इ.स. १९२९ मध्ये नानासाहेब अमेरिकेतील आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. दहा वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यात त्यांनी तेथील पत्रकारिता जवळून अनुभवली. फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन वृत्तपत्रांसाठी त्यांनी वार्तांकनाचे काम केले. आधुनिक पत्रकारिता, वाचकाभिमुख दैनिक, आपला वाचक वर्ग, दैनिकाचे स्वरूप या संबंधीचे त्यांचे आडाखे याच काळात निश्चित झाले.
परुळेकरांनी १ जानेवारी १९३२ रोजी ‘सकाळ’ हे दैनिक सुरू केले. त्यानंतर मराठी वर्तमानपत्रांनी एक प्रकारे कात टाकली. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवले. त्यांचे ‘निरोप घेता’ हे आत्मचरित्र १९८३ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यातीलच ‘सकाळ’च्या जडणघडणीतील काही किस्से पाहुयात.
जाहिरात हा वृत्तपत्रांच्या उत्पन्नाचा मोठा आधार. परंतु ‘सकाळ’ने ब्रिटिश राजवटीत आदर्श कर्तव्याचे पालन करण्याचे धोरण ठामपणे स्वीकारल्यामुळे तत्कालीन सरकारने जाहिराती पुरविण्याच्या संदर्भात ‘सकाळ’चे नाव काळ्या यादीत टाकले होते. पुण्याच्या तत्कालीन नगराध्यक्षांच्या मोटारीला अपघात झाला होता.
मात्र या घटनेचे वृत्त छापता कामा नये, असा आदेश मिळाल्यानंतरही ‘सकाळ’ने कर्तव्यधर्म पाळून बातमी लावली. परिणामी, ‘सकाळ’ला पालिकेच्या जाहिरातींना दीर्घकाळ मुकावे लागले, तरी कर्तव्य पहिले समजून त्यांनी जाहिरातीवर पाणी सोडले.
दैनिक काढण्यामागची नानासाहेबांची भूमिका खूप वेगळी होती. त्यांना वृत्तपत्राचे स्वरूप अधिकाधिक खुले करायचे होते. समाजातील सर्व स्तरांना त्यात सामावून घ्यायचे होते. नानासाहेबांनी प्रत्यक्ष दैनिक सुरू करण्यापूर्वी त्या वेळच्या दैनिकांचा अभ्यास केला. त्याचा वाचकवर्ग कमी का आहे तपासून पाहिले. त्यांना असे दिसून आले की, वाचकांना तपशीलवार तर सोडाच, ताज्या बातम्याही मिळत नाहीत. मग त्यांनी एक परिपूर्ण मराठी दैनिक कसे देता येईल याचा विचार सुरू केला.
'सकाळ' सुरू केल्यानंतर वर्षभरातच नानासाहेबांनी ‘साप्ताहिक सकाळ’ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले आणि त्यानंतर काही दिवसांतच ‘तेज’ नावाचे एक कमी किंमतीचे दैनिकही सुरू केले. एकदा पुण्यातील वृत्तपत्रे मार्गी लावल्यावर मुंबईमध्येही वृत्तपत्र सुरू करण्याचे विचार नानासहेबांच्या डोक्यात घोळू लागले.
मुंबईतील दैनिकाचा विचार पक्का होताच नानासाहेबांनी २१ मार्च, इ.स. १९३६ रोजी ‘स्वराज्य’ दैनिक सुरू केले. पुढे ‘स्वराज्य’चे दैनिक स्वरूप बदलून ते साप्ताहिक करण्यात आले आणि कालांतराने तर त्याची मुंबईतूनही उचलबांगडी झाली. ‘तेज’ दैनिक तर बंद पडलेच पण ‘सकाळ’लाही आर्थिक तूट भरून काढावी लागली.
नानासाहेबांना तीस-चाळीस खटल्यांना तोंड द्यावे लागले. मानसिक क्लेशही सहन करावे लागले. पुण्यातील रूढीप्रिय, परंपरावादी गटाला नानासाहेबांची मुक्त धोरणे आवडत नव्हती. त्याबद्दल ते नानासाहेबांची टवाळीही करीत असत. या अपयशामुळे नानासाहेबांना त्यांचा रोषही सहन करावा लागला.
‘सकाळ’चा वाढलेला व्याप पाहून, “नानासाहेब यांनी कोठून पैसे आणले?”, असे म्हणत लोक नानाविध तर्कवितर्क करत असतात. हा पैसा मी आणि ‘सकाळ’मधील माझे सहकारी यांच्या निढळ्या घामाचा आहे. यावर लोक शंका घ्यायचा. लोकांचे तर्कवितर्क कसे चमत्कारिक असतात, याचे एक उदाहरण पाहण्यासारखे आहे.
नानासाहेबांनी त्या काळात कुठलेही पाठबळ नसताना वृत्तपत्र व्यवसायात पाऊल ठेवले आणि ते यशस्वी करून दाखवले. अपयश हा अनुभवातून शिकण्याचा एक टप्पा आहे असे मानून त्यांनी नव्याने व्यवसायाची नौका हाकारली; म्हणूनच त्यांचे नाव आज यशस्वी संपादकांच्या मांदियाळीत घेतले जाते.
‘सकाळ’ च्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली, त्या वेळेस काही जण म्हणू लागले. ‘पेशवे आणि नंतरच्या सरदार-मानकऱ्यांच्या घराण्यांतील लोकांच्या दासी या ठिकाणी राहत होते. त्यांनी पुरून ठेवलेले घबाड नानासाहेबांना आयते मिळाले असावे.’
त्यावर नानासाहेब मिश्किलपणे म्हणत की, येथे पुरून ठेवलेले मला मिळाले, यात काही शंका नाही. तो एक पाच-साडेपाच फूट लांबीचा पुरुषाचा सांगाडा होता. प्लेगच्या दिवसांत इंग्रज सैनिक घरात शिरून लागण झालेल्याला घेऊन जात, प्रसंगी घरातल्या लोकांचा नानाप्रकारे छळही करत असत. तेव्हा इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी साथीत दगावलेल्यांची प्रेते कित्येकदा गुपचूप पुरून टाकण्यात येत. त्यांतील तो सांगाडा असावा, तो मी ससून हॉस्पिटलला देऊन टाकला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात एका गोष्टीने नानासाहेबांना तारून नेले आणि ती म्हणजे त्यांची व्यावसायिकता. त्यांनी पत्रकारितेला समाजसेवेचे साधन मानले, तरी त्यात व्यावसायिकता आणली. त्याचबरोबर धंदेवाईकपणा दूर ठेवला. बांधावरच्या शेतमजुरालाही त्याच्या अस्तित्वाशी निगडित बातम्या पुरवून त्यांनी आपले दैनिक सर्वव्यापी केले.
पत्रकारीतेच्या प्रवासाबद्दल नानासाहेबांनी आत्मचरीत्रात नोंदवले आहे की, ‘माझ्या जीवनात अनुभव जसजसे आले आणि त्यातून जसे दिसले, ते वाचकांपुढे ठेवावेत, त्यांतून त्यांना काही घेता आले तर घ्यावे, यापलीकडे माझा काही संकल्प नाही. हे करत असताना साऱ्या आयुष्याची दृष्टी मजपुढे आहे.
एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील विक्रम, सिद्धी किंवा त्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान मला सांगावयाचे नाही. त्यामुळे हे माझे लिखाण जास्तीत जास्त समाजाला उपयोगी पडू शकेल, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांत त्यातले काही घेता येण्यासारखे होईल, असे मला वाटते.
पुढे ते म्हणतात की, ‘माझा मूळ पिंड शिक्षकाचा. तो वृत्तपत्राच्या चौकटीत आणून मी ओतला. हे काम अत्यंत जिकिरीचे. तारेवरची कसरत म्हटले तरी चालेल. शिक्षक स्वतंत्र बुद्धीचा, स्वतंत्र विचाराचा, कोणाशी बांधून न घेतलेला, केवळ विद्या व लोकहिताच्या दृष्टीने वागणारा असेल, तर त्याचा प्रभाव. हे गुण मी वृत्तपत्रात आणून सोडण्याची शिकस्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.