3.jpg
3.jpg 
Ganesh Chaturti Festival

बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभलेले लिंबागणेश

दत्ता देशमुख

बीड : मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ातील लिंबागणेश हे गाव. बीड शहरापासून २९ कि. मी. अंतरावर हे गाव वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक व धार्मिक अशी पार्श्र्वभूमी आहे. गणेश पुराणांत देखील या ठिकाणी असलेल्या गणेश मंदिराचा उल्लेख आलेला आहे.

महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी या गावी येऊन गेल्याचा उल्लेख ‘लीळाचरित्र’ मध्ये उल्लेखित आहे. पेशवे या गावी येऊन गेल्याचा कागदोपत्री उल्लेख असून हे गाव सरहद्दीवर असल्याने मराठेशाही व पेशवाईत त्याला फार महत्त्व होते. जवळच खर्डा हे ऐतिहासिक महत्त्वाचे गाव होते. मार्च १७९५ मध्ये खडर्य़ाच्या झालेल्या लढाईत निजामांचा संपूर्ण बीमोड झाला होता. निजामाला त्या वेळी अनेक अटी मान्य कराव्या लागल्या होत्या. खडर्य़ाचा विजय म्हणजे मराठेशाहीच्या वैभवाचा कळसच होता. 

नावातच गणेश असल्यामुळे लिंबागणेश गणपतीचे एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याबाबत अनेक आख्यायिका सांगण्यात येतात. मंदिराबाहेर एक बारववजा तीर्थकुंड आहे. व या कुंडास चंद्र पुष्करिणीतीर्थ असे नाव आहे. याच स्थानावर चंद्राने घोर तपस्या केली व गणेश यातून प्रकट झाले असे मानले अशी आख्यायिका आहे. सुमारे इ. स. १६ व्या १७ व्या शतकांत या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहेत. या मंदिरातील गणेशमूर्ती साधारणपणे दोन ते अडीच फूट उंचीची शेंदूरचर्चित आहे. मंदिरात पूर्वाभिमुख गणेशदर्शन होते.

लिंबागणेश येथील गणेश मंदिरात प्रतिवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून उत्सवांस प्रारंभ होतो. ऋषिमंचमीला त्याचे समापन महाप्रसादाने होते. या पाच दिवसांत श्रींची भक्तिभावाने पूजा होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत चार दिवसांत चार दिशेला असलेल्या गावाच्या सीमे(शिव) वरील गणेशाची पूजा करून आमंत्रण देण्याची म्हणजे द्वारपूजनाची अतिप्राचीन परंपरा आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून कानिटकरांच्या किल्लेवजा वाडय़ातून प्रारंभ होतो. गावातील सर्व भक्तगण या द्वारपूजनासाठी मोठय़ा संख्येने पायी (पदयात्रा) जातात. पूर्वेला पद्मावती पूजन, दक्षिणेस बोरजाई पूजन, पश्चिमेला नवरा-नवरी माळ या प्रसिद्ध स्थानावर पूजन होते व चतुर्थीला नामाजीबुवा किंवा पोखराईचे पूजन होते.

या चार दिवसांच्या काळात मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. गणेशाला वस्त्रालंकार चढवले जातात. सायंकाळी गणेशाची आरती केली जाते. प्रसादासाठी संपूर्ण गावातून, घराघरांतून वेगवेगळ्या कडधान्यांची उसळ चार दिवस मंदिरात आणली जाते. सर्व उसळी एकत्र करून गणेशास नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्यास सातळ असे म्हटले जाते. अखिल महाराष्ट्रात कुठेही ही प्रथा, परंपरा पहाण्यात येत नाही.

ऋषिपंचमीस प्राचीन परंपरेनुसार या मंदिरातील एक शेंदूरचर्चित गणेशमूर्ती षोडशोपचार पूजा करून  छबिना सोहळ्यासाठी सजविली जाते. पालखीतून रात्रभर जागर करून छबिना उत्सव सुरू होतो. पेशवाई थाटांत पालखीतून गणेश विराजमान होऊन मिरवणुक काढली जाते. घरोघरी व दारोदारी रांगोळ्या, कमानी, लाइटिंग फुलांची सजावट, पायघडय़ा घातल्या जातात. सर्वत्र गुलालाची उधळण असते.  सूर्योदयाच्या वेळी मिरवणूक गावाच्या वेशीवर येते. या ठिकाणी सर्व मानकऱ्यांना प्रसादाचा नारळ दिला जातो व पालखी मिरवणूक मंदिराकडे प्रस्थान करते. गावातील व बाहेरील अनेक शहरांतील लोक हा उत्सव पाहण्यासाठी येतात. अशा प्रकारे ऋषिपंचमी व  छबिन्यानंतर मंदिरातील उत्सव पूर्णत्वास जातो.

ज्येष्ठ मंडळींच्या मते मंदिरातील गणेशाचे तेजोवलय कानिटकर वाडय़ात प्राणप्रतिष्ठा झालेल्या मृण्मयी श्री मयूरेश्वर गणेशामध्ये प्रकडते. पुढील दशमीपर्यंत उत्सव अत्यंत पारंपरिक पद्धतीने सरकारवाडा, कानिटकरवाडा येथे साजरा केला जातो. एक गाव एक गणपती ही संकल्पना लिंबागणेश नगरीत गेल्या अडीच-तीनशे वर्षांपासून चालत आलेली आहे. सरकारवाडय़ातील गणेश सभागृहांत विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रवचने, व्याख्यान, भजनी मंडळांची भजने, कीर्तनसेवा, विविध स्पर्धाचे आयोजन  केले जाते.
श्रावण शुद्ध पंचमीस मूर्ती बनविण्यास प्रारंभ होतो. माणिकराव कानिटकर यांच्या घराण्याकडे हा मान पिढय़ान् पिढय़ा आहे. माती देणारे कुंभार मुळूकवाडी येथील वंशपरंपरागत आहेत. पारंपरिक पद्धतीने भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून गणेश कानिटकरवाडय़ात येतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणेशाची पूजा व प्राणप्रतिष्ठा केली जाते. लिंबागणेशचा हा महागणपती परंपरेप्रमाणे मूळ नक्षत्रावर गौरीसह विसर्जनास प्रस्थान करतो.
याच मूर्तीची कानिटकरवाडय़ातून यात्रास्थानापर्यंत पालखी मिरवणूक प्रचंड गर्दीत, भजनी दिंडय़ासोबत, वाद्य – वाजंत्रीसह निघते. सायंकाळी यात्रास्थानाहून चंद्रपुष्कर्णी तीर्थाकडे प्रस्थान होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात चंद्रपुष्कर्णी तीर्थावर साश्रुनयनांनी गणेशाला निरोप दिला जातो.

म्हणून गावाचे नाव लिंबागणेश...

बीड जिल्ह्यातील लिंबागणेश येथील गणपती प्रसिद्ध आहे. चंद्राने गणपतीचा उपहास केला, त्यावेळी गणेशाने दिलेल्या शापातून चंद्राला मुक्त करण्यासाठी सर्व देवतांनी लिंबागणेश येथे गणेशाची उपासना करून गणेशाची मूर्ती स्थापन केली. त्या गणेशाला भालचंद्र, असे म्हणतात. याच ठिकाणी गणेशाने लिंबासूर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून या गावाला लिंबागणेश असे म्हणतात. 

प्रत्यक्ष चंद्रदेवतेने स्थापन केलेला गणपती म्हणून हा श्री भालचंद्र. हे देवस्थान अहमदनगर-बीड रस्त्यावर आहे. या स्थानाचे वर्णन करताना मोरया गोसावी म्हणतात की, ‘चंद्रपुष्करणी तीर्थ मारुती सन्निध’ महानुभावपंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामींनी या स्थानाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. लिंबासूर नावाचा एक दैत्य येथे राहत होता. त्याने उच्छाद मांडला होता, तेव्हा गणेशाने लिंबासूरचा वध केला. लिंबासूराने मरताना गणेशाची क्षमा मागितली व हे स्थान त्याच्या व गणेशाच्या नावाने प्रसिद्ध व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.

 गणेशाने तसा वर दिला आणि हे ठिकाण त्या दैत्याच्या नावाने प्रसिद्ध झाले. मंदिर परिसरात दगडी कासव, होमकुंड, प्रदक्षिणा मार्ग, मंडपामागे मोठी दीपमाळ, प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मंदिराचा प्रकार फरसबंदी असून भक्कम तटबंदी आहे. जवळच दगडी बांधणीची एक पुष्करणी असून तिला चंद्रपुष्करणी असे म्हणतात. पुष्करणीच्या जवळच एक समाधी असून ती लिंबासूराची असल्याचे सांगितले जाते.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT