नाशिक : गोळ्या झाडल्या, तरी चालेल; पण घरी जाणार, असे ठणकावून सांगणारे स्थलांतरित कष्टकरी निवारा केंद्रात नेल्यावर पहिल्या दिवशी "कैसा होगा हमारा', या प्रश्नाने चिंतीत होते. पण रेल्वेस्थानकावर गेल्यावर सव्वा महिन्याच्या स्नेहबंधातून "बहोत अच्छा हुआ, घर जैसा लगा, कोई दिख्खत नहीं आयी', असे म्हणत भावुक झाल्याचे पाहायला मिळाल्याची आठवण नाशिकचे नायब तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितली.
सव्वा महिन्याच्या परिश्रमाचे चीज झाल्याचा भाव प्रत्येकामध्ये दिसला
रेल्वेचे इंजिन सुरू झाले आणि चाकांनी गती घेतल्यावर खिडकीतून हात बाहेर काढून घेतलेला निरोप उपस्थितांच्या काळजाला भिडणारा होता. निवारा केंद्रातील सेवा- सुविधा आणि त्यांच्यासाठी यंत्रणांनी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांशी कष्टकऱ्यांचा जिव्हाळा निर्माण झाला. "लॉकडाउन'च्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्याची घोषणा झाली, पुन्हा तिसरा टप्पा घोषित झाला आणि किती दिवस राहावे लागणार? या प्रश्नाने कष्टकऱ्यांमधील अस्वस्थता मधूनच वाढायची. अशा वातावरणात घरी जाण्याची तयारी करण्याचा निरोप दिला आणि त्याचदिवशी रेल्वेने प्रवासाची व्यवस्था झाल्याने कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारे समाधान अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी ऊर्जा देणारे ठरले. विशेष म्हणजे व्यवस्थेला गालबोट लागणार नाही, यासाठी प्रत्येक क्षणाची काळजी घेत असताना रेल्वेत बसेपर्यंत प्रत्यक्ष निवारा केंद्रासाठी काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना सगळे सुरळीत व्हावे, असे वाटत होते. घडलेदेखील तसेच. त्यामुळे सव्वा महिन्याच्या परिश्रमाचे चीज झाल्याचा भाव प्रत्येकामध्ये होता, असे श्री. कासुळे यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी नोंदवलेली निरीक्षणे
स्थलांतरित कष्टकऱ्यांच्या व्यवस्थेत अधिकाऱ्यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. रेल्वेस्थानकावर कष्टकरी पोचल्यावर कुणीही गर्दी अथवा पळापळी केली नाही. पोलिसांना ओरडण्याची वेळ आली नाही. एवढेच नव्हे, तर निवासाच्या काळात मोबाईल चार्जिंगची व्यवस्था होतेय म्हटल्यावर त्यासाठी कष्टकऱ्यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे रांग लावली नाही. काही जण आपल्या घरून रिचार्ज करून घेत होते. विशेष म्हणजे, भोपाळला पोचल्यावर आणि रविवारी लखनौला पोचल्यावर कष्टकऱ्यांनी दैनंदिन सहवासातील व्यवस्थेत असलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना खुशाल पोचल्याचा निरोप मोबाईलवरून संपर्क साधत दिला. मध्य प्रदेशाकडे रवाना झालेल्या रेल्वेतील काही कष्टकऱ्यांनी भोपाळच्या अलीकडे उतरणे पसंत केले. पण घ्यायला कुणी नसल्याने त्यांचे घरी पोचण्यासाठी हाल झाल्याची माहिती कष्टकऱ्यांनी अधिकाऱ्यांना मोबाईलवरून कळवली.
रमजानमध्ये पहिल्या दिवसारखा रोज आनंद
पवित्र रमजानमध्ये रोजे धरणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी खजूर, रोट, खिसमिस, फळे उपलब्ध करून देण्यात आली. "रमजान का पहला दिन तो होग गया, आगे कैसा होगा', असा प्रश्न काही कष्टकऱ्यांनी त्या वेळी उपस्थित केला होता. मात्र रमजानमधील प्रत्येक दिवस आनंददायी ठरेल, अशी व्यवस्था नाशिकच्या सामाजिक जीवनातून उभी राहिली. त्यामुळे "घर से अच्छा माहोल रहा', अशी प्रतिक्रिया रोजा धरलेल्या एका बांधवाने अधिकाऱ्यांकडे रेल्वेने जाताना व्यक्त केली.
इगतपुरी आणि नाशिककरांची मदत
रेल्वेच्या प्रवासामध्ये तिकिटाच्या रकमेपेक्षा कमी पैसे असलेल्यांसाठी इगतपुरी आणि नाशिक तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी, महापालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांनी मदत उभी केली. प्रत्येक तिकिटासाठीचा 105 रुपये फरक इगतपुरीकरांनी, तर नाशिक तहसीलदार कार्यालयातर्फे कमी पडलेले पैसे देण्यात आले.
हेही वाचा > ह्रदयद्रावक! फोनवर सई रोज म्हणायची, "मम्मा लवकर ये.. अन् आज तब्बल महिनाभरानंतर भेटले तेव्हा..
केंद्र सरकारवर टीकेची झोड
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील कष्टकऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेसाठी पंतप्रधान कार्यालयावर सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव एकीकडे झाला. त्याचवेळी सोशल मीडियातून प्रवासासाठी कष्टकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या रेल्वे तिकिटाच्या पैशांबद्दल केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. कष्टकऱ्यांच्या प्रवासासाठी व्यवस्था मोफत करण्यासाठी केंद्राला काय अडचण होती? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.