रामटेकडीत कचरा डेपो होऊ देणार नाही- कृती समितीने घेतली शपथ

संदीप जगदाळे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

बैठकीनंतर कृती समितीच्या सदस्यांनी रामटेकडी येथील रोकेम व दिशा प्रकल्पाची पाहणी केली. सत्ताधारी भाजप, पालकमंत्री आणि महापौरांच्या विरोधात घोषणा दिल्या. 

हडपसर : रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील नियोजित कचरा डेपो विरोधात कचरा डेपो हटाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. तसेच हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत कचरा डेपो होऊ देणार नाही, अशी शपथ या समितीच्या सदस्यांनी घेतली. सत्ताधारी लोकांचा कचरा डेपो सुरू करण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी रक्त सांडले अथवा प्रसंगी हातात काठी घ्यावी लागली तरी चालेल. गुन्हे दाखल झाले तरी चालेल, मात्र मागे हटायचं नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कचरा डेपोचा प्रश्न पेटला आहे. 

बैठकीस विरोधी पक्षनेते चेतन तुपे, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट, माजी आमदार महादेव बाबर, बाळासाहेब शिवरकर, माजी नगरसेवक सुनिल बनकर, शिवाजी पवार, विजय देशमुख, तानाजी लोणकर, निलेश मगर, अभिजीत शिवरकर, प्रशांत सुरसे, उल्हास तुपे, जयसिंग गोंधळे, दिलीप शंकर तुपे, संजय शिंदे, चंद्रकांत मगर, अमोल हरपळे, मुकेश वाडकर, ओम करे, वैभव माने, तुकाराम शिंदे, सागर भोसले, हेमंत ढमढेरे, नंदनी जाधव, पल्लवी सुरसे, समीर तुपे, राम खोमणे, सुरेश हडदरे यांसह रामटेकडी औद्योगिक वसाहतीचे प्रतिनिधी, विविध सोसायटया, संघटनांचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

तुपे म्हणाले, औद्योगिक वसाहतीत कचरा डेपो उभारावा याबाबत सर्वसाधारण सभेने मंजूरी दिलेली नाही. आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करून सत्ताधा-यांच्या दबावापोटी येथे कचरा डेपो सुरू करण्याचा घाट घातला आहे. नियमबाह्य व सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणा-या या प्रकल्पास आम्ही विरोध करणारच. अगोदरच हडपसरमध्ये तीन कचरा प्रकल्प आहेत. त्यात नवीन प्रकल्पाची भर पडल्यास हडपसरची ओळख कचरा डेपो म्हणून होईल, त्यामुळे राजकीय जोडे बाहेर ठेवून नागरिकांच्या सहभागातून आम्ही या प्रकल्पास विरोध करणार आहोत. 

बाबर म्हणाले, कचरा प्रक्लप, डूकरांचे प्रकल्प, मृत जनावरांसाठीचा प्रकल्प केवळ हडपसर मतदार संघातच का उभारायचे. संपूर्ण शहराच्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी शहराच्या चारही भागात कचरा प्रकीया प्रकल्प झाले पाहिजेत. आता यापुढे अशा प्रकारचा एकही प्रकल्प आम्ही येथे येऊ देणार नाही. त्यासाठी प्रत्येक नागरिक हातात काठया घेवून तयार आहेत. आम्ही पोलिसांचा अथवा सत्ताधा-यांच्या दबावाला बळी पडणार नाही. लोकांच्या मतावर निवडून आलेले भाजपाचे नगरसेवक व आमदार या प्रकल्पाबाबत काहीच बोलत नाही. त्यामुळे जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. पालिकेला कचरा डेपो करायचा असेल तर पालकमंत्री व महापौरांच्या मतदार संघात सुरू करावेत. 

शिवरकर म्हणाले, नियोजीत कचरा डेपोमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. जुन्या दोन प्रकल्पांमुळे ससाणेनगर, काळेपडळ व रामटेकडी या भागात पसरलेल्या दुर्गंधी आणि प्रदूषणात वाढ झाली आहे. नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नवीन कचरा डेपो विरोधात आम्हाला रसत्यावर उतरावे लागले तरी चालेल. मात्र नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, यासाठी हडपसरमधील प्रत्येक नागरिक पेटून उठला आहे. विकासाची सर्व कामे शहराच्या पश्चिम विभागात आणि नागरिकांना उपद्रव ठरणारे प्रकल्प हडपसरमध्ये हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सत्ताधा-यांच्या हुकुशाहिला आम्ही बळी पडणार नाही. कृती समितीद्वारे कचरा डेपो हटावा यासाठी न्यायालयात याचिका देखील जाहिर करणार आहोत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune marathi news hadapsar kachara depot ram tekdi opposed