नऱ्हे : बेकायदा बांधकामांमुळे बकालपणात वाढ

नऱ्हे - नियमांचे उल्लंघन करून ओढ्यालगत झालेली बांधकामे.
नऱ्हे - नियमांचे उल्लंघन करून ओढ्यालगत झालेली बांधकामे.

खाचखळग्यांचे अरुंद रस्ते, दोन दिवसांनी अपुऱ्या दाबाने होणारा पाणीपुरवठा, ओढ्यांवर झालेली अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे, रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्यांचे ढीग... अशा असंख्य समस्यांनी नऱ्हे गावाचा विकास खुंटला असून, पुणे महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यावर किमान विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा नऱ्हे गावातील रहिवासी व्यक्त करत आहेत, मात्र शेजारचे धायरी गाव तीन वर्षांपूर्वी महापालिका हद्दीत समाविष्ट होऊनही तेथे काहीच विकासकामे झालेली नाहीत, तीच स्थिती गावाची होऊ नये, अशीही चिंता व्यक्त होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या नऱ्हे गावातील नागरीकरण गेल्या दोन दशकांत झपाट्याने वाढले आहे. अनेक नामांकित शैक्षणिक संस्था, आयटी पार्क, रुग्णालये, मोठमोठ्या सोसायट्या उभ्या राहिल्या, मात्र तुलनेत मूलभूत सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतीला अपयश आले.

खराब रस्ते हा गावातला कळीचा प्रश्न आहे. गोकुळनगर, मानाजीनगर या निवासी भागातून जाणारा आणि ग्रामपंचायतीकडून धायरीकडे जाणारा रस्ता या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गावात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून, त्यासाठी साहित्य नेणारी अवजड वाहने रस्त्यावरून गेल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. धुळीच्या लोटाचाही सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने रस्ता अरुंद होऊन नियमीत वाहतूक कोंडी होते.

अपुऱ्या पाणी पुरवठ्यानेही ग्रामस्थ त्रस्त आहेत. जवळ असलेले खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असो किंवा पावसाळा असो,  सोसायट्यांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. गावातून जाणाऱ्या ओढ्यावरच काहींनी बेकायदा बांधकामे केली आहेत. परिणामी ओढ्याचे पात्र अरुंद झाल्याने, पावसाळ्यात सोसायट्यांमध्ये पाणी शिरते. ग्रामपंचायतीकडून कचरा संकलन होत असले, तरी काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकून तो पेटवतात. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरतात.

दृष्टिक्षेपात गाव...

  • १६ हजार २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या
  • दीड लाख सध्या लोकसंख्या
  • ४३३ (हेक्‍टर) क्षेत्रफळ
  • सरपंच - मीनाक्षी वनशिव (भाजप)
  • सदस्यसंख्या - १७
  • स्टेशनपासून अंतर - १४ कि.मी.
  • वेगळेपण - अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांची संकुले, प्रसिद्ध स्वामी नारायण मंदिर

ग्रामस्थ म्हणतात...
भूपेंद्र मोरे -
ग्रामपंचायत व बांधकाम व्यावसायिकांमध्ये लागेबांधे असल्यामुळे या अनधिकृत बांधकामांवर कधीच कारवाई होत नाही. पीएमआरडीदेखील सरपंच आणि आमदार यांच्यावर मेहेरबान असल्याचे अनेक वेळा दिसून आले. अनेक वेळा कारवाईसाठी आलेला ताफा हा परततानादेखील नागरिकांनी बघितले आहे, हेच नऱ्हे गाव बकाल होण्याचे मुख्य कारण आहे.

राजेश बोबडे - ग्रामपंचायतीचे पाणी कधी दिवसाआड, तर कधी दोन दिवसांनी फक्त अर्धा तास मिळते. आम्ही सातशे रुपये मोजून पाण्याचा टँकर विकत घेत आहोत. महिन्याचे हजारो रुपये फक्त पाणी विकत घेण्यावर जातात.

रोहिदास जोरी - गावातून दोन प्रमुख मोठे ओढे वाहतात. या ओढ्यांमधील गाळ, कचरा पाण्याच्या प्रवाहाने वाहत येतो, त्यामुळे पाणी तुंबून आमच्या सोसायटीत शिरते. पावसाळ्यात आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो, पूर्ण पार्किंग पाण्याखाली असते. 

(उद्याच्या अंकात वाचा नांदोशी-सणसनगर गावाचा लेखाजोखा)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com