मोदींची 'मन की बात' ते चीनला सडेतोड उत्तर; वाचा दिवसभरातील महत्वाच्या ७ बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 30 August 2020

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

केंद्र सरकारने Unlock 4 ची नियमावली जाहीर केली आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर आहे. ते अद्याप कोम्यातच आहेत. विदेशात, स्वीडनमध्ये कुरान जाळण्याची घटना घडली आहे. भारताने दक्षिण चिनी समुद्रात आपली युद्धनौका तैनात केली आहे. त्यामुळे तणाव वाढला आहे.

Unlock 4 : केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर, मेट्रो सुरु तर शाळा-कॉलेज बंदच

केंद्र सरकारने Unlock 4 ची नियमावली जाहीर केली आहे. चौथ्या टप्प्यातील अनलॉकची प्रक्रियेत 7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत शाळा आणि कॉलेज बंदच राहणार आहेत. याचा निर्णय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करुन घेण्यात आला आहे. सरकारच्या आदेशानुसार ओपन थेटर 21 सप्टेंबरपासून उघडता येणार आहेत. सविस्तर बातमी- 

'अबतक' 68 भाग... 'मन की बात' कार्यक्रमातील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवरील लोकप्रिय 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधण्याची मोदींची ही 68 वी वेळ ठरली. देशातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कल्पकतेचा नवा अविष्कार करुन मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. पोशख आहार आणि आरोग्य यासंदर्भातील मोदींनी भाष्य केले. सविस्तर बातमी- 

प्रणव मुखर्जी अद्याप कोमातच; लष्करी रुग्णालयाने प्रकृतीबाबत दिली माहिती

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी गेल्या तीन आठवड्यापासून रुग्णालयात आहेत. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लष्करी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रणव मुखर्जी सध्या जीवरक्षक प्रणालीवर आहेत. ते कोमात असून फुफ्फुसाच्या संसर्गावर उपचार केले जात आहेत. सध्या त्यांची प्रकृती हिमोडायनेमिकली स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर देखरेख करत आहे. सविस्तर बातमी- 

देशात कोरोनाचा कहर; राज्यात नव्या रुग्णांच्या आकड्याने गाठला उच्चांक

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला देशासह महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव ओसरतानाचे चित्र पाहायला मिळाले होते. याकाळात कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर काही प्रमाणात कमी झाला होता. पण मागील 3 दिवसांपासून कोरोनाने देशात खूप बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. सलग 3 दिवस प्रत्येक दिवशी भारतात 75 हजारांच्या वर नवे रुग्ण आढळले  आहेत. सविस्तर बातमी- 

मेंदूतील चिप करेल आता उपचारांना मदत; डुकरावर केला पहिला प्रयोग

अवकाशात पहिले खासगी अवकाशयान सोडणारे हरहुन्नरी उद्योजक एलॉन मस्क यांनी आज एका घोषणेद्वारे नवीन क्षेत्राची कवाडे जगासाठी खुली केली आहेत. दोन महिन्यांपासून एक डुकराच्या मेंदूमध्ये नाण्याच्या आकाराची संगणकीय चिप बसवून त्याचे परिणाम अभ्यासल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अशाच प्रकारचे रोपण करून भविष्यात मानवाच्या मेंदूशी संबंधित आजार बरे करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर बातमी- 

चीनला सडेतोड उत्तर; विरोध असूनही भारताने दक्षिण चिनी समुद्रात तैनात केली युद्धनौका

गलवान खोऱ्यातील १५ जूनच्या संघर्षानंतर भारताने चीनविरोधात आक्रमकता दाखवली आहे. भारताने दक्षिण चिनी समुद्रामध्ये आपली युद्धनौका तैनात केली आहे. भारताच्या या कृतीने चीनचा तिळपापड झाला आहे. चीनने दक्षिण चिनी समुद्रामध्ये भारताने युद्धनौका तैनात करण्यावर आपत्ती घेतली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. सविस्तर बातमी- 

स्वीडनमध्ये मुस्लीमविरोधी गटाने कुरानला लावली आग; दंगल उसळली

स्वीडनमध्ये उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी मालमो शहरात पवित्र कुरान जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या विरोधात ३०० लोक एकत्र आले होते, त्यानंतर दंगली भडकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगलकर्त्यांनी अनेक ठिकाणी आग लावली आणि पोलिस व मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केलं. रस्त्यावर अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले, तर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे अनेक पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत.  सविस्तर बातमी- 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unlock 4 narendra modi man ki bat pranav mukharjee corona covid swiden norway china south china sea elon musk 30 august