
NASA astronaut 70th birthday Earth Landing : बहुतेक जेष्ठ नागरिकांचा ७०वा वाढदिवस केक, गिफ्ट्स आणि कुटुंबासोबत गोड आठवणींसह साजरा होतो. पण नासाच्या सर्वात जेष्ठ सक्रिय अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आपला ७०वा वाढदिवस अंतराळातून पृथ्वीवर परतताना साजरा केला हे खरंच जगावेगळं आणि प्रेरणादायी आहे.
डॉन पेटिट आणि त्यांचे दोन रशियन सहकारी अलेक्सी ओवचिनिन आणि इवान वॅग्नर हे तिघंही २० एप्रिल २०२५ रोजी कझाकस्तानमधील झेझकाझगन शहराजवळील एका भागात सोयूझ कॅप्सूलमधून सुखरूप उतरले. हे आगमन त्यांच्यासाठी केवळ पृथ्वीवरचं परतणं नव्हतं, तर डॉन पेटिटसाठी त्यांच्या ७०व्या वाढदिवसाची एक अविस्मरणीय भेट ठरली.
या मोहिमेत अंतराळवीरांनी एकूण २२० दिवस अंतराळात घालवले आणि त्यादरम्यान त्यांनी पृथ्वीला ३,५२० वेळा फेरी मारली. या मोहिमेदरम्यान त्यांचा प्रवास तब्बल ९३.३ दशलक्ष मैलांचा होता.
ही डॉन पेटिट यांची चौथी अंतराळयात्रा होती. त्यांच्या २९ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी आजपर्यंत १८ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात घालवला आहे, ही गोष्टच त्यांच्या समर्पणाचं प्रमाण आहे.
या सात महिन्यांच्या अंतराळमोहिमेदरम्यान त्यांनी आणि त्यांच्या टीमने पाण्याला स्वच्छ करणे, वनस्पतींची वाढ विविध परिस्थितीत आणि गुरुत्वाकर्षणशून्यतेत आग कशी असते यावर महत्त्वपूर्ण संशोधन केलं. या प्रयोगांचे परिणाम भविष्यातील अंतराळयात्रा आणि पृथ्वीवरील जीवन दोन्हीसाठी उपयुक्त ठरू शकतात.
अमेरिका आणि रशियामधील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही, अंतराळ क्षेत्र हे एकमेकांमधील सहकार्याचं एक शेवटचं उरलेलं उदाहरण आहे. डॉन पेटिट आणि दोन रशियन अंतराळवीरांनी या मोहिमेद्वारे हे अधोरेखित केलं.
नासाने जारी केलेल्या फोटोंमध्ये सूर्योदयाच्या पार्श्वभूमीवर छोटं कॅप्सूल पॅराशूटने पृथ्वीवर उतरताना दिसतं. उतरल्यानंतर तिघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी तंबूमध्ये नेण्यात आलं. डॉन पेटिट यांची तब्येत उत्तम असून परतीनंतरची ही सामान्य स्थिती असल्याचं NASAने स्पष्ट केलं आहे. कझाकस्तानमधून पुढे करगांडा शहरात आणि तिथून NASA च्या टेक्सासमधील जॉन्सन स्पेस सेंटर येथे डॉन पेटिट आणि त्यांचे सहकारी रवाना झाले आहेत.
७०व्या वर्षी अंतराळातून पृथ्वीवर परतणं, हे केवळ एक वैयक्तिक यश नाही तर नव्या पिढीसाठी एक संदेश आहे की वय म्हणजे केवळ एक संख्या आहे आणि स्वप्नांची मर्यादा कुठेही नाही!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.