मिरज : येथील एका महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण (Corona Infected)झाल्याचे आज (ता. २७) स्पष्ट झाले. या महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीस तपासणीमध्ये कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच, तिच्या संपर्कातील अन्य सात विद्यार्थिनींचीही तातडीने तपासणी करण्यात आली. त्याही विद्यार्थिनींना कोरोना झाल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या विद्यार्थिंनी रहात असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थिंनीसह त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, या महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनी वसतिगृहातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या या आठ विद्यार्थिनींपैकी एक विद्यार्थिनीने काही किरकोळ लक्षणे दिसल्याने तिने स्वतःची तपासणी करून घेतली असता यामध्ये तिला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. त्यावर तिच्या संपर्कातील विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. त्यांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. या आठही विद्यार्थिनींना परिसरातीलच विशेष इमारतीमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले आहे. त्यानंतर या विद्यार्थिंनी वास्तव्यास असलेल्या वस्तीगृहातील सर्वच विद्यार्थिनींच्या तपासणीची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तपासणी करण्यात येणार असल्याचेही महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या सर्वच वसतिगृहांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थिनींची येत्या महिन्याभरात परीक्षा असल्याने व ग्रंथालयांमध्ये अभ्यासासाठी जात असल्याने ग्रंथालयातही आता निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होते आहे.
जिल्हा प्रशासनही सतर्क
या आठ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले असले, तरी यापैकी एकाही विद्यार्थिनीला अन्य कोणतीही लक्षणे नसल्याचेही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.