औरंगाबाद: औरंगाबाद, ता. २२ ः ‘तबलिगी जमात’साठी आलेल्या भारतीयांसह ३५ परदेशी नागरिकांविरोधात कोरोना पसरविल्याचा ठपका ठेवत दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
हेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध
माध्यमांनी याविषयी नको तो प्रचार-प्रसार केला, असे निरीक्षण नोंदवून माध्यमांवर नाराजी व्यक्त केली; तसेच सरकारनेही आपत्तीच्या काळात स्वतःची जबाबदारी विसरून ठराविक लोकांवर कोरोनाचे खापर फोडले, याकडेही खंडपीठाने लक्ष वेधले. सुनावणीअंती संबंधित गुन्हे रद्द करण्याचे आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांनी दिले.
प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या नागरिकांनी ॲड. मजहर जहागीरदार यांच्यातर्फे औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल घेतली होती. तबलिगी जमातसाठी आलेले ३० जण परदेशी, तर ५ जण भारतातील विविध राज्यांतील रहिवासी होते. तबलिगींमुळे भारतात कोरोना पसरला, अशा आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या. दरम्यानच्या काळात संबंधित तबलिगी नगर जिल्ह्यात होते.
त्यांनी व्हिसाचा दुरुपयोग केला, धार्मिक स्थळांना भेटी देत धर्माचा प्रचार-प्रसार केल्याचा आरोप करीत व्हिसाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपाखाली; तसेच तबलिगींनी दिल्लीतील मरकजला भेटी दिल्या, लॉकडाउनचे नियम पाळले नाहीत, भारतात प्रवेश करून कोरोना पसरवला, अशा आरोपांखाली आपत्ती व्यवस्थापन कायदा, परदेशी नागरिक कायद्यासह विविध कायद्यांनुसार नगर जिल्ह्यात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती.
सुनावणीदरम्यान ॲड. जहागीरदार यांनी युक्तिवाद केला, की संबंधितांकडे व्हिसा होता, ते कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी व्हिसाचा दुरुपयोग केला नाही. संबंधित तबलिगी फेबुवारीअखेर आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारतात आले.
विमानतळावर स्क्रीनिंगही करण्यात आली होती. तेव्हा त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे तबलिगी कोरोना घेऊन आले आणि इथे पसरवला, असा आरोप करून गुन्हे दाखल करणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
लॉकडाउनमध्ये कार्यक्रम नाही
मरकजमध्ये वर्षभर कार्यक्रम सुरू असतात. लॉकडाउननंतर त्या ठिकाणी कार्यक्रम झाला नाही. तबलिगींचे सदस्य लॉकडाउनच्या अगोदरच नगरमध्ये आले होते, असे म्हणणेही मांडण्यात आले. सुनावणीअंती खंडपीठाने परदेशी नागरिकांना आपण अतिथी देवो भवः’ म्हणतो, तर दुसरीकडे गुन्हेही दाखल करतो, याकडे लक्ष वेधत संबंधितांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले.
त्यामुळे या सर्वांचा मायदेशी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. मजहर जहागीरदार यांनी काम पाहिले. शासनातर्फे सरकारी वकील ॲड. महेंद्र नेरलीकर यांनी बाजू मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.