सिंधु पाणीवाटप करार उध्वस्त करण्याचा भारत,अमेरिकेचा डाव: पाकिस्तान

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पाकिस्तानच्या शांतता प्रयत्नांस भारताकडून प्रतिसाद दिला जात नाही. शेजारी देशांबरोबर शांतता व सलोखा राखण्यासाठी पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे पाकिस्तान दुबळा देश आहे, असा समज करुन घेण्यात येऊ नये

नवी दिल्ली - अमेरिका व भारताने एकत्रितरित्या सिंधु नदी पाणी वाटप करार उध्वस्त करण्याचे कारस्थान आखल्याचा आरोप पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांनी केला आहे. याशिवाय मंत्रिमहोदयांनी अफगाणिस्तानवरही दोषारोप केले आहेत.

"भारत हा अफगाणिस्तानने पाकिस्तानविरोधात आखलेल्या कारस्थानांना पाठिंबा देत आहे. याशिवाय पाकिस्तानच्या शांतता प्रयत्नांस भारताकडून प्रतिसाद दिला जात नाही. शेजारी देशांबरोबर शांतता व सलोखा राखण्यासाठी पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे पाकिस्तान दुबळा देश आहे, असा समज करुन घेण्यात येऊ नये,' अशी टीका आसिफ यांनी केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री पद स्वीकारल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आसिफ बोलत होते.

भारतास "काही बंधने' पाळून सिंधु पाणीवाटप करारांतर्गत झेलम व चिनाब या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी असल्याचे जागतिक बॅंकेने नुकतेच स्पष्ट केले आहे.  मात्र पाकिस्तानचा या प्रकल्पांस विरोध आहे.सिंधू नदीवर पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानकडून चीनच्या सहकार्याने सहा धरणे बांधली जात असल्याची माहितीही नुकतीच उघड झाली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर आसिफ यांची ही भूमिका अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: India, US conspiring to sabotage Indus Waters Treaty