ज्यांच्या स्मिताने चैतन्य फुलते, शब्दांनी मनं प्रफुल्लीत होतात, भविष्याचा उजळण्याचा कळत-नकळत जे प्रयास करतात, प्रेम नि विवेक या दोन्ही बाबी जे खुलवितात त्यांना पाहताच माझे हात जोडले जातात, येथे कवी म्हणतो.
सहज निर्व्याज्य हास्य पिकविणाऱ्या, लोकांना कार्यप्रवण करणाऱ्या शब्दांचा उपयोग करणाऱ्या साऱ्यांचा उल्लेख कवी करतो, हे तुमच्या-आमच्यातच असतात. एखाद्या प्रसंगी चुकून दोन वाहने समोरासमोर आली, तर हमरीतुमरीवर न जाता स्वतःची चूक ओळखून हसत ‘सॉरी’ म्हणणारा अन् त्याला तशीच हसत दाद देणारा, हो जमेल तुला म्हणून प्रोत्साहन देणारा, अशा एक ना अनेक प्रकारांनी मानवी जीवन आनंदी करणारा कवीला येथे अभिप्रेत आहे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet bb borkar nashik news)
कविवर्य बाळकृष्ण भगवंत अर्थात, बा. भ. बोरकरांच्या (१९१० ते १९८४) वरील काव्यपंक्ती माहीत नसलेला मराठी रसिक विरळाच म्हणावा लागेल. बोरकरांचा जन्म गोमांतकातील कुचकडे येथे झाला.
प्राथमिक शिक्षण धारवाडला झाले. महाराष्ट्रापासून तसे दूर असूनही मराठीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मराठी-कोंकणी, मराठी-कानडी असा वादही भरात नव्हता नि धारवाड मुंबई प्रांतातच येत होते. बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह ‘प्रतिभा’ वयाच्या विसाव्या वर्षी मडगावच्या साहित्य संमेलनात प्रसिद्ध झाला.
यातील कवितांवर केशवसूत, गोविंदाग्रज नि बालकवी या तीन कवींची छाप स्पष्टपणे दिसून येते. भृंगास, विरहोत्सुक या कवितांचा आशय केशवसुतांची आठवम देऊन जातो. पहिले चुंबन, विहगास या सरळसरळ गोविंदाग्रजांचा वारसा घेऊन अवतरलेल्या दिसतात, तर
स्व र्भूचा संगम झाला दिव्यत्व येई उदयाला
अस्तित्व विसरवी जीवा गोढगूज भ्रमवि मनाला
सारख्या शब्दकळांनी नटलेल्या काव्यपंक्ती बालकवींचा वारसा सांगून जातात. या साऱ्या प्रभावाविषयी सांगताना बा. भ. बोरकर लिहितात, ‘‘पूर्वसूरींच्या सुरांबरोबरच माझे स्वतःचे सूरदेखील कुठंकुठं क्षीणपणानं का होईना डोकावताना दिसतात.
कवीच्या या उक्तीत पूर्वसुरींच्या ऋणासोबत स्वप्रतिभेची नम्र जाणीवही आहे आणि ती यथार्थही आहे. आपल्या पूर्वसुरींविषयी कृतज्ञता व्यक्तविताना कवी ज्या पंक्ती निर्मितो, त्या याची साक्ष द्यायला पुरेशा आहेत.
अंगीच्या रक्तबिंदूंचे बनविती जे सदा पाणी
तयांचे क्लेश वाराया मत्करी ठेव गा पाणी
तुझ्या घरच्या इमानाला मला दिनरात जागू दे
इमानी पुण्य-जीवांना जिवाचे अर्घ्य अर्पू दे
त्यानंतर कवी भा. रा. तांब्यांच्या काव्यरसात न्हाल्यावर तांबेमय झाला. कवीचा जीवन-संगीत हा काव्यसंग्रह त्याचीच प्रचीती देतो. प्रस्तावनेत बोरकर स्वतः लिहितात, ‘‘कविवर्य तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे चालविण्याच्या निष्ठेने मी कलेच्या उपासनेला लागलो व बराचसा आत्मविश्वास आल्यावर महाराष्ट्राच्या रसिकतेला रिझवण्याच्या महत्त्वाकांक्षेने माझे जीवन-संगीत आळवायला सिद्ध झालो.’
या कवितासंग्रहातील कविता तांब्यांप्रमाणे एक वा दोन ओळींचे धृपद व त्या धृपदातील कल्पनेचा पुढील कडव्यातून विस्तार अशा आहेत. तांबे व बोरकर यांच्या व्यक्तित्त्वातील समानतेचा वेध प्रभा गणोरकर घेतात. त्यांनी दोघांचा महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीपासून दूर असलेला प्रदेश, आस्तिकता प्रधान नि सौंदर्यासक्त वृत्तीसोबतच भारतीय धर्म, संस्कृतीचा प्रभाव इ. समान धाग्यांचा चपखल निर्देश करतात तो अगदी अचूक आहे.
आज आपण याच कवितासंग्रहातील १९३३ मध्ये म्हणजे वयाच्या २३ व्या वर्षी लिहिलेली ‘तेथे कर माझे जुळती’ ही प्रसिद्ध कविता पाहणार आहोत. कवितेच्या आरंभीच कवी लिहितो-
तेथे कर माझे जुळती । दिव्यत्वाची जेथ प्रचीती ।
अत्यंत साध्या शब्दांनी बनलेल्या नि अर्थ सरळपणे वहन करणाऱ्या धृपदाच्या या पंक्ती मनाचा ठाव घेतात. त्यामुळेच त्या गेली नव्वद वर्षे मराठीत सुभाषिताचे रूप घेऊन बसल्यात. कवीने किती खरे वर्णन केले आहे, की जेथे दिव्यत्व दिसते, तेथे माझे हात जुळतात.
दिव्यत्व दैवी गुण दाखवते दैवी गुण म्हणजे आध्यात्मिक वा पारलौकीक गुण नसून माणुसकी, बंधुता, समतादी आदी जीवनमूल्यांचे दर्शन घडविणारे गुण होत. या विचारांचा विकास करताना कवी सांगतो, ‘तीक्ष्ण बाणाप्रमाणे सलणारी संसारातील दुःखे सहन करीत, पचवित, नव्हे नव्हे त्यांना हसतमुखाने स्वीकारीत जे प्रसन्नपणे संसार करतात म्हणजे आपल्या दुःखांचे प्रदर्शन न करता येणाऱ्या-जाणा-यांचे स्वागत करतात.
श्रीहरिला उरात बाळगतात. मुला-मुलींचाच नव्हे, तर येणाऱ्या प्रत्येकाला काही न काही देत संसाररूपी फुलबाग फुलवितात, त्यांना पाहताच माझे हात नकळत जोडले जातात.’
अनेक दुःखे मनात ठेवून मनमोकळेपणे जगणारी अनेक माणसे आपल्याला दिसतील. मला स्मरते, की माझ्याकडे साठी-सत्तरीतील गृहस्थ यायचे. त्यांची वयात आलेली कन्या मानसिक विकाराने त्रस्त होती. नवऱ्याने तिला सोडून दिले होते. लहाना मुलगा व्यसनाधीन होता. त्यांच्या सुनेने कंटाळून कुटुंबावरच कोर्ट केस दाखल केली होती.
मोठा मुलगा विचारत नव्हता. भरीसभर म्हणून बायकोला पक्षाघाताचा झटका आलेला होता, तरी ते अत्यंत हसतमुख असायचे. एकदा मी त्यांना विचारले, ‘एवढ्या साऱ्या कटकटी पाठीशी असताना, तुम्ही इतके हसतमुख, प्रसन्न कसे काय रहाता?’
त्यावर सुस्कारा सोडत ते उद्गारले, ‘‘विठ्ठलाला वाटत असेल, की हा म्हातारा हे सारे सांभाळू शकतो, म्हणून त्यानेच ही जिम्मेदारी माझ्यावर टाकली असावी, एवढाच विचार मी करतो’ या व अशासारख्या लोकांत कवीला दिव्यत्वाचा अनुभव येतो व त्याचे हात जोडले जातात.
पुढे कवी म्हणतो, ‘यथातथा परिस्थितीत मनोनिग्रहाने एखादी स्त्री चंद्रमौळी घराला मंदिराचे पावित्र्य आणते, पतीचे देवासमान पूजन करीत, येथे कवीला म्हणायचे आहे, की पती निकामा झालाय, तरीही ती काहीही न देणाऱ्या देवाचे ज्या पवित्र भावाने पूजन करते अगदी तशीच ती कुरकूर न करता त्याचा सन्मानच करते.
हे करताना तिच्या लहानग्या मुलांना कृष्णासमान वाढविते. तिला पाहताच माझे हात नकळत जोडले जातात. रसिका! हे वर्णन वाचताना उणीदुणी सहन करीत, टक्केटोणपे खात, काबाडकष्ट करीत संसाराचे गाडे हाकणाऱ्या कितीतरी मायभगिनी तुझ्या मनासमोर तरळून गेल्या असतील.
त्यातील काही पती निधनानंतर, काही पती विकलांग झाल्यावर, काही पती व्यसनाधीन झाल्यावर, तर काही पतीने सोडून दिल्यावर धाय मोकलून रडत न बसता मिळेल ते काम करीत मुलांना प्रामाणिकपणा, सचोटी, सत्शीलतेचे मूर्तिमंत धडे देणाऱ्याही असतील. त्यांना पाहताच कवीचेच नाही, तर रसिकांचेही हात नकळत जोडले जातात.
‘जे कपाळावरचा घाम गाळीत उन्हातान्हात काम करतात नि मळेच्या मळे फुलवितात, त्यांची गणती कोणीच करत नाही, हे मला ठाऊक असले, तरी ते शेतकरी पाहताच माझे हात जोडले जातात’, असे सांगत कवी म्हणतो, ‘‘ज्यांना लोकांचे शिव्याशापच खावे लागतात, तरी ते घाणीची पाटी वाहून नेतात.
इतरांसाठी साफसफाईची सुविधा देतात, त्या सफाई कामगारांतील दिव्यत्व मला दिसते आणि माझे हात जोडले जातात. येथे कवी जेव्हा शेतकरी, कष्टक-यांसोबतच त्याकाळी मैला डोक्यावर वाहून नेणाऱ्या लोकांतील समाजोपयोगी परोपकार पाहत त्यांना वंदन करतो, तेव्हा कवीच्या कृतज्ञवृत्तीचे दर्शन होते.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
ज्यावेळी लक्षात येते, की ही कविता सुमारे नव्वद वर्षांपूर्वीची आहे, तेव्हा तर कवीच्या मानवतावादाची मौलिकताच दिसून येते.
यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहन भूमिवर
नाहि चिरा नाही पणती । तेथे कर माझे जुळती ।।
खरोखर मानवतेचे हे मंदिर हजारो पिढ्यांच्या अथक प्रयासातून घडले. आज साध्यासाध्या वाटणाऱ्या गोष्टी मानवाने खूप प्रयासातून मिळविल्या आहेत. साधेसुधे नीतिनियम असो की व्यवहार असो, त्यामागे मानवाची तपस्या आहे. उदाहरणाचे द्यायचे झाले तर कोणते पदार्थ खावेत, अन्न कसे शिजवावे येथपासून तो निःस्पृह भावनेने अन्नदान करावे येथपावेतो.
मानवाने केलेला विकास विकासाचे अनेक टप्पेच दाखवतो. अगदी आरंभी बटाटा खायचा असतो की मारायचा असतो, हेही माहीत नव्हते. तेथपासून तो बटाटे वड्यापर्यंत नि बटाट्याच्या औषधी नि कथित आध्यात्मिक मूल्याबद्दलचा प्रवास सोपा नव्हता, तो मानवाने पिढ्यापिढ्यातून विकसित केला. तीच गोष्ट प्रत्येक नीतिनियमाची नि मानवी व्यवहाराची आहे.
हा विकास साधताना अनेकांनी आपले डोके वापरले असेल नि अनेकांनी बलिदानही दिले असेल, हे दोन्ही भाव कवीला ‘देऊनि निजशिर’मध्ये अपेक्षित असावेत. मात्र या कोणाचेच स्मारक कोणी उभारलेले नाही, म्हणूनच तो म्हणतो, ‘नाहि चिरा नाही पणती’ अशा अनामिक दिव्य विभूतींपुढे माझे हात जोडले जातात. कवितेतील ‘नाहि चिरा नाही पणती’ ही अर्धपंक्ती आता सुभाषिताचे रुरूप घेऊन उरली आहे.
‘ज्यांच्या स्मिताने चैतन्य फुलते, शब्दांनी मनं प्रफुल्लीत होतात, भविष्याचा उजळण्याचा कळत-नकळत जे प्रयास करतात, प्रेम नि विवेक या दोन्ही बाबी जे खुलवितात, त्यांना पाहताच माझे हात जोडले जातात.
येथे कवी कोणा स्मितहास्य करणाऱ्या अभिनेत्रीचे वर्णन करत नसून सहज निर्व्याज्य हास्य पिकविणाऱ्या, लोकांना कार्यप्रवण करणाऱ्या शब्दांचा उपयोग करणाऱ्या सर्वांचाच उल्लेख करतो.
हे तुमच्या आमच्यातच असतात. एखाद्याप्रसंगी चुकून दोन वाहने समोरासमोर आली, तर हमरीतुमरीवर न जाता स्वतःची चूक ओळखून हसत ‘सॉरी’ म्हणणारा अन् त्याला तशीच हसत दाद देणारा, हो जमेल तुला म्हणून प्रोत्साहन देणारा, अशा एक ना अनेक प्रकारांनी मानवी जीवन आनंदी करणारा कवीला येथे अभिप्रेत आहे. त्याला वंदन करून कवी पुढे लिहितो,
मध्यरात्रिं नभ घुमटाखाली
शांतशिरीं तम चव-या ढाळी
त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी
एकांतीं डोळे भरती । तेथे कर माझे जुळती ।।
कवीच्या आरंभापासून ते सहाव्या कडव्यापर्यंत साधारणतः झगझगीत कामं करणारी माणसे लोकांच्या नजरेत भरतात. त्यांच्या प्रभावात येऊन लोक त्यांना महापुरुष, असामान्य गणू लागतात. सामान्य जीवन जगणारे लोकही अल्पस्वल्प कामे करता करता समाजाचे चक्र चालवायला व मानवी जीवनमूल्ये जोपासायला सहाय्य करतात.
त्यांच्यातील दिव्यत्व कवीला कृतज्ञ करते, हे रसिकाला वारंवार दिसत असताना हे अंतिम कडवे मनाला चटका लावून जाते. यात कवी सांगतो ‘मध्यरात्री आकाशरूपी घुमटाखाली, जेथे अंधःकार चवऱ्या ढाळत बसला आहे.
‘बहिष्कृत होऊन बसलो होतो, एकांतात माझे डोळे भरून आले होते’ याच्या अर्थाकडे पाहता लक्षात येते, की कोणत्या तरी घटनेमुळे कवी उदास झालाय. त्यामुळे तो एकटाच मध्यरात्रीपर्यंत जागत उघड्यावर बसला आहे, तशातही कुठेतरी डोके शांत ठेवून वावरताना अंधःकार त्याच्यावर चवऱ्या ढाळतो, असे त्याला वाटते.
खरंतर चवऱ्या हवेसाठी असतात, पण येथे अंधःकारच हवा होऊन आल्याने कवीचे मन विदग्ध बनते. त्यामुळे त्याला तो एकटेपणा आपण त्यक्त, बहिष्कृत आहोत, असे वाटण्याइतपत डाचतो आहे. परिणामी आपसूक डोळे पाण्याने भरून जातात. आपल्या यःकश्चित कृत्यामागील उदात्त भावना त्याला तशाही परिस्थितीत आठवते नव्हे; नव्हे! ती असल्यानेच कुणाच्या तरी वागण्याचे शल्य अधिक बोचते नि चिंतन करता करता ध्यानी येते.
अशीच कृत्ये करणारे नि विस्मृतीत जाणारे करोडोकरोड असतात नि त्यांची याद आल्याने डोळ्यांच्या ओल्या होणाऱ्या कडा व्यापक अर्थ घेऊन अवतरतात व विदग्ध उदासता कृतज्ञतेत पालटते. सामान्यांच्या असामान्य व्यवहाराला वंदन करीत ती तृप्त होते. वयाच्या तेविसाव्या वर्षी निर्मिलेली कवीची ही कविता त्याची परिपक्व भावना समर्थपणे व्यक्त करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.