवाहिनी सध्या अपुरी पडत आहे. त्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. वाहिनी फुटणे, मोटर नादुरुस्त होणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. गाव आता महापालिकेत समाविष्ट होत असल्याने रस्ता होईल, पाणीपुरवठा सुरळीत होईल, येण्या-जाण्यासाठी बससेवा सुरू होईल इतर रखडलेली विकास कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

ग्रामस्थ म्हणतात...
कौसल्या कोंढाळकर (विद्यार्थिनी- सणसनगर) - बसची सोय नसल्याने ये-जा करताना खूप वेळ जातो. उंच डंपरमधून ये-जा करावी लागते. चौथीनंतरच्या शिक्षणासाठी सर्व मुला-मुलींना पाच ते दहा किलोमीटर लांब जावे लागते. पावसाळ्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. वाहन मिळाले नाही तर अनेक वेळा किरकटवाडी फाट्यापासून चार-पाच किलोमीटर चालत घरी यावे लागते.

श्रीराम कदम ( ग्रामस्थ, नांदोशी) - शहरापासून जवळ असूनही गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. अनेक पिढ्यांपासून गावाला कधी पक्का रस्ता मिळाला नाही हे आमचे दुर्दैव आहे. शहरात मेट्रो येत असताना महापालिकेत गेल्यानंतर मात्र आम्हाला केवळ चांगल्या रस्त्याची अपेक्षा आहे.

गाव लहान असल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न  तुटपुंजे आहे. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधून विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांची खूप गैरसोय होते. रस्त्याच्या समस्येमुळे गावचा विकासही रखडला आहे. गावात ८० टक्केपेक्षा जास्त शेतजमीन असल्याने महापालिकेने आरक्षण टाकताना किंवा विकास आराखडा तयार करताना शेतकऱ्यांचाही विचार करावा. 
- राजाराम वाटाणे, सरपंच

दृष्टिक्षेपात गाव...
७५० - २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या
४००० -  सध्या लोकसंख्या
३२८ हेक्‍टर - क्षेत्रफळ
राजाराम वाटाणे - सरपंच
७ - सदस्यसंख्या
१७ कि.मी. स्टेशनपासून अंतर 
 वेगळेपण : शिवकालीन वडजाईमाता व महादेवाचे प्राचीन मंदिर, मनन आश्रम.

(उद्याच्या अंकात वाचा बावधन बुद्रुक​ गावाचा लेखाजोखा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com