राजीव सातव 
महाराष्ट्र बातम्या

सहवासाच्या दशकातील मी अनुभवलेला राजकारणातील संत- माझे सातव साहेब

सकाळी सहा वाजलेपासून ऑफिसमध्ये आठ जिल्ह्यातून येणारे पक्षकार यायला सुरुवात व्हायची. झोप मोड थोडी थोडी करत कसा बसा मी सातवाजेपर्यंत झोपायचो आणि तयार होऊन, नास्ता, चहा पाणी करुन परत नऊला माझ्या कामाची सुरुवात होत असे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : माझ्या वयाच्या 23 व्या वर्षी 2010 माझी औरंगाबादमधून सातव साहेबांचे (Rajiv Satav) मित्र उच्च न्यायालयाचे वकील श्री विजय लटंगे यांची भेट माझे मित्र वकील बालाजी शिंदे यांनी घडून दिली. त्यावेळेस मी 2005 ते 2010 या कालावधीमध्ये आमचे उस्मानाबादचे वकील आनंदसिंह बायस यांच्याकडे स्टेनो म्हणून काम करत होतो. सकाळी नऊपासून कामाची सुरुवात करून दिवसभर त्यांचे शेयर मार्केटचे बोल्ट ऑपरेटर म्हणून काम करायचं. नंतर मॅटर चे Annexure टायपिंग करायचे, संध्याकाळी वकील साहेब कोर्टातून आले की Dictation घ्यायचे आणि ते टाईप करायचे असा रात्रीच्या 12.30 -1.00 पर्यंतचा माझा जॉब आणि रात्री ऑफिसमध्येच राहायची माझी सोय त्यांनी केली होती. (in -politics- that- I- experienced- in the decade- my- satav- Saheb)

सकाळी सहा वाजलेपासून ऑफिसमध्ये आठ जिल्ह्यातून येणारे पक्षकार यायला सुरुवात व्हायची. झोप मोड थोडी थोडी करत कसा बसा मी सातवाजेपर्यंत झोपायचो आणि तयार होऊन, नास्ता, चहा पाणी करुन परत नऊला माझ्या कामाची सुरुवात होत असे. असा हा माझा दिनक्रम सुरु राहायचा तोही न थकता, न कंटाळता तोही प्रामाणिकपणाने. गरीब घरातून उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेड्या या छोट्याश्या गावातून 12 वी पर्यंतच्या शिक्षणाने आणि सोबत स्टेनोग्राफी , एम. एस. सी. आय. टी, मराठी व इंग्लिश टायपिंग एवढस ज्ञान घेऊन मी औरंगाबादला कमवा व शिका असं धोरण आत्मसात करून काम करत माझं पदवीच शिक्षण आणि कॉम्पुटर हार्डवेअर & नेटवर्किंगचा डिप्लोमा पूर्ण करत प्रामाणिक पणे काम करणं सुरू केलं.

मार्च 2010 ला साहेबांची भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांनी नेमणूक केली होती आणि त्यांना दिल्लीसाठी एक चांगल्या पी.एची आवश्यकता असल्याचे मला वकील बालाजी शिंदे यांनी सांगितलं आणि दत्ता तु त्यांच्याकडे काम करशील का विचारला आणि विजय लटंगे यांनी साहेबांच्या चांगुलपणाचा पाढाच मला सांगितला. मला म्हणाले दत्ता माझा मित्र राजीव भाऊ खूप मोठा नेता होणार आहे. भविष्यात तू त्यांच्याकडे काम कर तु पण मोठा होशील. माझा मित्र मोठा झाला की आपण सगळेच मोठे असू आणि मला त्यांच्याकडे काम करण्याची प्रेरणा दिली आणि मी ही काम करण्यास उतावीळ झालो.

हेही वाचा - सोशल मीडियावर होते या गायीची चर्चा

डिसेंबर 2010 ला मी दिल्लीला साहेबांकडे पाच रायसीना रोड या कार्यलयात काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा पी. ए म्हणून मला त्यांनी त्यांच्या घरीच 43 मिना बाग येथे त्यांच्या सोबतच बाजूच्या रुममध्ये राहण्यासाठी सांगितले. त्यांच्याकडे मुंबईचा रजित नावाचा अजून एक जन कामासाठी होता. रजित आणि मी दोघेही साहेबांसोबत राहायचो. साहेब आम्हा दोघांनाही नेहमी सोबत ठेवायचे आमचा सकाळचा नास्ता पासून ते रात्री जेवणापर्यंत आम्हाला कधीही अंतर ठेवलं नाही. सतत आम्हाला सोबत घ्यायचे. काही वर्षानंतर रजित साहेबांना सोडून गेला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना प्रत्येक राज्यातील कार्यकर्ते साहेबाना भेटण्यासाठी येत प्रत्येकाला ते आदराने बोलत त्यांचा ऐकत असत आणि त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवता येतील हे पहात. त्यावेळी साहेब महाराष्ट्र विधानसभा सदस्य ही होते (आमदार) त्यामुळे सोमवारी ते शुक्रवार दिल्लीमध्ये किंवा इतर राज्यातील युवक काँग्रेसचे प्रोग्रॅम असतील तर ते उरकून शनिवारी आणि रविवार हा त्यांच्या वेळ सतत कळमनुरी मतदार संघासाठी असायचा. शनिवारी सकाळी दिल्ली वरून नांदेडसाठी पहाटे 5.50 चे विमान असायचे शुक्रवारी साहेब रात्री 12 किंवा 12.30 ला झोपूनसुद्धा सकाळी तीनला उठायचे आणि आम्ही चार वाजता एअरपोर्टला त्यांना सोडायला निघायचो.

जाताना गाडीमध्येसुद्धा त्यांच काम चालू असायच्या एखाद्या मेलचे डिक्टेशन द्यायचे, दिवसभरच्या कामाची लिस्ट द्यायचे आणि मला म्हणायचे मला अपडेट दे. तिथे नांदेडला पोचल्यावर विमानतळावरही ते कधी घरी आपल्या फॅमिलीला भेटायला जात नसत त्यांचे नियोजित दौरे, लोकांच्या गाठीभेटी ठरलेली कामे अगोदर करत दुपारचे जेवण ही ते बाहेरच कुण्या कार्यकर्त्याच्या घरी करत आणि रात्री कधी- कधी उशीरा पण घरी त्यांना पोचण्यासाठी होत असे. त्यांच्यासाठी प्राधान्यही नेहमी आपले काम असे. हे मग मी 2 दिवसानी त्यांनी दिलेली कामे पूर्ण करून त्यांना आणायला परत एअरपोर्टवर यायचो. मला म्हणायचे दत्ता कधी कधी घरी रात्री उशिरा गेलं की लेकरांची भेट पण होत नाही ते झोपलेले असतात आणि सकाळी मी लवकर उठून परत मतदार संघातील दौरे, प्रोग्राम, लग्न करून दिल्लीला येतो. हे ऐकून कधी कधी त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं पण म्हणायचे काय करणार आपल्याला नेत्याने ( राहुल गांधी ) ने खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि ती आपल्याला पार पाडायची आहे आणि सोबत मतदार संघाकडे पण लक्ष द्यायच आहे.

येथे क्लिक करा - राजीव सातव आपल्यामध्ये नाहीत हे मन मानायला तयार नाही. मागील पंधरा वर्षापसून आम्ही सतत सोबत होतो. या काळात सातव यांनी पक्षवाढीसाठी निस्वार्थ भावनेने केलेले काम आपण जवळून पाहिले आहे.

या 2010 ते 2014 च्या काळामध्ये साहेबांनी युथ काँग्रेस संघटन वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले, विरोध प्रदर्शने, मेळावे, बैठका अशा माध्यमातून सर्व राज्यात युवक काँग्रेसचे संघटन मजबूत केले. प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या ही त्यांनी खालल्या. प्रत्येक काम निष्ठतेने आणि राहुलजीनी माझ्या नेत्याने दिलेली जबाबदारी म्हणून प्रामाणिक पणे पार पडण्याची त्यांची सवय मला नेहमी आवडायची. युवकचे अध्यक्ष असतांना त्यांच्या करकीर्दीमध्ये युवक काँग्रेसच्या कोट्यामधून पाच राज्यामधून जवळ पास 150 च्या आसपास त्यानी युवकांना तिकीट दिले. कितीतरी युवकांना त्यांनी आमदार, खासदार, मंत्री बनविले पण त्यांनी साधी मिठाई पण कुणाची खाल्ली नाही कोणी आमदार मिठाई घेऊन आला तर ती ऑफिसच्या सगळ्या स्टाफना वाटायला सांगायचे. कधी ही कुणाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा ते ठेवत नसत. ते नेहमी म्हणत आपण कधीच कोणाच्या भानगडीत कधी पाडायचं नाही. आपण आपल नेहमीं इमानदारीने काम करत राहायचं. आणि या गोष्टी मी नेहमी जवळवून बघायचो आणि आत्मसात करत रहायचो.

मला साहेबांबद्दल खूप आदर या त्यांच्या वागण्यामुळे वाटू लागला. मला त्या वेळी त्यांच्या बी. एस. एन. एलचा नंबर असलेला फोन द्यायचे आणि म्हणायचे सर्वांचे निरोप घेत जा आणि मला देत जा. मी ते करून त्यांचे निरोप जे काही असतील, त्यांची कामे त्यांना विचारून मार्गी लावत असे कधी कलेक्टरला फोन असेल, डिपीचे विषय असतील किंवा पोलिस स्टेशनची कार्यकर्त्यांची कामे असतील प्रत्येक काम करत असत. ते म्हणायचे लोकांची कामे आपल्याला खूप छोटी वाटतात पण ती त्यांच्या साठी खूप मोठी असतात आपण त्यांची कामे केलीच पाहिजेत. साहेब आमदार असल्यामुळे त्यांचा मुंबईचा पी. ए. सावतकर हे होते. सावतकर बद्दल बोलायचे की सावतकर हा कामासाठी खूप चांगला आहे. तो डायरेक्ट अधिकाऱ्यांसोबतसुद्धा एखाद्या कामाबद्दल अडून बसतो पण तो मतदार संघातल्या लोकांना नीट हँडल करत नाही. त्यांच्याशी प्रेमाने बोलत नाही. बायको आणि आई पण त्याच्या कामावर खूष नाहीत असं नेहमी म्हणत असत. नंतर काही काळानी राजेंद्र गोसावी यांना मुंबईच्या पी. ए म्हणून साहेबांनी त्यांना जबाबदारी दिली. त्यांचं काम खूप चांगला होत ते त्यांना आवडायचं.

हे उघडून तर पहा - नांदेड विभागाचा पट्टा पडला; ९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडून काँग्रेसला राहुलजीच्या सांगण्यावरून देण्यात आला व साहेबांना तिकीट देण्यात आले. मी त्यावेळेस कळमनुरीमध्ये होतो. साहेबांसोबत प्रचार सभेमध्ये सहभागी होतो. त्या काळात काँग्रेस विरोधात वातावरण होते पण लोकांची कुजबुज चालू असायची आपण पक्षाकड नाही तर माणसाकडं बघून या वेळेस मत करायचा आपला माणूस देवमाणूस आहे त्याला यंदा निवडून द्यायच आणि मोदी लाटेमध्ये साहेब 1632 मतांनी निवडुन आले. दिल्लीला लोकसभेमध्ये सुरवातीला त्यांनी मला सांगितलं हिंगोली लोकसभेचे या अगोदरचे सर्व झालेले खासदार त्यांची भाषणे, त्यांच्या मागण्या, त्यांनी विचारलेले प्रश्न सगळे काढून घे मला त्यांचा अभ्यास करायचा आहे. मी एक महिन्याचा कालावधी घेऊन त्यांची सर्व रेकॉर्ड्स काढले आणि त्यांना अभ्यासाला दिले. त्यामध्ये परभणीचे माजी खा. शिवाजीराव देशमुख , हिंगोलीच्या माजी खा. सुर्यकांता ताई, शिवाजी माने, सुभाष वानखेडे यांचा समावेश होता. आमच्या ऑफिसमध्ये माझ्यासह अजून दोन जणांची टीम होती.

दिल्लीमध्ये रिसर्चसाठी साहेब सर्वाना सोबत घेऊन लोकसभेमध्ये कुठल्या मुद्यावर भाषण द्यायच, कुठला मुद्दा मांडायचं काय मागणी करायची यावर चर्चा करत. कधी लोकसभेमध्ये भाषणं असलं की अदल्या रात्री जेवणं झालं की 10-10.30 वाजता आरशा समोर उभे राहायचे, मला घड्याळ लावायला सांगायचे आणि भाषणाची तयार करायचे झालं की म्हणायचे दत्ता किती वेळात पूर्ण झालं सांग आणि चांगला झालं ना ? अस विचारायचे. आपण लोकसभे मध्ये दररोज बोलला पाहिजे असं ते म्हणायचे मग ते शून्य प्रहरामध्ये असेल किंवा स्पेशल मेंशनद्वारे असेल. आम्ही नेहमी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना भेटायला जायचो त्यांची वेळ घेऊन आणि साहेब ताईंना म्हणायचे ताई माझ्या मतदारसंघासाठी कधी कधी मला शून्य प्रहारामध्ये बोलण्यासाठी संधी देत जा अशी विनंती करायचे आणि आमचा कधी प्रश्न नाही लागला तरी ताई त्यांना प्रश्न विचारण्याची संधी द्यायच्या. त्यांची चिकाटी पाहून त्यांनाही नवल वाटायचं कारण कुणीही विरोधी पक्षाचा माणूस असा सारखा भेटायला यायचं नाही. फक्त साहेब असे होते की त्यांना संबंध बनवायला खूप आवडायचं. सगळ्यांना प्रेमाने बोलण्याची सवय असायची त्यामुळे संसदेमध्येसुद्धा सुरक्षा रक्षक गार्ड, पक्ष कार्यालयातील कर्मचारी, नोटीस ऑफिसमधील स्टाफ यांना साहेबांबद्दल जिव्हाळा असायचा.

हे वाचलेच पाहिजे - हिंगोलीत पेट्रोलने केली शंभरीपार; वाहनधारक त्रस्त

2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अशोक गहलोतजी सोबत यांनाही सचिव गुजरात सहप्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली. सहप्रभारी म्हणून वर्षाताई गायकवाड, हर्षवर्धन सपकाळ, जितू पटवारी यांचाही समावेश होता. साहेबाना सौराष्ट्र झोनची जबाबदारी देण्यात आली होती. या जबाबदारीमध्येसुद्धा त्यांनी जीवाचे रान करून प्रसंगी पोलिसांकडून मार सुद्धा खाऊन सर्वात जास्त आमदार या झोनमधून निवडून आणले. ही सुद्धा जबाबदारी त्यांनी अगदी प्रामाणिकपणाने व निष्ठेने पार पडली. त्यामुळे अशोक गहलोतजी राजस्थानमध्ये विधानसभेसाठी त्यांच्या राज्यात गेल्यामुळे साहेबांना गुजरात राज्यांच पूर्ण प्रभारी पद पक्षाकडून देण्यात आलं.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवावी का नाही या बद्दलच्याही बऱ्याच चर्चा आमच्या व्हायच्या या काळामध्ये आमच्या सोबत अमर खानापूरे होते. त्यांची निष्ठा ही साहेबांसोबत नेहमी असायची भाऊ आपण लढल पाहिजे असा त्याचा आणि माझा आग्रह साहेबांना असायचा, पण साहेबांनी मतदारसंघात बऱ्याच प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून लोकसभा लढणार नसल्याचे सांगितले. आपण का लढत नाही हे ही सांगितलं आणि शेवटी आपला निर्णय राहुलजीशी चर्चा करून अंतिम केला. राहुल गांधीजीनी साहेबाना विचारला तू मग लोकसभा लढणार नाहीस तर तुझ्या डोक्यात विधानसभा लढवायची असा विचार आहे का तू पूढे काय करशील. त्यावर साहेब म्हणाले मी पूढील पाच वर्षा पक्षासाठी काम करेन. मी विधानसभा नाही लढवणार कारण मी ती आधीच माझ्या आदिवासी कार्यकर्तासाठी सोडली आहे आणि मला ती जर परत पकडायची असती तर मी त्या जागी आदीवासी समाजातील माझा कार्यकर्ता न लढवता माझी बायको लढवली नसती का ? यावर राहुल जी साहेबांवर खूष झाले आणि म्हणाले मी तुझ्या सोबत आहे गुजरात मध्ये जास्त लक्ष दे.

राज्यसभा निवडणुकीमध्ये साहेबांना वाटत नव्हते की त्यांना राज्यसभा देतील. मॅडम नी साहेबाना 10 जनपथ ला बोलावून घेतलं आणि सांगितलं राजीव मला राज्यसभा महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याला द्यायची आहे (मी यामध्ये त्याचं नाव मेंशन करत नाही ) पण राहुलचा तुझ्यासाठी आग्रह आहे. त्यामुळे आम्ही तुला देत आहोत. यावर साहेबानी, मॅडमला सांगितलं. मॅडम आपण महाराष्ट्रामधील जेष्ठ नेत्याला ही राज्यसभा देत असाल तरी माझा काही त्या मध्ये आग्रह राहणार नाही माझें पक्ष संघटनेमध्ये काम करण्यास नेहमी प्राधान्य राहील. असे साहेबाचे विचार असायचे.

येथे एकदा किल्क करा - विज्ञानयुगात बारा बलुत्तेदारांच्या पारंपारिक व्यवसायाला खिळ आणि पोटाला पीळ

साहेब राज्यसभा खासदार झाले ही गोष्ट बऱ्याच लोकांनां अचंबित करणारी होती कारण साहेबांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्यामुळे मतदार संघातील बऱ्याच लोकांनी, आमच्या स्टाफमधील लोकांनी, आणि बऱ्याच जणांनी साहेबाकडे पाठ फिरवली होती. साहेबांनी लोकसभा हरण्याच्या भीतीने लढली नाही आणि राजीव सातव आता संपला त्याचं काही राहील नाही याची चर्चा आमच्याच लोकांनी चालू केली होती. 2019 ते 2020 या एक वर्षच्या कालावधीमध्ये आम्ही अंदमान निकोबारचे खासदार यांच्या गेस्ट accomdation मध्ये राहिलो आणि मला त्यांनी त्यांचा पी. ए म्हणून लोकसभे चे काम पाहण्यासाठी सांगितलं मी ज्या वेळेस ते खासदार असतील त्या वेळेस त्यांचे काम करत असे. आणि ते नसले की साहेबांचे. मी सकाळी 10 ते रात्री 10 वेळेत त्या खासदारांसोबत असलो तरी रात्री साहेबासोबत काम करण्यासाठी यायचो आणि साहेब म्हणायचे मालक आलात का, तू जा घरी, मी काही असलं तर फोन करतो. पण मी साहेबांची साथ कधी सोडली नाही साहेबानी मला 10 वर्ष खूप प्रेम दिल खूप जीव लावत होते.

साहेब मला नेहमी म्हणायचे दत्ता तुझ्यातला चांगला गुण कोणता आहे माहितेय, तू प्रामाणिक आहेस मेहनती आहेस, इमानदार आहेस आणि यामुळेच तू माझ्यासोबत टिकून आहेस. मला हुशार माणसं खूप मिळतील रे पण प्रामाणिक माणसं शोधणं खूप अवघड आहे. तू कुठल्या भानगडी करत नाहीस आपलं आपलं काम भलं आणि आपण भलं असं असतं तुझं त्यामुळे तू काहीही लोढ घेऊ नको काय लागलं तर मला सांगत जा. पण या साहेबांनी मला एवढं प्रेम, आपुलकी, जीव लावला होता की मला माझ्या 10 वर्षाच्या काळात कधी काही अडचण आली नाही आणि कधी काही मागव सुध्दा लागलं नाही.

साहेबांच्या लोकसभा न लढण्याच्या निर्णयामुळे बरेच जण साहेबाना सोडून गेले होते. मुंबईसाठी राजेंद्र गोसावी आणि विनोद गाडे हे दोघे पी. ए खूप चांगले मिळाले होते, मतदार संघामध्ये शुभम सूर्यवंशी सुद्धा आमची पूर्ण टीम साहेबासोबत प्रामाणिक पणे काम करत होती. साहेबाना राज्यसभा मिळण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला या कालावधीमध्ये मी साहेबांकडून पगार घेत नव्हतो पण त्यांनी माझा पगार अंदमानचे खासदार यांच्याकडून चालू करून दिला होता. मी साहेबाचे आणि त्यांचे दोघांचेही काम करत होतो पण साहेबासोबतच काम करायची ही ओढ होती. गोसावीनी तर कधी साहेबांकडून पगारच घेतला नाही. साहेब गोसावीच्या कामावर खूष होते. कारण त्यांची कोणत्याच कार्यकर्त्याने कधी तक्रार केली नाही ते सर्वांशी प्रेमाने बोलत असत. ते मला म्हणायचे दत्ता मी एक गोष्ट ओबझर्व केली गोसावी आणि विनोद कधी पैसेच सांगत नाहीत, घेत नाहीत छोटे मोठे खर्च करतात. तू त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे पाठव मग मी विनोदला कधी पैसे पाठवायचो. गोसाविनी तर कधी खर्चाचे पैसेच घेतले नाहीत.

साहेबांच्या दिल्लीमधील घरी महाराष्टातील जवळपास सर्व नेत्यांचा ये- जा असायचा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणापुर्वी बरेचजन साहेबांना भेटायला येत असत, चर्चा करत. साहेब दिल्लीतून सगळ्यांना नेहमीच काही ना काही मदत करत. महाराष्ट्रामधील बऱ्याच राजकीय गोष्ठीसाठी पक्षामध्ये साहेबांशी विचारपूस केली जात असे.

हेही वाचा - कोरोनामुळे मृत व्यक्तीवर उपचार सुरु असल्याचा बनाव; मयताच्या पत्नीने न्यायालयात घेतली होती धाव, अखेर रुग्णालयावर फसवणुकीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल

आता राज्य सभा होऊन एक वर्ष झालं होतं सर्व काही व्यवस्थित चालू होतं साहेब पुष्कराज ला इथे कॉलेज मध्ये 11 वी पासून ठेवणार होते. आम्ही ऍडमिशन प्रोसेस सुरू केली होती. तितली साठी पण Acting Class व नृत्य क्लास लावला होता. आम्ही मार्चमध्ये साहेब , तितली आणि मी जयपूर ला फिरायला गेलो होतो. तितली माझ्या छोट्या मुलासोबत, आमचा कुक मनिषच्या मुलीसोबत खेळायची. साहेब मला म्हणाले दत्ता तितली फार रमली रे इथे दिल्लीमध्ये. मी म्हणालो, साहेब मग कशाला घेऊन जाता गावी, राहा ना इथेच. साहेब म्हणाले अरे बाबा माझी बायको आणि आई ओरडल ना माझ्यावर. तिला भेटायचय ना तिच्या मम्मीला आणि माझ्या पेट्रोल पंपाच उदघाटन पण आहे. गुढीपाडव्या दिवशी त्यामुळे ता. नऊ एप्रिल 2021 रोजी दिल्ली वरून जावं लागलं. म्हणले मी पुढच्या आठवड्यात येईल. पण 12 तारखेला एक मिटिंगसाठी साहेब दिल्लीत आले आणि वापस लगेच गेले.

साहेब गावी गेले तेंव्हा ता. 17 एप्रिल रोजी आमच्या दिल्ली येथील बंगल्यावरील पाण्याच्या टाक्या वादळाने खाली पडल्या होत्या आणि त्या फुटल्या होत्या. त्यामुळे घरातील पाणी पुरवठा खंडित झाला होता. ता. 19 तारखेला साहेबांचा मला कॉल आला दिल्लीच्या फ्लाईट आणि पुण्याच्या ट्रेनबद्दल चौकशी केली मी म्हटलं साहेब पाण्याच्या टॅंकची अशी घटना झाली आहे. त्यामुळे पाणी बंद आहे. आठ दिवस लागतील ठीक व्हायला त्यावर साहेब विनोद करत म्हणाले म्हणजे तुझं म्हणणं आहे की मी अजून 8-15 दिवस दिल्लीला येऊ नये आणि हसू लागले. म्हणाले घरातल पाणी बंद झालं तरी मी गेस्ट रूम मध्ये राहतो त्यावर मग मी म्हटलं तुम्ही आलात तरी चालेल माझ्या घरी रहा. साहेब नेहमी आलेल्या लोकांना सांगायचे ये दिल्ली में दत्ता का घर है मै तो इस घर में किरायदार हूँ। महीने के 30 दिन में से सिर्फ 10 दिन मै इसमें रहता हूँ दत्ता मेरे से जादा इस घर में रहता है। दत्ता ही इस घर का मालिक है।

साहेब पुण्याला गेले आणि मला 22 तारखेला फोन आला दत्ता मी पुण्याला ऍडमिट झालो आहे. कोरोनामुळे. मी अशोक गेहलोतजी, वेणूगोपालजी आणि थोरात साहेबांना सांगितलं आहे. बाकी इतर कुणाचे जर तुला कॉल आले तर सांग की मी दिल्लीतच घरी होम Qurantine आहे. त्याप्रमाणे सगळे मला फोन करून साहेबांच्या तब्यतीबद्दल फोन करून चौकशी करत होते. त्यांचा नंबर बंद केला होता त्यांनी आणि त्यांच्याकडे दुसरा नंबर होता त्यावरून मला साहेब दररोज फोन करून विचारायचे कुणाचे काही निरोप आहेत का ? मी सांगत होतो साहेब सगळे जण पूर्ण देशातून लोक आपल्या तब्यातीची विचारपूस करत आहेत. नंतर या बद्दलच मला दररोज फोन करत काही कामाचे विषय सांगत तर काही निरोपाबद्दल चौकशी करत. नंतर 28 एप्रिल ला सकाळी 4.20 मिनिटांनी त्यांचा व्हाट्स अप ला मेसेज आला Datta thorat sahebana thod laksha dyayala sanga hospital-Ekhada phone jari Zala tari kalaji ghetat.Vamshi la H K patil yana phone karun bolayala sanga -Thorat na हा मेसेज साहेबांनी मला जो पाठवला तसाच मी या ठिकाणी देत आहे. परत अजून दुसरा मेसेज तो हा होता Rahul ji Darroz sms kartat pan Baki at least hospital phone kela tari kalaji ghetil या मध्ये का कुणास ठाऊक साहेबांना असं वाटतं होत की हॉस्पिटल ने अजून काळजी घ्यावी. या वर मी नेहमी विचार करतो. त्या नंतर हा तिसरा मेसेज Sanjay raut yana pan nirop de. त्या नंतर हा चौथा मेसेज Vahini cha number pathava and vahinila sanga k cha phone yeil ( यात के म्हणजे कनिष्का सिंह जे राहुल जी चे काम पाहतात त्यांचा मला मेसेज आला होता त्यांच्या तब्यातीची चौकशी करत होते म्हणून माझ्या मेसेज ला साहेबानी सकाळी 9.37 ला तो रिपलाय दिला होता) आणि हा साहेबांचा 28 एप्रिल चा शेवटचा मेसेज Anil nainwani and Vila’s gore la vahini la phone karun Kahi asel tar paha asa nirop de. या मेसेज मधून साहेबाचे हिंगोली येथील कार्यकर्ते अनिल नेनवणी आणि विलास गोरे यांना वहिनींना कॉल करून लक्ष द्यायला सांगितले होते. मी थोरात साहेबांना, वामशी रेड्डी ना संजय राऊत साहेबांना व अनिल नेनवणी तसेच विलास गोरे ना कॉल करून साहेबांचा निरोप दिला आणि साहेबाना सकाळी 10.30 ला रिप्लाय केला पण ते चेक करू शकले नाही त्यांची तब्यत खालावली आणि ते व्हेंटिलेटरवर वर गेल्याचे कळले.

नंतर साहेबांच्या तब्यतीमध्ये कधी सुधारणा होतेय कधी बिघडतेय अशा बातम्या कळत होत्या 5-6 मे ला साहेबांची तब्यत सुधारली आहे आणि वहिनी , साई जाऊन साहेबांना बोलतात भेटतात असे समजत होते. त्याच रात्री मला साई च्या फोन वरून कॉल आला आणि साहेबानी सांगितलं विडिओ कॉल करतो, मला विडिओ कॉल आला मी साहेबांना बघितला माझ्या पांडुरंगाचे दर्शन झाल्या सारखा आनंद मला झाला. मला साहेबानी पाहून इशारा केला आणि म्हणाले सगळं ठीक आहे ना तुझं, माझ्या डोळ्यात पाणी दाटून आलं. मी म्हटलं साहेब सगळं ठीक आहे आपण लवकर बरे व्हा. नंतर त्यांनी नोटबुक वर लिहला Staff Salary आणि साई म्हटला दादा विचारत आहे Staff च्या पगारी दिल्या का? मी म्हटलं साहेब आपण बरे व्हा त्याची काळजी नका करू तुम्ही बरे झालात की द्या म्हटलेत सगळे. मला तर या गोष्टी बद्दल खूप कमाल वाटली की हा माझा साहेब ऍडमिट आहे आणि तरी पण यांना Staff च्या पगारीची, माझी काळजी वाटते. एवढा चांगुलपणा कसा होता यांच्यामध्ये विचार करण्याची गोष्ट होती. आणि परत दोन तीन दिवस साहेबांच्या तब्यतीमध्ये चढ- उतार होत गेला आणि त्यांची तब्यत खालावत गेली मध्येच सुधारत आहे, आता त्यांना ताप आला आहे 48 तासात औषधाने फरक पडेल असं कळत होतं आणि नेहमी काळजी वाटत होती. कधी त्यांना मुबई ला किंवा चेन्नई ला शिफ्ट करायचं, लीलावती मधून डॉक्टर येऊन चेक करायचे अशा बातम्या समजत होत्या.

शनिवारी सकाळी साहेबांची तब्यत क्रिटिकल आहे असं कळलं सकाळपासून सगळ्या देवाला नवस ,पूजा , महामृत्यूनजय मंत्र जाप अशा सर्व गोष्टी सगळीकडे चालू करून देवाला आमचा देव वाचवायला सांगत होतो . जे जे करता येईल ते ते करायला गोसावीकडे निरोप देऊन करून घेत होतो कधी मारुती ला दिवा लावायला तर कधी काही तरी करायला सांगत होतो. काही तरी चमत्कार व्हावा आणि माझा साहेब बरा व्हावा एवढीच अपेक्षा त्या परमेश्वरा कडे होती. संध्याकाळी थोडी तब्यत स्थिर झाल्याचं कळलं आणि थोडा धिर मिळाला पण लगेच रात्री अजून जास्त क्रिटिकल झाल्याचं कळलं काही न विचार करता मी दुसऱ्या दिवशीच रविवारचं सकाळी 8.10 चे दिल्ली- पुणे विमान तिकिट काढले आणि ठरवलं साहेबाना लगेच भेटायचं आणि सांगायचं साहेब मी दत्ता, आलो आपल्याला भेटायला लवकर बरे व्हा, आणि दिल्लीला चला आपली खूप कामे आपण नसल्यामुळे पेंडिंग पडली आहेत. माझा आवाज ऐकून त्यांच्या तब्यातीमध्ये फरक पडेल अस मला वाटत होतं. सकाळी विमानात बसलो 10.15 ला विमान पुणे येथे लॅंड झाल्यावर फोन ऑन केला की जवळपास 100 मिस कॉल येऊन गेले होते. लगेच गोसावी यांना कॉल केला तर कळलं की साहेब गेले आणि ते रडू लागले. क्षणात डोळ्यासमोर काळोख दाटला आणि दुः खाचा डोंगर कोसळला. अश्रू अनावर झाले. हॉस्पिटलमध्ये पोचलो साहेबांना घेऊन कळमनुरीच्या दिशेनं आमचा शेवटचा दौरा सुरू झाला. असंख्य लोकांचे फोन येत होते त्यांचं रडणं माझा रडणं थांबत नव्हत आमच्यावर आभाळ कोसळल होत.

सोमवारी सकाळी साहेबांचं पार्थिव अंत्य दर्शनाला ठेवलं सगळी भयानक शांतता आणि फक्त रडण्याच्या आवाजा शिवाय काही ऐकू येत नव्हत. वहिनी , ताई, पुष्कराज, तितली यांच्याकडे बघून या क्षणांची बघायची वेळ का देवाने आमच्यावर आणली का देव एवढा निष्ठुर झाला आहे असं वाटत होतं. वहिनी मला बोलावून म्हणत होत्या दत्ता तू आलाच ना साहेबाना घ्यायला दिल्लीवरून तू जा ना यांना घेऊन उठव ना यांना कधी पासून झोपले आहेत. तितली म्हणत होती मला निधीकडे यायचंय खेळायला चला ना पप्पा उठा ना. हे सर्व ऐकून मन स्तब्ध होत होते आणि आश्रूना आवरून त्यांना धिर देण्याचा प्रयत्न करत होतो. वहिनी रडत होत्या तितली 11 वर्षाची साहेबांची छोटी मुलगी त्यांना धीर देत होती. मध्येच पुष्कराज वहिनीचा मास्कवर सावरत मम्मी नको रडू असं बोलत होता. ताई तर रडून रडून आणि आयुष्यात दुःख झेलून, पचवून ती माऊली हे सर्व बघत होती. सर्वाना धीर देत होती. या माऊलीच्या नशिबात का दुःख एवढे परमेश्वराने लिहून ठेवलेत हेच कळत नव्हतं. त्यांच्या तरुणपणी त्यांचा आधार त्यांचा पती जावा आणि या वृद्धपकाळात स्वतः चा मुलगा परमेश्वराने घेऊन जावा. त्या निरागस मुलाची काय चूक किवा त्या वहिनीच्या नशिबी का हे असलं पाहयला मिळाव. हे असं का होतंय हे विचाराच्या पलीकडचं सगळं होतं.

दुपारी एक वाजता साहेबांचं अंत्यसंस्कार उरकून मी औरंगाबादकडे निघालो. दुःखाचा डोंगर आणि विचाराची गर्दी मनात साचत होती. काय होत माझ्या साहेबांचं आणि काय झालं कमी वेळात मोठ्या उंचीवर जाणारा माझा साहेब, कमी वेळातच असा कसा मला सोडून गेला. त्यांच्या 10 वर्षाच्या सहवासात त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त पुण्यचं होत हे मी अनुभवलं होत. त्यांनी नेहमी लोकांची चांगली कामेच केली. कधीही कुणाचा वाईट केलं नाही. लोकांचे जीव त्यांनी वाचवले, लोकांना किडन्या बसवून दिल्या, लोकांचे ह्रदय बसवले अशी कितीतरी कामे माझ्या साहेबांनी निस्वार्थी पणाने केली. नेहमी म्हटलं जातं माणूस आपल्या वाईट कर्माने मरतो मग माझा साहेब का चांगल्या कर्म करून सुद्धा मेला. या माणसाने नेहमी आयुष्यात लोकांच चांगलं केलं साहेब नेहमी म्हणायचे आपण आपली रेषा मोठी करायची दुसऱ्याची रेषा आपण लहान करायच्या नादी नाही लागायचं. असला चांगल्या विचाराचा माझा साहेब का असा परमेश्वराने घेऊन गेला. माझ्या बाबतीत, मला ज्यांनी त्यांच्या कडे पाठवला त्यां लटंगे साहेबांना म्हणाले होते विजयराव तुम्ही जो दत्ता मला दिलाय ना तो आयुष्यभर सांभाळावा असा प्रामाणिक आहे. पण त्या माणसाला मी माझ्या आयुष्यभर सांभाळू शकलो नाही याची खंत आयुष्यभर मला राहील.

सोमवारी रात्री दिल्लीत आलो. आल्यापासून सांत्वन करण्यासाठीचे खूप फोन आले. सगळ्या देशातून मला साहेब गेले म्हणून सांत्वन करण्यासाठी कॉल्स चालू आहेत. मी साहेबांसोबत नेहमी दिल्लीत असल्यामुळे सर्व च जेवढे साहेबाना ओळखत होते सगळे मला संपर्क करत आहेत आणि धीर देत आहेत. साहेब मला सोडून जाऊन न संपणार दुःख पाठीमागे माझ्यासाठी सोडून गेलेत. जे झालं ते अतिशय वाईट झालं परत आयुष्याच्या वाटेवर चालायला शिकायचं आहे सर्व नव्याने सुरू करायचा आहे. सर्व प्रश्न समोर येऊन उभे रहात आहेत. काही महिन्यांनी साहेबांचे दिल्लीमधील सरकारी घर खाली कराव लागेल. नौकरीचासुद्धा प्रश्न आहे. जे दहा वर्षे साहेबांसोबत राहून जी उंची गाठली होती. ती साहेबांच्या जाण्याने खुजी होऊन बसली आहे. पूढे काय होईल, कसं होईल काही काही माहीत नाही. साहेबांचे आशीर्वाद आहेत सोबत आणि साहेब गेले म्हणून माझ्यासाठी उभी राहिलेली माणसे कोण आणि किती कामी येतील हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. कुणाबद्दल काही सांगायला आणि कुणाबद्दल बोलायला माझा साहेब आता कुठेच सापडणार नाही. साहेब जर ऐकत असतील तर त्यांना माझं सांगणं आहे की साहेब आपण असतानाही हा दत्ता आपल्याशी प्रामाणिक होता आणि आपण नसतानाही आपल्या कुटुंबाशी नेहमी प्रामाणिक राहील.

दत्ता सुतार, दिल्ली पीए टू राजीव सातव यांच्या फेसबुकवरुन साभार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT