अमळनेर (जि. जळगाव) : शहरातील पिंपळे रोड ते धुळे रोडला जोडणाऱ्या रस्त्याची भुयारी गटारींच्या खोदकामामुळे दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना पायी चालणेही अवघड झाले आहे. पालिकेने मात्र याकडे डोळेझाक केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रस्त्यावर चालू देत नसाल तर रस्ता बंद करावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आम्हीच रस्ता बंद करू, असा इशारा नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. (Latest Marathi News)
यासंदर्भात शहरातील प्रभाग आठमधील माजी नगरसेवक विवेक पाटील व नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे रोड ते धुळे रोड जोडणाऱ्या रस्ता ४० फूट रुंदीचा असून, या रस्त्यावरून पुढे ढेकू रोड, पिंपळे रोड व गलवाडे रस्त्यावरील सर्व कॉलन्यांकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा वावर असतो. पालिकेने धुळे रोडवरून या रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून वाहतुकीची कोंडी सोडवली. मात्र वाहतूक सुरळित झाली असली तरी या रस्त्यावर भुयारी गटारीचे खोदकाम सरळ रेषेत न होता चुकीच्या पद्धतीने झाले असून, नियमाप्रमाणे ठेकेदाराने भुयारी गटारीच्या चाऱ्या बुजवून रस्ता (पूर्वी होता तसाच) मजबूत करून देणे कर्तव्यप्राप्त असताना ठेकेदाराने भुयारी गटारीची माती इतरत्र टाकून दिली.
चाऱ्या व्यवस्थित न बुजल्याने वारंवार खड्डे पडत आहेत. परिणामी, नागरिकांना त्या रस्त्यावर धड चालता येत नाही. शाळेतील जाणारे लहान मुले यांच्या सायकली फसून किरकोळ अपघात झाले. मोठी वाहने, मोटरसायकली फसल्याने वाहनांचे नुकसान होऊन प्रवाशांनाही दुखापत होते. याशिवाय चाऱ्यांमध्ये अवजड वाहने फसल्याने पिण्याच्या जलवाहिन्या तुटून नुकसान होत आहे. त्यामुळे पाणी आल्यावर पाणी वाया जाऊन रस्त्यावर साचते व पुन्हा घाण पाणी जलवाहिनीत जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच भुयारी गटारींच्या चाऱ्या व्यवस्थित न बुजल्याने धुळे रोड ते पिंपळे रोड दरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचून डबके तयार झाले आहेत.
तसेच या ठिकाणी माती असल्याने पाऊस झाल्यावर तिथे चिखल तयार होतो. तर डांबरी रस्त्यावर खड्डे पडून त्याची चाळणी तयार झाली आहे. यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदनावर माजी नगरसेवक विवेक पाटील, संजय पाटील, आकाश बोरसे, राजेश बोरसे, प्रवीण पाटील, विजय भदाणे, एस. व्ही. पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, अरुण पाटील, पुंडलिक पाटील, गिरधर पाटील, पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील, विश्वेश पाटील, निंबा पाटील, संभाजी पाटील, किशनराव पाटील, विकास पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तक्रारी करूनही दुर्लक्ष
अनेकदा तक्रारी करूनही नगरपालिका, जीवन प्राधिकरण विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्हाला नागरिकांना सर्व प्रकारचे कर नियमित भरूनही रस्त्याने चालू देत नसाल तर भुयारी गटार व रस्त्याचे काम होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी व कायमचा बंद करण्यात यावा, असे प्रभाग आठमधील रहिवासी नागरिकांनी पालिकेला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.