चाळीसगाव : श्रीकृष्ण लेझीम मंडळाने फोडल्या 26 दहिहंड्या

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

श्रीकृष्ण लेझीम मंडळातर्फे जुने व नवे गाव मिळुन एकुण 26 दहिहंड्या फोडण्यात आल्या.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : येथे गोपाळकाल्यानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत श्रीकृष्ण लेझीम मंडळातर्फे एकुण 26 दहिहंड्या फोडण्यात आल्या. अशी माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.

गोपाळकाल्यानिमित्त सकाळी दहाला श्रीकृष्ण मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात रथ मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकी दरम्यान तरुणांनी लेझीम तर तरुणींनी टिपरी नृत्य सादर केले. तर श्रीकृष्ण भजनी मंडळाने विविध भजने गाऊन देवाचे नामस्मरण केले. मिरवणुकीत विशेष आकर्षण असलेल्या डांग जिल्ह्यातील (गुजरात) गाढवी येथील युवक मंडळाने चित्तथरारक लोकनॄत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. खास गोपाळकाल्याच्या उत्सव बघण्यासाठी स्थानिकांनी आपल्या नातलगांना आमंत्रीत केले होते. सकाळी दहाला निघालेल्या मिरवणुकीचा रात्री नऊला श्रीकृष्ण मंदिरासमोरील दहिहंडी फोडून समारोप करण्यात आला. मिरवणुकीसाठी श्रीकृष्ण लेझीम मंडळ व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी मेहुणबारे पोलीसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

यंदा तब्बल 26 दहिहंड्या...
श्रीकृष्ण लेझीम मंडळातर्फे जुने व नवे गाव मिळुन एकुण 26 दहिहंड्या फोडण्यात आल्या. गेल्यावर्षी  23 दहिहंड्या फोडल्या होत्या. त्यात यंदा 3 दहिहंड्यांची वाढ झाली. दहिहंडी निमित्त सर्व सुरक्षेची काळजी मंडळातर्फे घेण्यात आली होती. या दरम्यान कुठल्याही कर्यकर्त्याला दुखापत झाली नाही. दहिहंडीबद्दल मंडळ आधिच सतर्क असून पारंपरिकरित्या हा उत्सव साजरा करण्यावर भर आहे. नुसता थरांचा शो पीस न करता कार्यकर्त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन तीन थरांपर्यंत दहिहंड्या बांधल्या जातात. असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :