esakal | Vidhan Sabha 2019 : जाणून घ्या नांदेडमधील 9 मतदारसंघांची राजकीय गणितं
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 Nanded district nine constituencies analysis

शिवसेना भाजप महायुती व काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडी व वंचित बहुजन आघाडी या राजकीय शक्तींनी नांदेड जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलून टाकले आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण १३४ उमेदवार रिंगणात असून सर्वात जास्त ३८ उमेदवार नांदेड दक्षिण तर सर्वात कमी उमेदवार मुखेड व किनवट प्रत्येकी पाच इतके आहेत.

Vidhan Sabha 2019 : जाणून घ्या नांदेडमधील 9 मतदारसंघांची राजकीय गणितं

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

शिवसेना भाजप महायुती व काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडी व वंचित बहुजन आघाडी या राजकीय शक्तींनी नांदेड जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलून टाकले आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण १३४ उमेदवार रिंगणात असून सर्वात जास्त ३८ उमेदवार नांदेड दक्षिण तर सर्वात कमी उमेदवार मुखेड व किनवट प्रत्येकी पाच इतके आहेत.

असे असेल पिंपरी-चिंचवडमधील 4 मतदारसंघांचे राजकीय गणित !

गेल्या सहाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा भाव खाल्लेल्या वंचित बहुजन आघाडीत यावेळी फूट पडली. या आघाडीतून एमआयएम बाहेर
पडला. त्यामुळे लोकसभेसारखी ताकद या आघाडीत उरलेली नाही. या आघाडीतील दोन्ही पक्षांनी आपापल्या स्वतंत्र चुली निर्माण केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी सुस्कारा टाकला आहे. त्यातच सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना व भाजप व मित्रपक्षांच्या आघाडीत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे एक नवी राजकीय समीकरणे उदयास येत आहेत. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात काही ठिकाणी थेट तर काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी अशा लढती होत आहेत. त्याचा हा आढावा : 

नांदेड उत्तर (विधानसभा मतदारसंघ) 
नांदेड उत्तरमध्ये २४ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार व माजी मंत्री डी. पी. सावंत, शिवसेनेकडून बालाजी कल्याणकर, वंचित बहुजन आघाडीकडून मुकुंद चावरे, एआयएमकडून फेरोज लाला हे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना भाजप युतीकडून हा मतदारसंघ एकमेकांकडे खेचण्याचे खूप प्रयत्न सुरूवातीला झाले. मात्र युतीत हा मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यात शिवसेनेला यश आले. भाजपकडून अनेकांनी या मतदारसंघातून तयारी केली होती. मात्र मतदारसंघ भाजपला न सुटल्याने भाजपमधून नाराजी व्यक्त झाली. इथे शिवसेनेने नगरसेवक बालाजी कल्याणकर यांना अनपेक्षितपणे उमेदवारी दिली आहे. वंचितनेही अनेक चांगल्या इच्छुकांना डावलून मुकुंद चावरे यांना उमेदवारी दिली. या सर्व नवख्या उमेदवारांपुढे अनुभवी डी. पी. सावंत अशी लढत आहे. सावंत हे सलग तिसरा विजय प्राप्त करून हॅटट्रीक साधताय का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

असे असेल लातूर जिल्ह्यातील 06 मतदारसंघाचे राजकीय चित्र !

नांदेड दक्षिण (विधानसभा मतदारसंघ)
नांदेड दक्षिण मतदारसंघात हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील रिंगणात आहेत. गेल्यावेळी हेमंत पाटील हेच या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. यंदा राजश्री पाटील यांची लढत कॉँग्रेसच्या मोहन हंबर्डे यांच्याशी असेल. अपक्ष व गेल्यावेळचे भाजपचे उमेदवार दिलीप कंदकुर्ते हेही रिंगणात असून त्यांनी शिवसेनेविरूध्द बंडखोरी केली आहे. इथे वंचित आघाडीने फारूक अहमद व एमआयएमने साबेर चाऊस यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने या मतदारसंघात आधी अब्दुल सत्तार यांच्या नावाचा अनेक दिवस जप केला होता. मात्र ऐनवेळी इच्छुक मुस्लिम उमेदवारांना टाळून मोहन हंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपने बंडखोरी केली तसेच व भाजपचे खा. प्रताप पाटील यांचे पुत्र प्रवीण पाटील उघडपणे दिलीप कंदकुर्ते यांना साथ देत असल्याने शिवसेनेची झोप उडाली आहे. तसेच, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही बंडखोरी केली आहे.

अशी असतील बीड जिल्ह्यातील 06 मतदारसंघाची राजकीय गणितं !

लोहा (विधानसभा मतदारसंघ)
खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ. मात्र, त्यांना हा मतदारसंघ भाजपसाठी व स्वतःच्या मुलासाठी सोडवून घेता आला नाही. चिखलीकर हेच इथले विद्यमान आमदार होते. आता इथे शिवसेनेकडून ॲड. मुक्तेश्वर धोंडगे, राष्ट्रवादी काँग्रेकडून दिलीप धोंडगे, वंचित आघाडीकडून शिवा नरंगले तर शेतकरी कामगार पक्षाकडून शामसुंदर शिंदे हे प्रमुख उमेदवार आहेत. मात्र खरी लढाई मुक्तेश्वर धोंडगे व शिंदे यांच्यातच होईल असे मानले जाते. चिखलीकरांचे वर्चस्व व त्याची खासदारपदी झालेल्या निवडीने या मतदारसंघात त्यांचा उमेदवार कोण असेल याविषयी मोठी चर्चा रंगली होती. त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील व मेहुणे शामसुंदर शिंदे भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. यावरून शिंदे व चिखलीकर यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र ही जागाच शिवसेनेला सुटल्याने चिखलीकरांनी माघार घेतली व शिंदे यांनी शेकापची उमेदवारी मिळवली. आता शिंदे व मुक्तेश्वर धोंडगे यांच्यात काट्याची लढत होत आहे. वंचित व राष्ट्रवादीचे उमेदवारही चांगली मते घेतील.

असे असेल साताऱ्यातील 08 विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र !

मुखेड (विधानसभा मतदारसंघ)
भाजपचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड, भाऊसाहेब मंडलापूरकर, वंचितचे जीवन दरगावे व बसपचाही उमेदवार या मतदारसंघात रिंगणात आहेत. गेल्यावेळी भाजपचे (कै.) गोविंद राठोड यांनी काँग्रेसचा पराभव करून त्यांचे वर्चस्व संपुष्टात आणले होते. मात्र विजयानंतर काही दिवसांतच (कै.) राठोड यांचे निधन झाल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव डॉ. तुषार राठोड हे निवडून आले आणि जिल्ह्यात भाजपला एकमेव जागा मिळाली. गेल्या पाच वर्षांत मात्र त्यांची कामगिरी यथातथाच राहिली. पक्षांतच विरोधकही तयार झाले. लोकसभा निवडणुकीत तीस हजारांचे मताधिक्य या तालुक्याने भाजप उमेदवाराला दिले. मात्र अगदी अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी मिळविण्यात यश आले असले तरी विजयाच मार्ग सोपा नाही. काँग्रेसचे मंडलापूरकर हे या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या हटकर समाजाचे प्रतिनिधी आहेत. तसेच नेहमीचे अयशस्वी उमेदवार टाळून उमेदवाराची भाकरी फिरविल्याने एक नवा चेहरा पुढे आला आहे. त्या तुलनेत वंचित व बीएसपीचे उमेदवार नवखे आहेत. तसेच सुरूवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चांगली रंगेल, असे म्हटले जात आहे.

जाणून घ्या औरंगाबादमधील 9 मतदारसंघांची राजकीय गणितं !

देगलूर (विधानसभा मतदारसंघ)
अनुसूचित जातींसाठी मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष साबणे व काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यात पुन्हा लढत होत आहेत वंचितचे प्रा.रामचंद्र भरांडे यांनीही चांगले रंग भरले आहेत. शिवसेनेचे जागा असूनही भाजपच्या अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने उमेदवारीची स्पर्धा महायुतीच्या या घटक पक्षांतच लागली होती. मात्र उमेदवारीची स्पर्धा जिंकल्यानंतर इथे शिवसेना कामाला लागली आहे. मात्र पाच वर्षांचा कारभार फारसा चांगला नसल्याने पुन्हा एकदा अंतापूरकरांना अजमावू, असा विचार येथे बळावत आहे. उमेदवारीच्या खेचाखेचीवरून कॉँग्रेस राष्‍ट्रवादीपेक्षा महायुतीत बरेच रामायण घडल्याने वेगवेगळी समीकरणे उदयास येत आहेत. खतगावकर हा या भागातला महत्वाचा फॅक्टर. तीन वेळा खासदार व तीन वेळा आमदार अशी राजकीय कारकीर्द असलेल्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काय खेळी करतात, यावरही बरेच काही अवलंबून असते. ते ज्यांच्या मागे ताकद उभी करतात तो उमेदवार निवडून येतो, अशी वदंता इथे आहे. यंदा तेच भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे साबणेंसमोर पुन्हा निवडून येण्याचे आव्हान आहे.

पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं!

नायगाव (विधानसभा मतदारसंघ)
काँग्रेसचे विद्यमान आमदार वसंत चव्हाण हे इथे हॅटट्रीक करतील की नाही, हा इथे सर्वात महत्वाचा मुद्दा चर्चिला जात आहे. त्यांच्या विरोधात पुन्हा गेल्या वेळचे सेकंड रनर व भाजपचे राजेश पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. दोघांच्याही झटापटीत तिसरा व महत्वाचा उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या मारोतराव कवळे गुरूजी यांना पाहावे लागेल. पहिल्यांदा अपक्ष व गेल्या निवडणुकीत काँग्रेस असा विजय प्राप्त केलेल्या वसंत चव्हाण यांना या मतदारसंघाचा वारसा आहे. त्यांचे वडील (कै.) बळवंतराव चव्हाण इथून आमदार होते. याच मतदारसंघात आता माजी खा. भास्करराव खतगावकर, माजी खा.गंगाधर कुंटूरकर व माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर या तिघांच्या भुमिकांवर बरेच काही अवलंबून असते. आता हे तिघेही भाजपसोबत आहेत. त्यामुळे राजेश पवार यांची बाजू बळकट झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघात सक्रीय आहेत. मात्र, उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात व भास्कररावांच्या सूनबाई डॉ. मिनल खतगावकर यांच्यात स्पर्धा पेटली होती. त्यामुळे नाराज भास्करराव काय करतात हे महत्वाचे आहे.

भोकर (विधानसभा मतदारसंघ)
काँग्रेसचे बलाढ्य नेते अशोकराव चव्हाण यांच्या उमेदवारीने हा मतदारसंघ राज्यभरात लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या विरोधात यंदा भाजपने त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना रिंगणात उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडीने नामदेव आईलवाड यांना उमेदवारी दिली असली तरी लोकसभेसारखी क्रेझ आता वंचितकडे राहिलेली नाही. त्यामुळे चव्हाण व गोरठेकर यांच्यात थेट लढत होईल. लोकसभा निवडणुकीत दुसरे पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रतापराव चिखलीकरांकडून पराभव स्वीकारावा लागल्याने आता अशोकराव चांगलेच सावध झाले आहेत. सातत्याने मतदारसंघात राहून ते उर्ध्व पैनगंगा, इतर स्थानिक प्रश्न व सत्ताधाऱ्यांच्या नांदेडविरोधी भुमिकेवर आपल्या प्रचाराचा रोख ठेवत आहेत. तर गोरठेकर यांच्यामागे खासदार वगळता भाजप व शिवसेनेची फारशी साथ दिसत नाही. अनेक इच्छुकांना डावलून त्यांनी उमेदवारी मिळविल्याने भाजपचे किन्हाळकर, राम चौधरी आदी जुनी मंडळी नाराज आहे.

हदगाव (विधानसभा मतदारसंघ)
शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर, काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात तिरंगी सामना अटीतटीचा होत आहे. इथे वंचितचे डॉ. सुदर्शन भारती रिंगणात आहेत. दोन्ही आघाड्यांतील घटक पक्षांत उमेदवारींवरून जोरदार चुरस होती. गेल्या पाच वर्षांतील विद्यमान आमदारांचा कारभार फारसा समाधानकारक नसल्याने प्रत्येक इच्छुक कामाला लागला होता. शिवसेनेकडून आष्टीकर व बाबुराव कदम यांच्यात तीव्र स्पर्धा होती. तर इकडे काँग्रेसमध्येही माधवराव व गंगाधर चाभरेकर यांच्यात स्पर्धा होती. चाभरेकरांच्या मागे राजीव सातव व जवळगावकरांच्या मागे अशोक चव्हाण होते. शेवटच्या क्षणी जवळगावकरांना संधी देण्यात आली. त्यामुळे चाभरेकर यांनी पुढे शिवबंधन बांधत आष्टीकरांना साथ देण्याचे ठरवले. तिकडे उमेदवारीसाठी थेट मातोश्री गाठून आपला आवाज बुलंद करणारे बाबुराव कदम यांना आर्थिक कारणावरून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी आष्टीकरांविरोधात बंड पुकारले व अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना सर्वसामान्य मतदारांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. जवळगावकर व कदम दोघांनीही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

किनवट (विधानसभा मतदारसंघ)
जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकमेव आमदार असलेला हा मतदारसंघ. इथे विद्यमान आ. प्रदीप नाईक हे सलग चौथ्यांदा निवडणुकीस उभे राहिले आहेत. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा त्यांचे पारंपरिक विरोधक माजी आ. भीमराव केराम हे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामकडून उभे आहेत. इथे वंचितने प्रा. हमराज उईके यांना संधी दिली आहे. मात्र खरी लढत नाईक व केराम यांच्यातच होईल. गेल्या तीन वेळा विजय मिळवलेल्या नाईक यांना गतनिवडणुकीतील मताधिक्क्य फारच कमी होते. त्यामुळे यंदा इथे चुरशीची लढत होईल. या मतदारसंघात बंजारा व आदिवासी हा मतदार मोठ्या संख्येने आहे. त्याचबरोबर दलित व मुस्लिम मतदारही उल्लेखनीय आहे. जवळपास साठ टक्क्यांवर असलेला बंजारा मतदार नाईक यांच्या मागे एकगठ्ठा व आदिवासी मतदार केराम यांच्या मागे एकगठ्ठा असे इथल्या मतदारांचे सामाजिक ध्रुवीकरण झालेले आहे. गेल्यावेळी भाजपचे अशोक पाटील सूर्यवंशी यांनीही तिसऱ्या क्रमांकावर राहत चांगली मते मिळवली होती. मात्र भाजपच्या अनेक इच्छुकांना डावलत केराम यांनी भाजपच्या कमळाला हात घातला. त्यामुळे यंदा केरामांना कुठल्याही साधनसामग्रीची कमतरता भासणार नाही, असे म्हटले जाते. त्यातच नाईक यांच्याविषयीची असलेली नाराजी त्यांच्या पथ्यावर पडत आहे.

loading image