पनवेलमध्ये विजेचा लपंडाव
पनवेलमध्ये विजेचा लपंडाव 
कोकण

पनवेलमधील या गावांमध्ये विजेच्या खेळखंडोबाने नागरिक त्रस्त; विद्युत उपकरणे होत आहेत नादुरुस्त

विक्रम गायकवाड

पनवेल : पनवेल तालुक्‍यातील नेरे व आजूबाजूच्या गावात नव्याने उभ्या राहिलेल्या वसाहतीत शेकडो गरजवंतांनी मोठ्या प्रमाणात घरे खरेदी केली आहेत. मात्र, काही महिन्यांपासून या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरणने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

पनवेल तालुक्‍यातील भिंगारी ते धोदाणी या भागातील रहिवासी तीन ते चार वर्षांपासून विजेच्या लपंडावाचा अनुभव घेत आहेत. या भागात दिवसातून एक-दोन तासांनी म्हणजेच सरासरी 50 टक्के ही वीज गायबच असते. खंडित झाल्यानंतर वीज पूर्ववत कधी होईल, याचीही खात्री नसते. काही महिन्यांपासून तर विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे तर येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. 11 ऑगस्ट रोजी अशाच प्रकारे सकाळी 6.30 वाजता येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे 2 च्या सुमारास हा पुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे येथील रहिवासी सांगतात. महावितरणकडून अशाच प्रकारे दर मंगळवारी वीजपुरवठा खंडित केला जातो; मात्र याबाबत कोणताही संदेश पाठवण्यात येत नाही. त्यामुळे महावितरणने या भागातील विजेच्या समस्येवर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. 

नुकसानीचा पाढा 
कोरोनामुळे बहुतेक कर्मचारी घरी बसून काम करत आहेत. त्याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे या सर्वांचेच मोठे नुकसान होत आहे. याशिवाय वयोवृद्ध, महिला व आजारी व्यक्तींचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अचानक वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे घरातील विजेवर चालणाऱ्या उपकरणांचेही नुकसान होत आहेत. 

सबस्टेशनच्या प्रतीक्षेत
या भागात सबस्टेशन उभारल्यावर भविष्यात या भागातील वीजपुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे महावितरणकडून नेहमीच सांगितले जाते. मात्र, हे सबस्टेशन भविष्यात कधी उभे राहील, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात येत नसल्याचे या भागातील रहिवासी सांगतात. महावितरणकडून या भागातील जुन्या यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी आवश्‍यक असलेली साधनसामग्रीची खरेदीही केली आहे. 

पनवेल तालुक्‍यातील भिंगारी ते धोदाणी या गावांना महावितरणच्या एकाच वाहिनीमधून वीज पुरवण्यात येते. यातील एखाद्या गावात काही कारणास्तव वीज पुरवणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यास या परिसरातील सर्व गावांना अंधारात राहावे लागते. 
- सुनील हेतकर, रहिवासी 

चक्रीवादळामुळे पनवेलच्या बऱ्याच भागात विजेचे खांब पडले होते. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार घडले. मात्र, आता वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तसेच, वीज पुरवठ्याची यंत्रणा ही जुनीच असल्यामुळे पनवेल शहरात सब स्टेशन उभारले आहे. नेरे आणि गव्हाणफाटा येथेही सब स्टेशन उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विजेची समस्या कायमची संपून जाईल. 
- ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

(संपादन : उमा शिंदे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT