भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका आणि समाजसुधारक फातिमा शेख यांचे नाव आदराने घेतले जाते. या कोण आहेत हे तर तूम्हाला कळालेच असेल. पण, त्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई यांच्या सोबती होत्या हे ऐकून आश्चर्य वाटेल. हो, कारण, जसा सावित्रीबाईंच्या कार्याचा उल्लेख होतो तसा फातिमाजींच्या नावाचा होत नाही.
फातिमा शेख यांच्या नावाचा ९ जानेवारी २०२२ मध्ये अक्षरश: उदोउदो झाला. तेही परदेशात काम करणाऱ्या गुगलने फातिमाजींना आदरांजली वाहण्यासाठी डुडल बनवले. आता गुगलने डुडल बनवलं म्हणजे त्याची बातमी होणारंच. केवळ बातमी नाही तर सोशल मिडीयावरही त्यांचा प्रसार झाला.
सहसा आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी माहिती असतं, इथे पूर्वज म्हणजे पुरुष हे आपण गृहित धरतो. शेकडो वर्षं फक्त पुरुषांनी केलेल्या गोष्टींनाच समाजाप्रती असणारे भरीव योगदान समजलं गेलं आहे, मग भले मोठ्यातल्या मोठ्या संकटातून घराला तारून नेणारी बाई असली तर नाव लागतं पुरुषाचंच. हेळवी जे गावोगावी भटकून लोकांच्या घराण्याचे मुळ कुठून आले हे सांगतात. ते सुद्धा पुरूषांचीच नावे लिहीतात. एखाद्या व्यक्तीची पत्नी तिची मुलगी, एवढाच काय तो बाईचा उल्लेख.
त्याचप्रमाणे देशाला, समाजाला मोठं करणाऱ्या महिला अनामिक राहातात, अनेकदा त्यांचा साधा नामोल्लेखही कुठे केला जात नाही. त्यांनी केलेले कार्य दुर्लक्षित केले जाते. अशाच आपल्या एक पूर्वज आहेत फातिमा शेख.
आपल्या सर्वांना ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले माहिती आहेतच. ज्योतिबांच्या प्रोत्साहनामूळे सावित्रीबाई मुलींची शाळा सुरू करणाऱ्या देशातल्या पहिल्या महिला शिक्षक बनल्या. तर, त्याच शाळेत त्यांच्या एक सहकारी होत्या. त्याच या फातिमा शेख होय.
सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून फातिमाजींनी पहिली मुलींची शाळा उभारण्यात व ती यशस्वीरित्या चालवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आज त्याच फातिमाजींचा स्मृतिदीन. त्यांच्याच कार्याबद्दल आज जाणून घेऊयात.
फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 मध्ये पुण्यात, झाला. त्या काळात स्त्रीयांनाही शिक्षण देण्याची गरज आहे ही कल्पनाच नव्हती. महिलांना घराच्या हद्दीत ठेवले जात होते आणि त्यांना अभ्यास करू दिला जात नव्हता.
सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी मिळून दलित, मुस्लीम स्त्रिया आणि बालके यांना वर्ग, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. या योगदानासाठी फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका बनल्या.
१८४८ मध्ये मुलींसाठी भारतातील पहिल्या शाळांपैकी एक सह-स्थापना केली. आणि तिचे नाव स्वदेशी लायब्ररी ठेवले. फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांची भेट झाली जेव्हा त्या दोघींनी ‘सिंथिया फरार’ या अमेरिकन मिशनरीद्वारे चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला.
फातिमा शेख यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अशा वेळी पाठिंबा दिला. जेव्हा काही कट्टरवाद्यांना त्यांची महिला शिक्षित करण्याची मोहीम आवडली नाही. त्यामूळे दोघांनाही घराबाहेर काढण्यात आले. मग फातिमाजींनी यांनी या दोघांना आपल्या घरात राहण्यासाठी जागा तर दिलीच, पण मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात शाळा उघडण्याचीही जागा दिली.
त्यावेळी शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीत फातिमा शेख केवळ शाळेतच शिकवत नसून प्रत्येक घरोघरी जाऊन मुलींना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करत होत्या. त्यामुळे त्यांना समाजातील काही घटकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.
सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिक्षणाच्या प्रसाराचे काम केले. त्यांनी कधीही कोणत्याही मुलामध्ये धर्म-जातीच्या आधारे फूट पाडली नाही. तर प्रत्येक धर्माच्या मुलांना आपुलकीने शिकवण्याचे कौतुकास्पद काम केले.
या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना सत्यशोधक समाजाची चळवळ म्हणून मान्यता मिळाली. शेख यांनी घरोघरी जाऊन त्यांच्या समाजातील दलितांना स्वदेशी ग्रंथालयांमध्ये शिकण्यासाठी आणि भारतीय जातिव्यवस्थेच्या कठोरतेपासून वाचण्यासाठी आमंत्रित केले. त्याला मोठ्या कट्टरपंथीयांच्या प्रतिकारालाही सामोरे जावे लागले. पण, फातिमाजी स्त्रीशिक्षणासाठी लढण्यात कधीच मागे हटल्या नाहीत.
सावित्रीबाईंना फातिमांची किती साथ होती ते एका पत्रातून कळते. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना १०ऑक्टोबर १८५६ मध्ये लिहीलेल्या एका पत्रात त्या म्हणतात की, “माझी काळजी करू नका, तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन.फातिमाला सध्या त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही.”
अशा या धाडसी शिक्षिकेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. ज्योतिबा आणि सावित्रींबद्दल लिहीणाऱ्या काही मोठ्या लेखकांनाही याबद्दल फातिमाजींबद्दल पुसटशी माहिती आहे. त्यामूळे फातिमाजींचे कार्य ठळकपणे मांडता येत नाही. पण, तरीही त्यांचे मुलींच्या शिक्षणातील योगदान दुर्लक्षित करता येण्यासारखे बिलकूल नाही. अशा या थोर शिक्षिकेला माझा सलाम!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.