राघोजी भांगरे, कोंड्या नवले यांचे बंड ही अकोले तालुक्याची ओळख. नंतरच्या काळात अत्याचारी मामलेदाराविरोधात संघटित उठाव ही देखील अकोल्याची मूळ स्वभावाची चुणूक होती. हा तालुका म्हणजे समाजवादी आणि लाल बावट्याचा अर्थात कम्युनिस्टांचा गड होता. बंडखोरी नसनसात भिणलेला अकोलेकर गेली चार दशके मात्र थंड झाला होता. आता या अकोले तालुक्याने पुन्हा एकदा उठाव केला आणि विधानसभेची निवडणूक हाती घेतली. चाळीस वर्षे एकाच कुटुंबाकडे असलेली सत्ता एका झटक्यात काढून घेतली. त्याबद्दल अकोल्याच्या जनतेला आणि तेथील मातीला सलाम. गोपाळा भांगरे, नारायण नवाळी, नंतर यशवंतराव भांगरे यांच्याकडे तालुक्याची आमदारकी होती. त्यानंतर राजकारणाने कुस बदलली आणि मधुकर पिचड यांच्याकडे आमदारकी आली. त्यानंतर 39 वर्षे अकोल्याने आमदार होण्याचा मान त्यांनाच दिला. आज त्यात बदल झाला आहे. या बदलाचे कारण काय, याचे विश्लेषण नक्कीच करावे लागेल.
महाराष्ट्रात ताकदीने न लढलेला काँग्रेस
शरद पवार : गडी एकटा लढला
एखाद्या आमदाराच्या वाट्याला क्वचित एवढी कारकीर्द आली असेल. ज्यांच्या वाट्याला आली, त्यांनी त्या भागाचे सोने केले आहे. अकोल्याच्या वाट्याला मात्र अजूनही सर्वांगीण विकास आलेला नाही. अकोले तालुक्याचे हेच भागधेय होते का? तर अजिबात नाही. प्रचंड मोठा भौगोलिक विस्तार, निसर्गाने भरभरून दिलेले सौंदर्य आणि अगदीच राजकीय बोलायचे, तर किमान पंचवीस वर्षे मंत्रिपद. हे सगळे मिळूनही अकोल्याची ओळख ही मागास तालुका म्हणूनच राहिली आहे. त्याचे कारण काय? एका कुटुंबाकडे अनेक वर्षे एकवटलेली सत्ता हे एक कारण आहेच. आमदार वा मंत्र्यांच्या लवाजम्यातील कारभारी माणसेही त्याला तेवढीच कारणीभूत आहे. सत्तापदे, स्वार्थ आणि पैसा याशिवाय या कारभाऱ्यांनी काहीच पाहिले नाही. मंत्र्याला विकासाचे भान नसेल, तर त्याला भानावर आणण्याचे कामही या लोकांनी केले नाही. साखर कारखाना, दूधसंघ, सोसायट्या तेथील सत्तापदे आणि पैसा याचाच विचार ही मंडळी करीत राहिली. यामुळे होयबा म्हणणाऱ्यांची फौज तालुक्यातील सत्तापुरुषाभोवती निर्माण झाली. यातील बहुतेकांचा राजकीय वकूबही नव्हता. ज्यांच्याकडे तो होता, त्यांचे पाय खेचण्याचे काम या फौजेने केले.
गेली चाळीस वर्षे अकोले तालुका मागे राहणे, विकासापासून वंचित राहण्याला ही वृत्ती कारणीभूत आहे. वास्तवापासून जनतेला दूर ठेवण्याचे पाप या लोकांनी केले आहे. एकाच माणसाभोवती सत्ता कायम राहावी, यासाठी ही फौज प्रयत्न करीत राहिली आणि विकास दूर दूर जात राहिला. साखर कारखाना सोडला, तर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा, तरुणांना रोजगार देणारा एकही उद्योग निर्माण झाला नाही. मुबलक पाणी आणि निसर्ग सौंदर्य असूनही पर्यटनाची ठिकाणे विकसित केली नाहीत. शेजारचा संगमनेर तालुका आणि त्यापुढे प्रवरानगरचा विचार केला, तर या तालुक्यांमध्येही एकाच कुटुंबाभोवती सत्ता केंदित झालेली आहे. परंतु, तेथे शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले गेले आहे, त्यातून रोजगारही निर्माण झाले आहेत. अकोल्याच्या वाट्याला यातील काय आले? पंचवीस वर्षे मंत्रिपद, आदिवासी विकास खात्याचे विशेष बजेट असतानाही अकोल्यात ना मेडिकल कॉलेज, ना इंजिनीयरिंग कॉलेज उभे राहिले. या तालुक्याची शिक्षण व्यवस्था केवळ एका महाविद्यालयापुरती मर्यादित राहिली. त्याचा किरकोळ विस्तारही अलीकडच्या काळात झाला. सांस्कृतिकदृष्ट्या तर, हा तालुका कित्येक दशके मागास आहे. नाटकांच्या चळवळी या मातीत रुजविण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण, या चळवळींना श्वास देणारे एक सुसज्ज सभागृह, रंगमंचही उभा राहिलेला नाही. सायंकाळी मनशांती घेता येईल, अशी एक बागही कुणी फुलविली नाही. रोजगार, पायाभूत सुविधांच्या अंगांनी शहराचा विकास होतो. तसा सांस्कृतिक अंगानेही तो झाला, तर समाज अधिक विचारशील आणि समृद्ध होऊ शकतो. पण हा विचारच कुणाला मांडू दिला गेलेला नाही. हा तालुका केवळ विकासापासूनच वंचित नाही, तर सर्वांगीण उन्नतीपासूनही लांब राहिलेला आहे. सुदैवाने, लोक या सर्व बाबींचा विचार करून लागले म्हणून की काय आज तालुक्यात परिवर्तन झाले; सत्ताबद्दल झाला. हा बदल म्हणजे लोकांनी या सत्तापदांना चिकटलेल्या लोकांना दिलेला जोरदार लत्ताप्रहार आहे. खूप वर्षापूर्वीच ही कृती तालुक्याने करायला हवी होता. पण, असो. उशिरा का होईना अकोलेकरांनी आपला आणि आपल्या मातीचा मूळ स्वभावधर्म दाखवून दिला आहे. आता नव्या आमदाराच्या माध्यमातून विकासाची नवी पहाट हा तालुका पाहू शकेल, ही अपेक्षा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.