पुणे : कोरोनासुळे राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खासगी व सहकारी बॅंकांना पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी 'टार्गेट' केल्याचे चित्र आहे. सायबर सुरक्षिततेची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी थेट बॅंकांच्या स्वीच सर्व्हरवर नियंत्रण मिळवून कोट्यावधी रुपये लंपास केले आहेत. विशेषतः बॅंकांच्या इमीजेट पेमेंट सिस्टीमच्या (आएमपीएस) माध्यमातून सायबर गुन्हेगार पैसे लाटण्याचे प्रकार करत असल्याची सद्यस्थिती आहे.
दररोज कोट्यावधी रुपयांचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्रामीण भागातील खासगी व सहकारी बॅंकांकडून सायबर सिक्युरीटी सिस्टिमबाबत कायमच उदासीनता असल्याची बाब नवीन नाही. सायबर गुन्हेगारांनी नेमकी हिच बाब लक्षात घेऊन सायबर सिक्युरीटी सिस्टीम कमकुवत असणाऱ्या बॅंकांना लक्ष्य करण्यावर भर दिल्याचे वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांवरुन स्पष्ट होत आहे. धुळे,रत्नागिरी, गडचिरोली अशा वेगवेगळ्या भागातील खासगी,सहकारी बॅंकांवर सायबर गुन्हेगारांची नजर फिरली आहे. त्याचा कोट्यावधी रुपयांचा फटका काही बॅंकांना बसला आहे.
तर काही बॅंकांनी त्यांच्या एनईएफटी सेवा बंद ठेवल्यामुळे त्या सायबर गुन्हेगारांच्या कचाट्यातुन सुटल्याची सद्यस्थिती आहे.परंतु अजुनही राज्यातील खासगी व सहकारी बॅंका या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सायबर सिक्युरीटी सिस्टीम बसविण्याबाबत दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बॅंका सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना बळी पडत असल्याची सद्यस्थिती आहे.
असे करतात सायबर गुन्हेगार बॅंकांना 'टार्गेट'
बॅंकांच्या आएमपीएस, आरटीजीएस, नेटबॅंकींग अशा आर्थिक व्यवहार होणाऱ्या स्वीच सर्व्हवरचे लॉग ईन, आयडी प्राप्त करीत त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम सायबर गुन्हेगार करतात. बॅंकेला ग्राहक, तर ग्राहकांना बॅंक संबंधीत व्यवहार करीत असल्याचे दिसते, प्रत्यक्षात सायबर गुन्हेगार हे व्यवहार करीत असतो. त्यानंतर सायबर गुन्हेगारांकडून बॅंकांमधील वापरात नसलेल्या खात्यांचा गैरवापर करुन पैसे अन्य खात्यात वळते केले जातात. त्यापैकी पोलिसांना काही प्रमाणात पैसे वाचविणे शक्य झाले, मात्र आरोपींपर्यंत पोचण्यात अद्याप यश मिळाले नसल्याची सद्यस्थिती आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असलेल्या कालाधीतच हॅकर सक्रिय का?
राज्याच्या वेगवेगळ्या भागातील पोलिस यंत्रणा कोरोनाच्या बंदोबस्तासारख्या कामामध्ये गुंतलेली होती. बॅंकांचीही कामे नेहमीच्या तुलनेत संथगतीने सुरू होती. या सगळ्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी बॅंकांच्या सायबर सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवून ती भेदण्याचा प्रयत्न करतात. सायबर सिक्युरीटी सिस्टीम कमकुवत असणाऱ्या बॅंकांना लक्ष्य करुन त्यांच्या स्वीचवर नियंत्रण मिळवित गुन्हेगार पैसे लुटण्याचा प्रयत्न करतात.
"लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांचे ग्रामीण भागातील खासगी व सहकारी बॅंकांकडे लक्ष गेल्याचे रत्नागिरी, गडचिरोली, कोल्हापूर येथील घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. बॅंकांना हॅकर्सचा फटका बसण्यास वेगवेगळी कारणे आहेत. त्यास बॅंकांप्रमाणेच अन्य यंत्रणाही जबाबदार आहे. जागतिक आर्थिक मंदी व त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे बेरोजगारीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा घटना जास्त प्रमाणात घडतील, त्या रोखण्यासाठी खासगी, सहकारी बॅंकांनीही आपली सायबर सिक्युरीटी सिस्टीम अधिक सक्षम केली पाहीजे.''
- ऍड.जयश्री नांगरे, सायबर तज्ज्ञ.
"आरबीआयने सगळ्याच बॅंकांना सायबर सिक्युरीटीचे नियम पाळण्यास सांगितले आहे. काही बॅंका त्याचे पालन करत आहेत. परंतु काही बॅंकांना पैशांच्या कमतरतेमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे अशा बॅंकांना सायबर हल्ला होत असल्याची धोक्याची सुचना देण्याचे काम आम्ही करीत आहोत. त्याचा संबंधीत बॅंकांना फायदा होईल.''
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंक.
सायबर गुन्हेगाराकडुन आर्थिक फटका बसलेल्या घटना
1) धुळे येथील एका खासगी बॅंकेची यंत्रणा हॅक करुन हॅकरने तब्बल दोन कोटी सहा लाख 50 हजर रुपये राज्याबाहेरील 27 खात्यातुन काढले होते. पोलिसांनी काही बॅंक खाती गोठवून 30 ते 40 लाख रुपये गोठविले होते.
2) दापोलीतील एका सहकारी बॅंकेच्या संगणकीय सिस्टीमध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश करुन 48 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न झाला होता
3) गडचिरोली येथील एका सहकारी बॅंकेच्या खात्यातील एक कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी काढून घेतले होते
4) कऱ्हाड येथील एका सहकारी बॅंकेवर सायबर हल्ला झाला होता.
5) झारखंडमधील धनाबाद येथील एका को-ऑपरेटीव्ह बॅंकेतील दिड कोटी रुपये 29 व 30 मे रोजी काढण्यात आले होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.