अशी करावी गणेशाची प्राणप्रतिष्ठा 

ganesh-sthaapana.jpg
ganesh-sthaapana.jpg

गणेश चतुर्थीच्या दिवशी 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणजे नेमके काय करायचे? घराघरांतून, चौकाचौकांतून लाखोंच्या संख्येने गणपती बसवले जातात; पण "श्रीं'च्या प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सांगणाऱ्या जाणकार गुरुजींची संख्या शेकड्यातही नसल्यामुळे शृंगेरी शारदा पीठ जगद्‌गुरू श्री शंकराचार्यांचे महाराष्ट्रातील प्रथम प्रतिनिधी, शारदा ज्ञानपीठम्‌चे कुलगुरू, 'शारदा'चे संपादक पं. वसंतराव गाडगीळ यांनी केलेले मार्गदर्शन. 

अशी करावी गणेशाची प्राणप्रतिष्ठा 
प्राणप्रतिष्ठा याचा अर्थ आपण बाजारांतून, दुकानांतून, आणलेल्या मातीच्या, शाडूच्या मूर्तीत जीव ओतणे, आपल्या पूजनासाठी ती मूर्ती सजीव बनविणे. मातीच्या गोळ्यालाच (पृथ्वीपासून) मातीपासून घडवल्यामुळे पार्थिव म्हणतात, म्हणूनच या व्रताचे नाव 'पार्थिव गणपती पूजन,' असे आहे. ज्यांना पूजा सांगण्यासाठी गुरुजी मिळू शकत नाहीत, त्यांनी शुचिर्भूत म्हणजेच स्वच्छ (शक्‍य झाले तर पितांबर, धोतर) कपडे घालून खांद्यावर शाल, उपरणे, टॉवेल यांसारखे उपवस्त्र घेऊन 'श्रीं'च्या मूर्तीसमोर (श्रींची मूर्ती चौरंगावर स्वच्छ रुमाल/कापडावर नीट ठेवावी.) पूर्व अगर पश्‍चिमेला तोंड करून पाटावर/आसनावर बसावे. सर्वप्रथम स्वतःच्या मस्तकावर गंधाचा, कुंकवाचा, शेंदूर, अष्टगंधाचा टिळा लावावा. घरच्या देवांना (शक्‍यतो दोन पाने, सुपारी, पाच किंवा एक रुपयाचे नाणे, असा विडा व नारळ ठेवून) नमस्कार करावा. घरातील वडीलधारी व्यक्तींना (सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये समाजातील ज्येष्ठ व्यक्तींना) नमस्कार करावा. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूजेला बसावे. वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पूजेसारखे महत्त्वाचे काम सुरू करू नये. या संस्कारांचा चांगला परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होतो. 

पंचामृत स्नान 
दूध, दही, गाईचे शुद्ध तूप, मध, साखर या पंचामृताचे स्नान मूर्तीला (दूर्वांनी अगदी हळुवार शिंपडून) घालावे. परत स्वच्छ पाण्याचे स्नान (दूर्वांनीच) घालावे. पंचामृत स्नानाची सांगता सहाव्या गंधोदकाने (गंधाचे सुवासिक पाणी) करावी. नवीन वस्त्र आणि जानवे घालून झाल्यानंतर फुलांनी सुवासिक अत्तर मूर्तीला लावावे. गुलाबपाणी शिंपडावे. सुवासिक चाफा, गुलाब, सोनटक्का, जाई-जुई, केवडा यांसारखी फुले उगाळलेल्या गंधात बुडवून आणि दूर्वांची जुडी अष्टगंध, शेंदूर यांत बुडवून ही फुले, दूर्वा मूर्तीला वाहाव्यात. फुले, दूर्वा यांच्या माध्यमांतूनच हळद, कुंकू इत्यादी परिमल (सुगंधी) द्रव्ये अर्पण करावी. 

स्वच्छ पळी-भांड्यातील पाण्याने आचमन करून (तीन वेळा पोटात पाणी घ्यावे व चौथ्या वेळी हातावर पाणी सोडून उष्टा हात स्वच्छ करावा.) प्राणायाम, गायत्री जपासह चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला दर्शनी कोपऱ्यात मांडलेल्या नारळाच्या / सुपारीच्या गणपतीवर अक्षता व फुले वाहावी. त्यानंतर, 
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः । 
निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।। 

अशी प्रार्थना करावी. मी आज गणेश चतुर्थी व्रतासाठी पार्थिव गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करीत आहे, असा संकल्प करावा. 
शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदाम्‌। 
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते।। 

या मंत्राने समईच्या पायावर फळे, गंध, अक्षता वाहून "शत्रुबुद्धी'चा नाश व्हावा, अशी परमात्म्याजवळ प्रार्थना करावी. घंटेला गंध, फुले, अक्षता वाहावी. गणेशोत्सवात सज्जन लोक यावेत, राक्षसी वृत्तीचे, दुष्ट, गुंड पळून दूर जावेत यासाठी घंटा जोरात वाजवीत प्रार्थना म्हणावी, 
आगमार्थं तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम्‌। 
कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हान लक्षणम्‌।। 

यानंतरचा सर्वांत महत्त्वाचा भाग प्राणप्रतिष्ठा. ज्यांना मंत्रपाठ शक्‍य नसेल, माहित नसेल त्यांनी किमान 
ॐ गं । गणपतये नमः । 
हा मंत्र म्हणत पूजेसाठी चौरंगावर स्थापन केलेल्या श्रींच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना (दूर्वांची जुडी उजव्या हातातील बोटांनी धरून आणि तुपात किंचित बुडवून) दुर्वांकुरांनी अगदी थोडे तूप लावावे. 

मूर्तीच्या हृदयावर (छातीच्या मध्यभागी) उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून या गणेशमूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत, अशी प्रार्थना करावी. निदान 15 वेळा "ॐ'काराचा जप करावा (यालाच "प्रणव' म्हणतात.) श्री मंगलमूर्तीची सर्व कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये जिवंत व्हावीत, त्यांची वाणी, मन, त्वचा, नेत्र सचेतन क्रियाशील व्हावीत, अशी प्रार्थना करावी.(देवस्य प्राणः । इह स्थितः । ) "श्रीं'च्या मूर्तीवर गंध, अक्षता, फुले पुन्हा वाहून गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा, नारळ यांवर पाणी सोडावे. असे केल्याने प्राणप्रतिष्ठेसारखा सर्वांत महत्त्वाचा विधी पूर्ण होईल. 

चौरंग/टेबल ज्या खोलीत मांडलेले असेल त्या खोलीत (किंवा पूजा मंडपात) भरपूर निखाऱ्यावर धूप, ऊद, गुग्गुळ ही सुगंधी द्रव्ये टाकून वातावरण सुवासिक, प्रसन्न करावे. उद्‌बत्ती, निरांजने ओवाळून झाल्यावर 'श्रीं'साठी खव्यांचे मोदक, पेढे, मिठाई, लाडू यांपैकी जे गोड अन्नपदार्थ तयार केलेले (किंवा आणलेले) असतील त्यांचा (भोजन तयार असेल तर संपूर्ण भोजनथाळीसह) भगवंताला नैवेद्य दाखवावा. मनोमन परमेश्‍वराला प्रार्थना करावी. गंध/अत्तर लावलेले फूल पायावर अर्पण करून चौरंगावर मांडून ठेवलेल्या दक्षिणेसह विडा, फळे, नारळ यांवर पळीने पाणी सोडून श्री गजाननाला अर्पण करावे आणि दोन तूपवातींच्या निरांजनांनी (तबक/ताम्हनात ठेवून) मंगलआरती करावी. कापूरारतीने आरतीचा शेवट व्हावा. "सुखकर्ता, दुःखहर्ता...' ही गणपतीची आणि "दुर्गे दुर्गट भारी...' ही देवीची आरती म्हणावी. समर्थ रामदासांनी रचना केलेली "सुखकर्ता, दुःखहर्ता...' आणि नरहरी विरचित "दुर्गे दुर्गट भारी...' या आरत्या गेली तीनशे वर्षे महाराष्ट्रात आणि सातासमुद्रापलीकडे जिथे मराठी भाषा बोलली जाते त्या सर्व कुटुंबातून मोठ्या तन्मयतेने म्हटली जात आहे. 
मंत्रपुष्प (यज्ञेन यज्ञमयजंत...) म्हणावे आणि फुले, अक्षता वाहून प्रदक्षिणा, साष्टांग नमस्कार (घालीन लोटांगण...) घालून प्रार्थना म्हणावी.

श्री गणेश पूजेच्या उपचारांपैकीच आज सर्वत्र दुर्लक्षित (अज्ञानामुळे उपेक्षित!) असा महत्त्वाचा भाग म्हणजे राजोपचार. जे उपचार राजे करू शकतात (त्यांना करायला आवडतात), त्या उपचारांन राजोपचार म्हणतात. आपण मात्र घरी आलेल्या देवराज गणेशाला नृत्य, गीत, वाद्य, छत्र, चामरादी राजोपचारांचे (नाचणे, गाणे, वाद्य यांसारख्या राजोपचारांसाठी), अक्षतान्‌ समर्पयामि, म्हणून तांदळाचे चार दाणे अर्पण करून हा राजोपचार बोळवतो. 

ज्यांना कोणतीही वाद्य, वादन, कला (पेटी, तबला, वीणा, मुरली, सतार इत्यादी.) अवगत असेल तर त्यांनी त्या कलेची सेवा "श्रीं'च्या मूर्तीसमोर सादर करून राजोपचार सेवेचे समाधान मिळवावे. आज सार्वजनिक गणपतीसमोर केवळ रोषणाईचा झगमगाट आणि कर्कश ध्वनिवर्धकांचा कलकलाट, गोंगाट यांमुळे फक्त प्रदूषण वाढते आणि स्वास्थ्याला धोका निर्माण होतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com